Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखवृक्षवल्ली आम्हा सोयरी धायरी !

वृक्षवल्ली आम्हा सोयरी धायरी !

संकटे संधी घेऊन येतात. वाईटातून चांगले निष्पन्न होत असते. कोरोनामुळे अनेकांच्या संधी हिरावल्या गेल्या असतील. अनेकांचा रोजगार गेला. आजूबाजूचे वातावरण नकारात्मक आहे. तथापि या वातावरणातही आशा जागवण्याचा, सकारात्मक विचार रुजवण्याचा प्रयत्न संस्थात्मक आणि वैयक्तिक स्तरावर सुरु आहे. राज्याने म अनलॉक महाराष्ट्रफ मोहीम हाती घेतली आहे. निर्बंध उठवले जात आहेत.

पण लोकांच्या सार्वजनिक वावरण्यावरील निर्बंध काही प्रमाणात कायम आहेत. त्यामुळेच यंदाची पंढरपूरची आषाढी वारी रद्द झाली आहे. सगळ्या संतांच्या मानाच्या पालख्या ठराविक मानकर्‍यांसह दर्शनासाठी पंढरपूरला नेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या पालख्या एसटी बसमधून जाणार आहेत. यंदा वारीत खंड पडणार या भावनेने वारकर्‍यांच्या भावना अनावर आहेत. वारकरी अस्वस्थ आहेत. त्यांच्या या अस्वस्थतेला चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि काही वारकर्‍यांनी सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

माणसाने वृक्षवल्लींवर सगेसोयर्‍यांप्रमाणे प्रेम करावे, झाडे लावावीत आणि ती जगवावीत असा उपदेश सर्वच संतांनी केला आहे. वृक्षवल्लींचे दाखले देत समाजात कसे वागावे हे सांगितले आहे. मवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेफ असे तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. जेथ अमृताचेनि पाडें । मुळेंही सकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं । असे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.

सध्या वनस्पती आणि झाडांच्या अनेक जाती-प्रजाती नष्ट होत आहेत. दुर्मिळ होत आहेत. वारीच्या निमित्ताने अशा दुर्मिळ झाडांची माहिती संकलित करण्याचा उपक्रम सयाजी शिंदे यांच्या म सह्याद्री देवराई म या संस्थेने हाती घेतला आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील दुर्मिळ झाडे शोधायची. झाड कुठे आहे? किती जुने आहे? त्याची सध्याची अवस्था काय आहे? अशी दुर्मिळ झाडाची मिळेल ती माहिती संकलित करावी. पंढरपूरच्या विठोबाची आठवण करत त्या झाडाला मिठी मारावी. त्याचा फोटो काढावा. तो फोटो आणि झाडाची माहिती संस्थेकडे पाठवावी असे आवाहन सह्यादी देवराई या संस्थेने केले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यातील अशा दुर्मिळ झाडांची माहिती एकत्र केली जाईल. त्यातील सर्वात जुन्या दहा झाडांना हार घालून, त्यांचा शोध लावणारांचा ऑनलाईन सत्कारही केला जाईल असे सयाजी शिंदे यांनी जाहीर केले आहे.

या निमित्ताने झाडांची माहिती संकलित होईल. झाडांची गणना होईल. आपल्या गावपरिसरात किती जुनी झाडे आहेत याची ग्रामस्थांना माहिती मिळेल. खरे तर हे सरकारचे काम शिंदे यांनी स्वखुशीने अंगावर घेतले आहे. हे काम खूप महत्वाचे आहे. मखमलाबाद-मातोरी- मुंगसरे दरी ही नाशिकच्या पंचक्रोशीतील गावे. या गावातील वारकर्‍यांनी आणि ग्रामस्थांनी यंदाची आषाढी वारी म हरित वारीफ करायचे ठरवले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी परिसरातील दरीआई माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन त्यांनी त्या भागातील वारकर्‍यांना केले आहे. किमान 500 झाडे लागावीत असा संकल्प आहे. या कामासाठी वारकरी, दरी ग्रामपंचायत आणि दरिआईमाता युवा मंडळाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिवसभर सुरु राहील. एकदम गर्दी होऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी एकेकाने यावे असे आवाहन या संस्थानी केले आहे.

वारकर्‍यांच्या वारीसंदर्भातील भावनांना विधायक वळण देण्याचा हा प्रयत्न आहे. हे काम इतरांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. निसर्ग आणि जैवविविधतेची साखळी अबाधित राहिली तरच माणसाचे जीवन सुसह्य होईल. त्याचे अस्तित्व सुखी करायला मदत होईल. मानवी आयुष्यातील वृक्षांचे महत्व वेगळे सांगायला नको. या दोन्ही उपक्रमांना वारकरी आणि लोकांनी उत्साहाने प्रतिसाद द्यावा. हरित वारी साजरी करतील. वृक्षवल्लीतच विठोबारायांची भेट व दर्शन घ्यावे. तुळशीच्या गंधाचा अनुभव घ्यावा अशी या योजकांची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या