Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखजनतेला इतकेही जमू नये ?

जनतेला इतकेही जमू नये ?

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि जनता यांना हातात हात घालून उपाय योजावे लागतील. जनतेने जगण्याचे नवे तंत्र अंमलात आणावे असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व संशोधक वारंवार करत आहेत. कोरोनाची साथ कधी आटोक्यात येईल? समूह संसर्ग सुरु झाला आहे का? याविषयी तज्ज्ञांमध्येसुद्धा एकमत नाही. तथापि लोकांनी किमान काही निर्बंध पाळणे आवश्यक आहे; यावर मात्र त्या सर्वांचेच एकमत आहे. पण मग शहाण्यांना मात्र हा शब्दांचा मार पुरे कसा पडणार? नाशिकमधील शालिमार चौकात शासनाचे संदर्भ सेवा रुग्णालय आहे. या रुग्णालयात काही कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यांच्यापैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना रुग्णालयाच्या एका इमारतीत क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

या रुग्णांच्या मनमानी आणि बेजबाबदार वर्तनाला कंटाळून रुग्णालयातील 26 कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. क्वॉरंटाइन करण्यात आलेले कोरोनाचे रुग्ण रुग्णालयाच्या आवारात बिनदिक्कत फिरतात. त्यांच्यापैकी काही जण रुग्णालयातही दाखल झाले आहेत. ते कोणाचेच ऐकत नाहीत, अशा तक्रारी रजेवर गेलेल्या कर्मचार्‍यांनी केल्या आहेत. कोरोना झालेल्या रुग्णांना समजावून सांगण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिल्यानंतर आम्ही रजेचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि डॉक्टर्स जीव जोखमीत घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातील अनेकांना संसर्गही झाला आहे. देशात आतापर्यंत बाराशेपेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 90 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करण्याची वेळ इंडियन मेडिकल असोसिएशनवर आली आहे.

- Advertisement -

घराबाहेर फिरताना तोंडाला मुसके बांधावे, परस्परांमध्ये योग्य अंतर राखावे, विनाकारण बाहेर फिरू नये, कोरोना संशयितांनी त्यांना घालून दिलेले निर्बंध पाळावेत. एवढीच शासन आणि आरोग्य कर्मचार्‍यांची अपेक्षा आहे. तेवढेही लोकांना जमू नये का? बाजारात माणसांचीच गर्दी जास्त आहे. शासनाने कितीही बजावले तरीही लोक तोंडाला मुसके बांधत नाहीत. बांधलेले असेल तर ते वारंवार काढताना, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखण्याऐवजी एकमेकांची गळाभेट घेताना आढळतात. किती लोक सुचवल्याप्रमाणे घरी परत गेल्यावर हात पाय धुवूनच घरात प्रवेश करत असतील? घरी वारंवार हात धुत असतील? मुसके बदलत असतील? पीपीई कीट घालून उपचार करताना आरोग्य सेवक आणि डॉक्टरांना किती प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागते, याविषयीचे वृत्त माध्यमांमध्ये अनेकदा प्रसिद्ध झाले आहे.

मग जनतेला घालून दिलेले चार-पाच प्रकारचे साधे निर्बंध पाळायला तितके अवघड आहेत का? लोकांना आणि रुग्णांना अतिरेकी स्वातंत्र्याची आस लागली आहे का? कोरोनाची साथ आटोक्यात आणणे ही फक्त सरकारचीच जबाबदारी आहे का? रुग्णांच्या बेजबाबदार वर्तनाचा निषेध म्हणून आज 23 आरोग्य कर्मचारी सुट्टीवर गेले. ही लाट पसरली तर कोणत्या परिस्थितीचा जनतेला सामना करावा लागेल याचा नुसता अंदाजही घाबरवून सोडणारा आहे. लोक बेजबाबदारपणे वागणार असतील तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा दोष फक्त शासनाला देता येईल का? कोरोनाचा वाढता संसर्ग ही शासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी मानता येईल का? लोक कसेही वागले तरी शासनाला तसे वागून चालेल का? आर्थिक परिस्थिती लवकर रुळावर यावी, जनजीवन सुरळीत सुरु व्हावे, असे लोकांना वाटत असेल तर त्यासाठी पहिले पाऊल जनतेलाच उचलावे लागेल. कोरोना रुग्णांवर उपचार करणे ही शासनाची जबाबदारी आहे, पण संसर्ग नये म्हणून घालून दिलेले निर्बंध पाळणे ही फक्त आणि फक्त जनतेचीच जबाबदारी आहे, याची खूणगाठ लोकांनी बांधलेली बरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या