निरर्थक थाटमाट थंडावला !

निरर्थक थाटमाट थंडावला !

वाईटातून चांगले घडते या धड्याचा कोरोना महामारीने सुद्धा प्रत्यय दिला आहे. कोरोनामुळे अनेक नवीनतम पायंडे ( न्यू नॉर्मल) तयार झाले आहेत. बाहेर जाऊन घरात येताना हात-पाय धुऊनच घरात येणे, घरात काम करतांना वारंवार हात धुणे, घराबाहेर जाताना तोंडाला मुसके बांधणे, ऑनलाईन शिक्षण, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, घर आणि आजूबाजूचा परिसर सतत स्वच्छ ठेवणे असे अनेक चांगले बदल समाजाच्या अंगवळणी पडत आहेत. कोरोनाच्या धसक्याने का होईना सामाजिक भान वाढत आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे अनेक गणेश मंडळांनी ठरवले आहे. लालबागच्या राजाचे आकर्षण सर्वांनाच असते. हे मंडळही गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने जाहीर केला आहे.

आश्चर्य म्हणजे गेल्या काही दशकात समृद्धीमुळे वाढलेल्या लग्नसमारंभातील थाटामाटाच्या आणि डामडौली देखाव्याच्या पद्धतींनाही आळा बसला आहे. साध्या व सोप्या पद्धतीने लग्नकार्य पार पडत आहेत. असे छोटेखानी विवाहसोहळे समाजानेही स्वीकारले आहेत. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात नोंदणी पद्धतीने विवाह सोहळ्यांना अपरिहार्य म्हणून का होईना समाजाची स्वीकृती मिळत आहे. गतवर्षाच्या तुलनेत नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. 1 जानेवारी ते 1 जुलै या काळात 500 पेक्षा जास्त विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त विवाह मे ते जुन 2020 या तीनच महिन्यात 200 पेक्षा जास्त विवाह नोंदले गेले. गत वर्षी ही संख्या वर्षभरात 800 पेक्षा जास्त होती. या बदलाने विशेषतः मुलींचे पालक सुखावले असतील.

लग्नकार्य हा दोन कुटुंबांपुरता मर्यादित सुखसोहळा असतो. तथापि गेल्या काही वर्षांपासून अनेक खर्चिक प्रथांनी पारंपरिक लग्नसोहळ्याचे स्वरूप बदलून टाकले. ‘डेस्टिनेशन वेडिंग, थिमबेस वेडिंग, प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट’ अशा अनेक भाडोत्री प्रथा स्वीकारून हौसेला नवनवी पालवी फुटली होती. यामुळे लग्नसोहळे कमालीचे खर्चिक बनले आणि लग्न हा कौटुंबिक सोहळा राहिला नाही. त्याऐवजी जास्तीत जास्त गर्दी जमवावी, थाटमाट आणि डामडौलाने इतरांचे डोळे दिपवावे व आपल्या असल्या-नसल्या प्रतिष्ठितपणाला झळाळी चढवण्याचे ते निमित्त बनले होते. शिवाय मानपान, आहेर, देणेघेणे अशा अनावश्यक नको त्या पद्धती सुरू झाल्या. सामान्यांमध्ये नवनवीन प्रथांमुळे न्यूनगंडाची भावना वाढली.

लग्नाचे आमंत्रण ही एक साधी गोष्ट. गर्दी जमा करण्याच्या प्रयत्नात काही मंडळींची नावे दुर्लक्षित राहिल्याने पत्रिका पोचली नाही हे सुद्धा माणसांमध्ये वर्षानुवर्षे तेढीचे कारण बनू लागले. ‘नवरा-नवरी येते लग्नासाठी आणि वर्‍हाडी फक्त जेवणासाठी’ अशा कुत्सित म्हणी प्रचारात आल्या. प्रतिष्ठेचे आणि हौशीचे मोल वधूच्या कुटुंबालाच पेलावे लागते. त्यासाठी कर्ज काढण्याची, जमीन विकण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येते. त्यांचाही नाईलाज होत असावा. लग्नसोहळ्यांचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न सामाजिक संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. मानपान, देणेघेणे, आहेर, टॉवेल-टोपी अशा गोष्टींना फाटा देणारे ठराव काही समाज मंडळेही अधूनमधून करत असतात. तथापि त्यांचा प्रभाव फारसा पडत नाही. लग्नकार्यांना प्रतिष्ठेचे मोजमाप समजण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याचा तो परिणाम होता.

सामाजिक प्रथा आणि परंपरांना फाटा देणे वाटते तितके सोपे काम नाही याचा अनुभव सामाजिक संघटना घेत आहेत. पण हे काम कोरोनाच्या धसक्याने सहजपणे साध्य झाले आहे. लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक मंडळी नसावी हा सरकारी निर्बंध सुद्धा सहजपणे स्वीकारला गेला आहे. किंबहुना निर्बंध म्हणून तो मान्य करण्यापेक्षा अगदी जवळचे मित्र व नातेवाईकांसह कार्य पार पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मानापानाच्या आणि जमलेल्या गर्दीवर प्रभाव दाखवण्यासाठी अनेकांचे सन्मान करण्याची उपटसुभ प्रथेचे स्तोम लग्नासारख्या कौटुंबिक कार्यातही बेसुमार वाढले होते.

केवळ समाजदर्शनाची आणि समाजाला दर्शन देण्याची संधी म्हणून तथाकथित कार्यकर्ते आठवणीने अनेक ठिकाणी कार्यात दिसू लागले होते. त्यालाही अनायासे पायबंद बसला. नोंदणी पद्धतीने कार्य केल्यास समाजाला विधायक वळण देण्याचे श्रेयही मिळते हा अधिकचा लाभही अनेकांना नोंदणी विवाह करण्यास प्रवृत्त करत असेल. कोरोनामुळे होणारे हे बदल समाजात पुढेही चालू राहिले तर डामडौल आणि थाटामाटाच्या देखाव्याचे आकर्षण संपुष्टात येईल, निरर्थक थाटमाट थंडावेल ही अपेक्षा करावी का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com