...पण कोणी ऐकेल का ?

...पण कोणी ऐकेल का ?

गुन्हेगारीचा भस्मासूर अचानक निर्माण होत नाही. अलीकडे तर गल्लीबोळात अनेक छोटेछोटे स्वयंघोषित भाई, दादा जनतेला त्रास देत असतात. त्या त्या परिसरात कुठल्याही छोट्यामोठ्या निमित्ताने लागणार्‍या शुभेच्छा फलकांवर सहज नजर फिरवली तरी अशा अनेक स्वयंघोषित भाई व दादांची माहिती आढळते. जनतेला त्रस्त करणार्‍या या टोळ्या वा टोळक्यांचा बंदोबस्त का होत नसावा? त्यासाठी जनतेला पोलीसात तक्रार का करावी लागावी?

अशा गुंडांची दखल घेण्याचे धाडस पोलीससुद्धा दाखवत नसतील तर सामान्य माणसे कसे दाखवणार? अशी तक्रार करण्याची हिंमत कोणी दाखवलीच तर त्यांची बोळवण कशी केली जाते? कायद्याचे राज्य अबाधित कसे ठेवावे यासाठी पंजाब राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक व राज्यपाल ज्युलिओ रिबेरो यांनी पोलीस अधिकार्‍यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नामचीन गुंड विकास दुबे घटनेचाही उल्लेख केल्याचे माध्यमांनी म्हंटले आहे. पोलीस अधिकार्‍यांना आणि आपल्या ‘राजकीय गुरूं’ना लाच देऊन गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात येतात. गुन्हेगार, पोलीस आणि राजकीय नेते यांच्या साटेलोट्याने ‘भस्मासूर’ जन्माला येतात. याची सर्वांना कल्पना आहे. राजकीय नेत्यांना जागे करण्यासाठी पोलीस फारसे काही करू शकत नाहीत, मात्र गुन्हेगारांना पाठिंबा देण्यापासून आपल्या सहकार्‍यांना नक्कीच परावृत्त करू शकतात. असे केल्यास पोलीस या गुन्हेगारी साखळीच्या तीन पायांपैकी एक पाय खिळखिळा करू शकतात असा सल्ला रिबेरो यांनी पोलिसांना दिला आहे.

पोलिसांना असा उपदेश करण्यासाठी इतका योग्य आणि खमका अधिकारी कदाचित दुसरा कोणी नसेल. रिबेरो यांची पोलीस खात्यातील कारकीर्द गाजली आहे. खलिस्तान चळवळ संपवण्यासाठी रिबेरो यांना पंजाबमध्ये खास पाठवले गेले होते. हा इतिहास सगळ्यांनाच, विशेषतः पोलीस दलाला माहिती आहे. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांनी ठरवले तर कायद्याचे राज्य अबाधित राहू शकते हा त्यांचा सल्ला हे अनुभवाचे बोल आहेत. कोणतीही चांगली गोष्ट करायचे म्हंटले की ‘मी एकटा चांगले वागून काय होणार आहे?’ अशी पळवाट शोधली जाते. जो तो आपापल्या पुरता विचार करतो. त्याला पोलिसही अपवाद कसे असतील? आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी यंत्रणेचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती जगभर बोकाळली आहे. व्यवस्था कोणतीही असो, धर्मांची, कामांची तिचे आपण वाटोळे करू शकतो याची ठाम खात्री त्यांना वाटत असते. ते तसे करूनही दाखवत असतात. वाट्टेल ते मार्ग अवलंबून यंत्रणा खिळखिळी करणे आणि जनतेचा यंत्रणेवरचा विश्वास उडवणे हाच त्यांच्या करणीमागचा उद्देश असतो. आपल्या स्वार्थासाठी यंत्रणेला चूड लावणार्‍यांविषयी काय बोलावे? एकट्याच्या ताकदीवर समाज बदलवून टाकणार्‍या चळवळी उभ्या राहिल्याचे आणि त्या यशस्वी झाल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतील. याचा भारतीयांपेक्षा दांडगा अनुभव जगभर क्वचितच काही देशांनी घेतला असावा.

महात्मा गांधी हे त्याचे सर्वात अलीकडच्या काळातील उदाहरण आहे. त्यांनी ठरवले म्हणून बदलाची मोठी लाट आली, जनता जागृत झाली आणि देश स्वतंत्र झाला. ‘गांधींसारखा एक हाडामासाचा चालताबोलता माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणार्‍या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत’ , अशा आशयाचे अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. जनतेचा विश्वास बसणार नाही असे काम निश्चयाच्या बळावर एकटी व्यक्ती करू शकते याचे यापेक्षा वेगळे दुसरे उदाहरण कोणते असेल? रिबेरो यांचे पोलीस अधिकार्‍यांना असेच सांगणे आहे. पठडीबद्ध दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करण्याची गरज रिबेरो यांनी प्रतिपादित केली आहे. प्रामाणिकपणा, अनुकंपा, सत्य व न्यायासाठीची तळमळ, कायदा आणि संविधानाप्रति बांधिलकी ही तत्त्वे चिरस्थायी आहेत. खोट़या चकमकी आणि चौकशीच्या पाशवी पद्धती बंद होतील, असे धोरण ठरवले तर तुम्ही तयार करू शकाल, याची मला खात्री आहे, असेही रिबेरोंनी पत्रात म्हटले आहे. त्यांचा सल्ला मनावर घेणारे थोडे जरी अधिकारी निघाले तरी परिस्थिती बदलू शकेल आणि त्यातून देशाचेच भले होईल, असा विश्वास रिबेरो यांच्या नावामुळे जनतेला निश्चितच वाटावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com