कोरोना धोरणाची धरसोड कुठवर ?
अग्रलेख

कोरोना धोरणाची धरसोड कुठवर ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणे हे लोकांच्याच हातात आहे. सार्वजनिक वावरावर घातलेले निर्बंध त्यांनी काटेकोरपणे पाळले आणि योग्य दक्षता घेतली तर कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनालाही मदत होईल. जनतेने आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवावे असा सल्ला डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे. डॉ. रमण हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे नुकतेच निवृत्त झालेले प्रमुख आहेत. ‘देशातील शहरांमध्ये सतत काही दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येतो. आजपासून पुणे शहर 18 जुलैपर्यंत पुन्हा पूर्णपणे बंद केले आहे.

तथापि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर भीषण दुष्परिणाम होत आहेत. रोजंदारीवरचे कामगार, व्यवसाय, उद्योग या सर्वानाच फटका बसत आहे. लॉकडाऊन सुरूच आहे. पण तो तोडणारेही आहेत. माणसे बाहेर फिरतच आहेत. 100 लोक घरातच बसून राहिले पण त्यापैकी पाचच जरी बाहेर पडले. आणि त्यातील एक बाहेरून संसर्ग घेऊन घरात परतला तर? घरातच राहिलेले सर्व लोकसुद्धा कोरोना लागण होण्याच्या भीतीने धास्तावणारच! कोरोनाची साखळी अशीच वाढत जाते. तेव्हा हा शेवटचाच लॉकडाऊन आहे असे समजून लोकांनी निर्बंधांचे कटाक्षाने पालन करावे’ असेही त्यांनी म्हंटले आहे. संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासासाठी रमण ओळखले जातात. म्हणून त्यांनी दिलेला सल्ला वजनदार ठरतो.

शासन आणि जनतेने हातात हात घालून काम केले तरच कोरोनाची साथ आटोक्यात येऊ शकेल, असा सल्ला याआधीही अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. पण त्यातील गांभीर्य लोकांना पुरेसे कळले नसेल तर दोष कोणाचा? किती लोक घराबाहेर पडताना, बाहेर वावरतांना आणि घरी परत आल्यावर योग्य ती खबरदारी घेतात? विनाकारण बाहेर भटकणार्‍यांची वाहने जप्त करण्याची आणि तोंडाला मुसके न बांधता बाहेर फिरणार्‍यांना दंड करण्याची वेळ शासनावर का येते? एकदा घालून दिलेले निर्बंध लोक पाळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी फक्त शासनाचीच आहे का? तथापि एक वास्तव विसरता येणार नाही. सततच्या लॉकडाऊनला लोक वैतागले यात त्यांचे तरी काय चुकते? लाखो लोकांना एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत पडत आहे. बेरोजगारी सतत वाढत आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवावे लागते यावरूनच या परिस्थितीची भीषणता समजू शकते. त्यामुळे व्यापार आणि उद्योगचक्र लवकरात लवकर सुरु होणे अत्यावश्यक आहे. तसे ते सुरु होण्यात जनतेची कळीची भूमिका राहील. लोकांनी निर्बंध कडक पाळले तर पुनःपुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही, हे डॉ. रमण यांनी जनतेच्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

उपजीविकेचे मार्ग खुले झाले तर ते निर्वेधपणे चालू राहावेत हाच प्रयत्न उद्योगातील सर्व कामगार निश्चित करणार! त्यासाठी नियम कटाक्षाने पाळण्याची गरज अशा सर्वांना जाणवेल. डॉक्टर्स, संशोधक, संसर्गजन्य आजारांचे तज्ञ आणि विविध व्यापारी संघटनाही हेच पुनःपुन्हा सांगत आहेत. पुणे व्यापारी संघाने पुणे बंदला तीव्र विरोध केला आहे. करोना आणखी किती काळ राहील हे कोणीच निश्तित सांगू शकत नाही. मग उद्योग व्यापार किती काळ बंद ठेवणार? लॉकडाऊन हे त्यावर औषध नव्हे.’ बाजार सुरु करणार्‍या दुकानदारांवर आणि व्यापार्‍यांवर शासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही सर्व व्यापारी आणि दुकानदार त्यांचे पालन करत आहेत. जे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी. पण तसे खरेच होत आहे का? अशी खंत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. रमण आणि राका यांच्या बोलण्याच्या भाषेत फरक असला तरी त्याचे मर्म मात्र एकच आहे. रमण यांनी लोकांना निर्बंध पाळण्याचा आणि जे पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला राका यांनी दिला आहे. शासनाने आणि कायद्याने सर्वांना समान वागणूक द्यावी असेच राका यांना सुचवायचे असावे. यापुढे शासन आणि जनतेने परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी आणि सततच्या ‘बंदला’ कायमची मूठमाती द्यावी. यापूर्वी अशा अनेक दुखण्यांच्या साथी आल्या आणि त्या त्या काळातील समाजाने त्यांच्यावर यशस्वी मातही केलीआहे. लॉकडाऊन वाढत राहिला तर त्याचे फक्त आर्थिकच विपरीत परिणाम होतील असे नाही तर गंभीर सामाजिक आणि मानसिक स्तरावर देखील परिणाम होतील असा इशारा मानसोपचार तज्ज्ञांनीही दिला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी जाहीर केलेल्या क्रमांकावर ( हेल्पलाइन्स) फोन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून सरळसरळ शासनाच्या भूमिकेबद्दल असमाधान व्यक्त होत असणार. एकूणच कुंठित झालेल्या परिस्थितीचे खापर शासनावर फुटेल. हे टाळण्यासाठी कोरोनाविषयक धोरण आणि उपाययोजना निश्चित करणे, ही आजघडीची आवश्यकता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com