‘बंद’ किती परिणामकारक ठरतो?

‘बंद’ किती परिणामकारक ठरतो?

तीन कृषी कायद्यांत केलेल्या बदलांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 14 वा दिवस. काही तासांचा भारत बंद, आंदोलक आणि केंद्र सरकार दरम्यान सुरु असलेल्या चर्चेच्या फेर्‍या कितपत यशस्वी ठरतात ते अजून स्पष्ट व्हायचे आहे.

कायद्यांचे समर्थक आणि विरोधक यांची जुगलबंदी यापुढेही सुरूच राहील. तथापि हे आंदोलन आणि भारत बंद यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. या कायद्यांचा सविस्तर अभ्यास किती लोकांनी केला असेल? हे आंदोलन भडकण्याला शासनाची असंवेदनशीलता कारणीभूत आहे का? जनतेच्या प्रश्नांसंदर्भात शासन संवेदनशील असावे ही लोकशाहीत साहजिकच जनतेची अपेक्षा असते. केंद्र सरकारने संमत केलेले कायदे काळानुरूप आणि शेतकर्‍यांच्या हिताचे होते तर ते शेतकर्‍यांना समजावून सांगण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले? हे कायदे राज्यसभेत कामकाजाच्या नियमांकडे दुर्लक्ष संमत केले गेले. तसे करण्याची वेळ सरकारवर का आली? हे कायदे बड्या धेंडांच्या फायद्याचे असल्याचा आरोप आहे.

तो खरा नाही हे सरकारने कोणाला पटवून दिले? सुरुवातीला हे आंदोलन राजकीय नाही, त्यात राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा सहभाग नाही असे आंदोलकांच्या वतीने सांगितले जात होते. आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलकच आंदोलनाची दिशा ठरवताना दिसत होते. पण राजकारण्यांचा या आंदोलनात चंचुप्रवेश कधी झाला आणि त्यांनी शेतकरी आंदोलन कधी हायजॅक केले हे आंदोलकांना तरी कळले का?

या आंदोलनात सहभागी झालेले विरोधी पक्ष सरकारकडे धोरण नसल्याची टीका करतात. पण त्यांच्याकडे तरी निश्चित धोरण आहे का? ते नसल्यामुळेच जिथे गर्दी दिसेल तिथे जाऊन धडकण्याचा एककलमी अजेंडा राबवला जात आहे का? एखादी गोष्ट नको म्हणत असताना कोणती गोष्ट हवी हे सांगण्याची जबाबदारी विरोध करणारांची नाही का? याआधी असा कायदा काँग्रेस पक्षाने आणण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते. मग काँग्रेस पक्षाने मांडलेल्या आणि केंद्र सरकारने संमत केलेल्याकायद्यमधील फरक समजावून सांगण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची नाही का? नेते आणि पुढार्‍यांच्या सहभागामुळे आंदोलनाला बळ किती मिळाले? कडाक्याच्या थंडीत नेटाने दिल्लीत जाऊन धडकलेल्या आंदोलकांच्या वेदना किती कमी झाल्या? आंदोलकांना जे अपेक्षित होते ते घडले का?

हे आंदोलकच ठरवू किंवा सांगू शकतील. महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव आंदोलन देशभर गाजले. पण हे आंदोलन का केले? त्यात कोण सहभागी झाले होते? यापेक्षा श्रेयासाठी या आंदोलनाची ओढाताण कोणामध्ये सुरु आहे हे जनताही जाणून आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात आंदोलने महत्वाची भूमिका पार पाडतात. महात्मा गांधींनी आंदोलनाला सत्याग्रहाचे रूप देऊन स्वातंत्र्यलढसाथजी हत्यार बनवले. ती त्या काळची गरज होती. पण आता देश आपणच चालवतो आहोत. अशावेळी आंदोलन कोणी कोणाविरुद्ध करायचे? कोणावरही अन्याय होऊ नये आणि जाणते-अजाणतेपणी झाला तरी त्याचे परिमार्जन व्हायलाच हवे. पण कोणत्याही कारणासाठी देश बंद करण्याने हा देश पुढे कसा जाईल?

देश बंद आंदोलन खरोखरच परिणमकारक ठरते का? बंदची झळ सर्वात जास्त कोणाला बसते? या प्रश्नांच्या भोवर्‍यात जनता मात्र भिरभिरली आहे. काय खरे आणि काय खोटे हेच जनतेला समजेनासे झाले आहे. आंदोलकांपैकी किती जणांनी हा विचार केला असेल? तेव्हा एकूणच आंदोलने आणि ते करण्याची पद्धत यांचा फेरविचार करण्याची गरज आहे का? तसा विचार व्हायला हवा. पण त्यासाठी सुद्धा सरकारची संवेदनशीलता जागी असल्याचा अनुभव जनतेला येत असेल तरच बंदचा फेरविचार आंदोलक करू लागतील अशी आशा करावी का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com