Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखयोगी राज्यातील ‘आलबेल’ ?

योगी राज्यातील ‘आलबेल’ ?

गलवान खोर्‍यातील चकमकीत वीस भारतीय जवानांना वीरमरण आले. त्या घटनेनंतर केंद्र सरकार विविध प्रकारे चीनला सूचक इशारे देत आहे. चीनी अ‍ॅप्सवर बंदी आणून ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्यात आला. मात्र चीन ‘हू’ की ’चू’ करायला तयार नाही. भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. काश्मीर खोरेही अशांत आहे. काश्मिरी जनतेला निर्भयपणे स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून 370 कलम रद्द करण्यात आले.

जम्मू-काश्मीरचे त्रिभाजनही केले गेले. आता सगळे सुरळीत होईल, असा गाजावाजा केंद्रातील सत्तापतींनी भरपूर केला. मात्र काश्मीरची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. ‘रुग्णालय असो वा सीमा; प्रत्येक ठिकाणी आम्ही सुसज्ज असतो’ असे देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला सुनावले, पण सध्या देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याला कारण ठरली उत्तर प्रदेशातील निर्घृण हत्येची घटना! संरक्षणमंत्र्यांचे हे गृहराज्य! कानपूरमधील बिकरू गावात पोलीस पथकाला गुंडांनी घेरले. अंदाधुंद गोळीबार केला. त्यात अधिकार्‍यांसह आठ पोलीस शहीद झाले. विकास दुबे नामक गुंडाला पकडायला पोलीस तेथे गेले होते. दुबेच्या घराजवळील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याचे सांगितले जाते. मात्र पोलिसांच्या हाती पुरावा लागू नये म्हणून सीसीटीव्हीचे ‘सीडीआर’ घेऊन दुबे पसार झाला. ‘पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ असे मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठासून सांगितले.

- Advertisement -

योगी राज्यात आतापर्यंत हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत व बहुतेकांत गुन्हेगार सापडत तरी नाहीत किंवा मोकाट फिरत आहेत. ‘जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ असे गलवान खोर्‍यातील घटनेनंतर पंतप्रधानसुद्धा म्हणाले होते. काश्मिरातील पुलवामात दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या घातपातात देशाचे चाळीस जवान शहीद झाले होते. तेव्हाही पंतप्रधानांच्या तोंडून हेच वाक्य ऐकू आले होते. केंद्रात मजबूत बहुमताचे ‘खंबीर’ सरकार आहे. उत्तर प्रदेशातही तेवढेच मजबूत ‘योगी’ सरकार आहे. तरीही देशाच्या सीमा व देशांतर्गत सुरक्षा इतक्या असुरक्षित कशा? सरकारने त्या घटनांबाबत नेमके काय केले? किंबहुना पुढे काय होत आहे ही वस्तुस्थिती लोकांना कळू नये यासाठीच सरकार झटत असावे का?

‘करोना’रुपी अदृश्य शत्रूशी गेले तीन महिने देश लढत आहे. मात्र या लढाईत यश अजूनही दृष्टिपथात नाही. त्या लढाईला ‘जागतिक अरिष्ट’ ही सबब तरी सांगता येते. पोलिसांनाच गुंडांची शिकार व्हावे लागल्यास जनतेला सुरक्षेची खात्री कशी वाटणार? उत्तर प्रदेशात खरोखर लोकशाही सुरू झाली आहे, असे तेथील जनतेने समजावे का? गेल्या वर्षी देशाचे संरक्षणमंत्री फ्रान्समध्ये गेले होते. तेथे त्यांनी बहुचर्चित ‘राफेल’ विमानाचे शास्त्रोक्त पूजन केले. दुष्टशक्तींची बाधा होऊ नये म्हणून त्यांनी विमानाला लिंबू-नारळाचा उतारा केल्याचेही भारतीयांना आठवत असेल. गलवान खोरे आणि उत्तर प्रदेशातील हिंसाचार पाहता तेथेही कदाचित पूजापाठ सुरू झाले असतील. त्यासाठी अयोध्या, अलाहाबाद, काशी आदींसारखी पुण्यक्षेत्रे उपलब्ध आहेतच. त्यानिमित्ताने मोठमोठ्या केंद्रीय नेत्यांची वरचेवर पायधूळही झाडली जाते.

देशाचे गृहमंत्री ‘आधुनिक पोलादी पुरुष’ आहेत. ते अत्यंत कार्यक्षम आहेत. विरोधी पक्षांची स्थिर सरकारे गडगडवून स्वपक्षीय ‘सत्तेची कमळे’ फुलवण्याच्या त्यांच्या ‘चाणक्यगिरी’तून देशवासियांना त्याची प्रचिती वरचेवर येत आहे. उत्तर प्रदेशातील ताज्या घटनेची दखल त्यांनीही पुरेशा गांभीर्याने घेतलीच असेल. पोलिसांना लक्ष्य करणार्‍या गुंडांना हुडकून त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील किंवा गुजरातमधील पद्धतीने ‘एन्काऊंटर’ने गुंडांचा खात्मा केला जाईल हे दाखवण्याची संधी त्यांनाही अनायसे उपलब्ध झाली आहे. तसे न झाले तर ‘योगी’ राज्यातील ‘आलबेल’चा प्रचारच पोकळ ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या