Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखभारतीय सहिष्णुतेचा प्रभाव

भारतीय सहिष्णुतेचा प्रभाव

महाराष्ट्राच्या व देशाच्या उभारणीत अनेकांचे मोलाचे योगदान आहे. त्या सर्वांबद्दल आपण सर्वांनी आदर राखायला हवा. विधानभवनात एखाद्या चांगल्या व्यक्तीसंदर्भात प्रस्ताव येणार असेल तर त्याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधाने करून गैरसमज पसवण्यात काय अर्थ आहे? देशाच्या उभारणीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही.

महापुरुषांचा गौरव करण्याबाबतही दुमत असू नये.त्यावरून राजकारण टाळावे’ असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्षांना सादर करण्यात आला. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार उत्तर देत होते. त्यांनी हा सल्ला भाजपला उद्देशून दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीत तो सर्वच राजकीय पक्षांना लागू आहे.

- Advertisement -

भेदाभेदाच्या मुद्यावरून सर्वत्र चिखलफेक सुरू आहे. हा खेळ कुंपणावर बसून खेळता येत नाही. या खेळात जो सहभागी होतो तोही चिखलाने माखतो. त्यामुळे चिखलफेकीच्या या खेळात सर्वच राजकीय पक्ष बरबटले आहेत. सर्वांनी स्वार्थी राजकारणासाठी जाती, धर्म, पंथ यांना वेठीला धरले आहे. महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपित्यालाही सोडले जात नाही. मध्य प्रदेशातील भाजप नेेते अनिल सौमित्र यांनी महात्मा गांधींना ‘पाकिस्तानचे राष्ट्रपिता’ ठरवले तर साध्वी प्रज्ञाने नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ पदवी बहाल केली. नेत्यांच्या बाष्कळ बडबडीचे हे दुर्दैवी नमुने !

ज्या समाजसुधारकांनी आणि राष्ट्रपुरुषांनी समाजसुधारणेसाठी आजन्म प्रयत्न केले त्यांनाही जाती-धर्मांचे बिल्ले चिकटवले जातात. असे करण्यामुळे नेत्यांचे राजकारण होत असले तरी समाज मात्र विघटनाच्या दिशेने ढकलला जातो. माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत आहे. राजकीय विश्वासार्हता रसातळाला जात आहे. याचे भान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसावे का? की चिखलफेकीच्या राजकारणाचा व त्यासाठी समाजपुरुष आणि राष्ट्रपुरुषांना वेठीला धरण्यामागचा हेतू तोच असावा? गांधीजींनी देशाला साधनशूचितेचे राजकारण शिकवले.

टोकाच्या राष्ट्रवादाचे गारूड समाजावर फार काळ टिकत नाही हे अनेक राज्यांतील निवडणूक निकालांनी स्पष्ट झाल्यावरसुद्धा अनेक नेत्यांचा ‘सुंभ जळला तरी पिळ जात नाही’. राजकीय पक्षांचे धुरीण बाष्कळ बडबड करणार्‍या नेत्यांना वेसण का घालत नसावेत? कदाचित ही उणीव लक्षात घेऊन ते काम महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा चमकदार वारसा लाभला आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ही सुबुद्धी सुचली हा त्या वारशाचाच प्रभाव असावा. कसेही असो, ‘बालादपि सुभाषितम् ग्राह्यं…’ या उक्तीचा विसर कोणालाही पडू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या