बोलीभाषांचे भवितव्य अलक्षित ?
अग्रलेख

बोलीभाषांचे भवितव्य अलक्षित ?

Balvant Gaikwad

‘जगातील चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात भारतातील सहाशे पेक्षा जास्त भाषांचा समावेश असू शकतो. भाषांचे संवर्धन हा संस्कृती संवर्धनाचा राजमार्ग आहे. कोणत्याही भाषेचा वृथा अभिनिवेष नसावा. माणसाने अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. त्यासाठी धडपड केली पाहिजे. प्रत्येक नवी भाषा माणसाला नवे सांस्कृतिक अवकाश खुले करते. सभोवतालच्या विश्वाला आपल्याशी जोडणारा एकमेव सेतू म्हणजे भाषा! विशेषतः बोली आणि मातृभाषा संवर्धनाचे आव्हान सध्याच्या पिढीपुढे आहे. भारतात अनेक बोलीभाषा आहेत. त्या भाषांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक संचित आणि मानवी मूल्यांचा उत्कर्ष फक्त माणसेच पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवू शकतील’ असा सल्ला भाषा तज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी दिला आहे.

डॉ. देवी यांचा बोलीभाषा आणि आदिम भाषांचा दीर्घ अभ्यास आहे. त्यांचे भाषा विषयक संशोधन अविरतपणे चालू आहे. 800 पेक्षा जास्त बोली भाषांचा त्यांचा अभ्यास आहे. पीपल्स लिंग्विस्टिक्स सर्व्हे ऑफ इंडिया’ हा प्रकल्प ते चालवतात. या प्रकल्पांतर्गत बोली भाषांचा अभ्यास केला जातो. त्यांनी दिलेला सल्ला दुर्लक्ष करण्यासारखा नाही. बहुभाषिकत्व आणि बहुविविधता ही भारताची सांस्कृतिक बलस्थाने आहेत. भाषा माणसांना एकमेकांच्या जवळ आणते. त्यांच्यातील दुरावा कमी करते. म्हणूनच परक्या प्रदेशात आपली बोली बोलणार्‍या माणसांचा शोध सगळेच आवर्जून घेत असतात. अशी व्यक्ती भेटली की तिच्याशी आपलेपणाचे बंध निर्माण होतात. अनेक भाषा बोलता येणार्‍या व्यक्तीला विविध ठिकाणच्या समाजाशी सहज समरस होता येते. अशी व्यक्ती सगळीकडे लोकप्रिय होते.

आपल्या मुलांनी मातृभाषेशिवाय आणखी काही भाषा शिकाव्यात म्हणून किती पालक मुलांना प्रोत्साहन देतात? त्याने मातृभाषेतच शिकावे अशी किती पालकांची मनापासून इच्छा असते? मराठी शाळांना लोकाश्रय मिळाला असता तर मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस घटेल का? पटसंख्येअभावी अनेक सरकारी शाळा एकत्र का कराव्या लागतात? सामाजिक स्तरावरही भाषेला दुधारी तलवार बनवण्यातच काही लोकांना रस का असतो? भाषेचा उसना कळवळा का दाखवला जातो? मराठी भाषा दिन जवळ आला की हे अनेकांचे बेगडी प्रेम फसफसू लागते.

भाषा दिवस संपला की तो पूरही आटतो. मातृभाषेचे प्रेम पुतना मावशीचे प्रेम ठरते. भाषेचा उपयोग मनोमिलनाऐवजी मने दुभंगण्यासाठी केला जातो असेच देवी यांना सुद्धा सुचवावेसे का वाटले? द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार 2010 मध्ये देशात 780 भाषा अस्तित्वात होत्या. आता त्यापैकी 197 भाषांचे अस्तित्व धोक्यात आहे तर 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भाषांची उपयुक्तता आणि त्यांचे संवर्धन याचा प्रयत्न करण्याऐवजी ’ वन नेशन..वन रेशन ’ अशा अर्थहीन भोंगळ घोषणात बांधायचा अट्टाहास केला जावा? या अट्टाहासामुळे बोलीभाषा आणि मातृभाषांचा गळा घोटला जाईल, भाषेचा दुराग्रह समाजातील हेकेखोरपणा वाढवेल.

जो समाजाच्या हिताचा नसेल, अशी भीती देवी यांच्या भाषणातून व्यक्त होते. तथापि एकूण सांस्कृतिक मूल्यांकडे आधुनिक वैज्ञानिक साधनांच्या अती वापराने जगभर दुर्लक्ष होत आहे अशी परिस्थिती गेल्या पाव शतकात फार झपाट्याने वाढीस लागली आहे. सांस्कृतिक मूल्यांचा आग्रह धरणाराला कालबाह्य ठरवण्याची चढाओढ वाढत आहे. ती थांबवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक झाल्याशिवाय बोलीभाषांचे भवितव्य कोण व कसे बदलणार? गणेश देवींसारख्या अभ्यासकानेच त्यांच्या आजवरच्या अनुभवातून देशभर चांगल्या भाषाप्रेमींची फळी उभारून या दिशेने आणखी प्रयत्न करावयास हवा.

Deshdoot
www.deshdoot.com