उद्धरेत आत्मनात्मानम् !
अग्रलेख

उद्धरेत आत्मनात्मानम् !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. कोरोनाची लागण होईल का, या शंकेने माणसे अस्वस्थ आहेत. तरीही एकमेकांच्या मदतीसाठी समाज पुढे येत आहे. कट्टरतावाद्यांनी कोरोनाच्या प्रसाराला धार्मिक रंग देण्याचा आणि समाजात दुफळी माजवण्याचाही प्रयत्न केला. तथापि लोकांचे सामंजस्य आणि शहाणपण वाढत आहे. राजकीय साठमारीत आपल्या पदरात फारसे काही पडणार नाही हे त्यांना पुरेपूर उमगले आहे. प्रेम, बंधुता, विचारांमधील परिपक्वता, परस्पर मदतीची भावना या मानवी मूल्यांची जाणीव वाढत आहे. कोरोनाच्या या संकट काळात या मानवी मूल्यांचा आविष्कार घडवणार्‍या घटना उठून दिसत आहेत.

भिवंडीमधील एका मशिदीचे तात्पुरत्या करोना केंद्रात रूपांतर केले गेले आहे. ज्या रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत त्यांना या केंदात दाखल केले जाते. ज्यांना गरज भासते त्यांना प्राणवायूची सुविधा दिली जाते. रुग्णालयात खाटा उपलब्ध झाल्यावर त्यांना तिकडे दाखल केले जाते. शेगावचे गजानन महाराज संस्थान दानधर्म आणि सामाजिक कामासाठी ओळखले जाते. या संस्थांनात 500 खाटांचा कोरोना कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा आणि दोन वेळच्या भोजनाची सोय संस्थानने केली आहे. हिंदुजा रुग्णालयातील करोना कर्मचार्‍यांसाठी सेंट मायकल चर्चने मदतीचा हात पुढे केला आहे. चर्च एक शाळा चालवते. या शाळेतील काही वर्गखोल्यांना तात्पुरत्या निवारागृहाचे स्वरुप देण्यात आले आहे.

रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या आरामाची सोय तेथे केली आहे. कोल्हापुरात विल्डर मेमोरियल चर्च आहे. या चर्चने बंदोबस्त बजावणार्‍या पोलिसांच्या जेवणाची सोय केली आहे. सामाजिक सलोखा हे लोकशाहीचे बलस्थान असले तरी ते धोक्यात आणण्याचे प्रयत्न जाणूनबुजून जोरात आहेत. कोणत्याही मुद्याला धार्मिक रंग दिला जातो. त्या मुद्यांवरून ट्रोलभैरव समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतात. अनेक समूह निर्माण करतात. त्या समूहात विखारी चर्चा घडवून आणतात. समाजाला विघटनाच्या उंबरठ्यावर उभा करण्याचे प्रयत्न वाढत आहेत. कट्टरतावाद्यांची ही खेळी आता जनतेलाही उमजू लागली आहे. विचारांनी परिपक्व झालेली माणसे एकत्र येत आहेत. राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये सावळा गोंधळ आहे. शिक्षण क्षेत्रात नेमके काय सुरु आहे? करोनाच्या रुग्णांसंदर्भात सरकारचे नेमके धोरण काय आहे? सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे कशी निश्चित ठरवायची? कोणती लक्षणे असणार्‍या रुग्णांना सरकारी रुग्णालयात किंवा कोविद सेटरमध्ये दाखल करून घेणार? कोणाला घरीच ठेवणार? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.

राजकीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. तथापि अशा दौर्‍यांमुळे नेत्यांच्या आणि पक्षांच्या राजकीय हेतूंपलीकडे काय साध्य होणार? समाजाचे कोणते भले होणार? आता या राजकीय साठमारीचा वैताग जनतेत वाढू लागला आहे. प्रश्न सुटत नाहीत. ते आपल्यालाच सोडवावे लागतील हे जनतेच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच नेतेमंडळींच्या राजकारणाला आणि त्यांच्या दौर्‍यांना बाजूला सारून लोक एकमेकांच्या मदतीसाठी धाव घेत आहेत. ‘उद्धरेत आत्मनात्मानम् ’ असे भगवपद्गीतेत खुद्द भगवंतानेच सांगितले यावर भारतीयांची पूर्ण श्रद्धा आहे. संकटसमयी मदतीसाठी धाव घेणार्‍या किती लोकांनी गीता वाचली असेल वा नसेल. तथापि, पिढ्यानपिढ्या मनावर पडलेला त्या उपदेशाचा प्रभाव या कोरोना काळातील या घटनांनी निश्तितच सिद्ध केला आहे. लोकांनी प्रत्यक्ष आचरणात आणला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com