‘धारावी’चा चमत्कार !

‘धारावी’चा चमत्कार !

ज्याच्या-त्याच्या तोंडी आजकाल एकच विषय आढळतो - ‘करोना’चा हाहा:कार! हे संकट रोखण्यासाठी बहुतेक देशांनी टाळेबंदीचा मार्ग पत्करला. भारतानेसुद्धा त्यांचेच अनुकरण केले. चार टप्प्यांतील टाळेबंदीने करोडो लोकांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील बहुसंख्य लोकसंख्येला या महामारीची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झळ बसत आहे. आता सर्वत्र दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात पूर्वपदावर आणले जात आहेत. अख्खे जग झुंजत असताना सध्यातरी ‘करोना’च वरचढ ठरत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र झटत आहेत.

मात्र येत्या काळात प्रतिबंधक औषधाशिवाय ‘करोना’वर पूर्णपणे मात करणे शक्य होईलसे वाटत नाही. अशावेळी जगासाठी, प्रामुख्याने भारतासाठी एक दिलासादायक खबर आली आहे. मुंबईत रुग्ण वाढत असताना धारावी परिसरात ‘करोना’ काबूत आला आहे. ‘धारावी’ नाव उच्चारल्यावर आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे चित्र डोळ्यांसमोर येते. हा अतिशय दाटीवाटीचा परिसर! साडे सहा लाख लोक येथे राहतात. जास्त प्रचारामुळे ‘बदनाम बस्ती’ हे लेबल ‘धारावी’ला चिकटले. त्यामुळे मुंबईत कोणतेही आरोग्यविषयक संकट ओढवल्यावर धाक पडतो तो धारावीच्या सुरक्षेचा! ‘करोना’चा तेथील शिरकावसुद्धा धडकी भरवणाराच होता. ‘करोना’सोबत जगायला शिकावे लागेल’, ‘करोना’चा प्रभाव वर्ष-दोन वर्षे तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत’ असे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच हताशपणे जाहीर केले आहे. मात्र मुंबईतील सर्वाधिक बाधित क्षेत्र ठरलेल्या ‘धारावी’ने ‘करोना’विरुद्धच्या लढाईत केरळपाठोपाठ अभूतपर्व यश मिळवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेची उमेद धारावीच्या उदाहरणाने जागली आहे.

‘करोनाला थोपवता येते हे धारावीने दाखवून दिले’ असे प्रशंसोद्गार संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ग्रेब्रेसस यांनी काढले आहेत. महामारीविरोधात जगभर सुरू असलेल्या आक्रमक उपाययोजनांचे कौतुक करताना त्यांनी ‘धारावी’चाही गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्याकडे एखाद्या अनुकरणीय अनुभवाची दखल घेतली जाण्यासाठीसुद्धा कुठल्या तरी प्रभावी गल्ली नेतृत्वाची गरज असते. मनपा प्रशासन, राज्य सरकार, स्थानिक डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन सेवक, स्वच्छतासेवक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा अशा सर्वांचे प्रयत्न आणि त्याला लोकसहभागाची जोड यामुळेच हा चमत्कार घडू शकला. संशयितांचा शोध, त्यांची चाचणी, विलगीकरण व वेळीच उपचार या चतु:सूत्रीमुळे संसर्गसाखळी तोडणे शक्य झाले. म्हणूनच ‘करोना’ची मगरमिठी सैल होऊ शकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धारावीकरांच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक केले आहे.

चांगल्याला चांगले म्हणण्याचा चांगूलपणा सर्वच पक्षांनी दाखवायला हवा. धारावीतील ‘करोना’संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल संबंधित सर्व यंत्रणांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवण्याऐवजी या यशाविषयीसुद्धा काही नेते संदेह व्यक्त करीत आहेत, पण ही वेळ अशा क्षुद्र राजकारणाची नाही हेसुद्धा नेतेमंडळींना विसरता येऊ नये? अशा आपत्तीची वेळ सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम करण्याची आहे. मात्र आरोग्याशी संबंधित विषयाचाही राजकीय अंगाने विचार केल्यावर चांगले घडले तरी कौतुक कोण करणार? त्यालासुद्धा मनाचे औदार्य लागते, पण भारतीय नेतेमंडळींकडून ती अपेक्षा कशी करावी? राज्य सरकारच्या प्रयत्नांची निदान केंद्र सरकार दखल घेईल, त्या प्रयत्नांचे कौतुक करून प्रोत्साहनही देईल; तर इतर राज्यांनाही ‘करोना’लढ्यात प्रयत्नांची शिकस्त करण्याची प्रेरणा मिळू शकेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com