अग्रलेख

हात दाखवून अवलक्षण !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आपापले हक्क प्रस्थापित करून घेण्याची घाई काही वेळेला अंगलट येते. प्राथमिक शिक्षकांबद्दल न्यायसंस्थेने दिलेला निकाल हे याच प्रकारचे ‘हात दाखवून अवलक्षण’ झाले आहे. ‘प्राथमिक शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यकच आहे. अपात्र शिक्षकांना नोकरीवर राहण्याचा अधिकार नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचीच नेमणूक करावी’ असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ‘अपात्र शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शासनाने घेऊ नये. शिक्षण संस्था अपात्र शिक्षकांना नोकरी देत असतील तर संस्थाच त्यांच्या वेतनास जबाबदार असतील’ असेही न्यायालयाने बजावले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ उत्तीर्ण हवेत. 2013 पासून राज्यात या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर घेतलेल्या पहिल्याच परीक्षेत हजारो शिक्षकांची दांडी उडाली. 2014 मध्ये पहिली ते पाचवीसाठी घेतलेल्या परीक्षेत फक्त चार टक्के तर सहावी ते नववीसाठी घेतलेल्या परीक्षेत सहा टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव मुदतही देण्यात आली होती. यामुळे राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली. हे शिक्षक शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले होते. जगभर विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीची नव-नवी शिखरे गाठत आहे. बदलत्या काळाने पारंपरिक शिक्षणपद्धतीसमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. पठडीबद्ध शिक्षण आणि शिक्षणपद्धती बदलण्याची गरज शिक्षणतज्ञ व्यक्त करीत आहेत. मुलांची बुद्धिमत्ता फक्त गुणांनी तोलली जाणे अन्यायकारक ठरते. मग तोच न्याय शिक्षकांना का लागू नसावा? असे फुसके समर्थन करून आपल्या मर्जीतील बगलबच्च्यांची सोय लावण्यासाठी जनतेचा खजिना रिता करणे हा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोकप्रतिनिधी आपला हक्कच मानतात. शिक्षणपद्धती फक्त परीक्षा आणि गुणकेंद्री असू नये. ती आनंददायी आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देणारी असावी. ही काळाची गरज असून शिक्षकांनीसुद्धा ते लक्षात घेतले पाहिजे. शासनाने वाढीव मुदत देऊनही शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होत नसतील तरी त्यांचे ओझे समाजाने खांद्यावर घेतच राहावे ही अपेक्षा लोकशाहीच्या सबबीखाली कोणीही करू नये. मात्र ही परीक्षा घेऊन शासन आपल्यावर अन्याय करीत आहे, अशी केवळ स्वार्थी भूमिका शिक्षक संघटनांनी का घेतली? पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्याच शिक्षकांना नोकरीत ठेवले जाईल या शासन निर्णयाचे खरे तर संघटनांनी समर्थन करायला हवे. तसे न करता लायकी नसलेल्यांनासुद्धा समाजात शिक्षक म्हणून मिरवायला हरकत नाही, अशी भूमिका कोणीही घेऊ नये असाच दृष्टिकोन न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होतो. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आता तरी शिक्षक आणि शिक्षकांच्या संघटनांनी शहाणे व्हावे आणि शिक्षक बनण्याकरता किमान पात्रतेची आवश्यकता मान्य करावी हे बरे !

गोदावरी साक्षरता यात्रेला शुभेच्छा !

गोदावरी साक्षरता यात्रा सुरू झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेली गोदावरी सहा राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे समुद्रास मिळते. गोदावरी साक्षरता यात्राही महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमधून जाईल. आंध्र प्रदेशात तिचा समारोप होईल. यात्रारंभी सहाही राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नदीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, नदीचे पावित्र्य राखले जावे, समाज जीवनातील नदीचे अनन्यसाधारण महत्त्व समाजाला समजावून सांगावे या उद्देशाने ही यात्रा सुरू झाली आहे. पूर्वी नद्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. आचार्य काका कालेलकरांनी नद्यांना ‘लोकमाता’ म्हटले आहे. त्यावरून नदीबद्दलच्या पवित्र भावनेची कल्पना यावी. समाजाचे नदीशी सख्य होते. सौहार्दाचे संबंध होते. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये याची सामूहिक दक्षता घेतली जात असे. तथापि नद्यांचे आजचे वास्तव भीषण आहे. देशातील तीनशे दोन नद्या प्रदूषित आहेत. सर्वाधिक प्रदूषित असलेल्या एकोणपन्नास नद्या महाराष्ट्रातून वाहतात. त्यापैकी तापी ही मोठी नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. काही नद्या लुप्त होत आहेत. जलप्रदूषणामुळे अनेक नद्यांचे नाले झाले आहेत. घरगुती आणि कारखान्यांतील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते गोदावरीत सोडून देण्यात आले आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी उत्तर भारताप्रमाणेच मलजलवाहिन्याही थेट गोदावरी पात्रात सोडलेल्या आहेत. लोक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून निर्माल्य नदीत टाकतात. गाड्या व कपडे नदीपात्रातच धुतात. अनेक ठिकाणी कचराही पात्रात टाकला जातो. नदीकाठावरच नाशिकचा आठवडे बाजार भरतो. भाजीविक्रेते सगळ्या भाज्या नदीपात्रात धुतात. राज्यातील अन्य प्रदूषित नद्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. गाव आणि शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जलप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. साथीचे आजार पसरतात. जलप्रदूषण हे अनेक दुखण्यांचे मूळ ठरते. प्रदूषणामुळे एखादी नदी लुप्त झाली तर त्या बरोबरीने स्थानिक संस्कृती, बोलीभाषा आणि तेथील स्थानिक समाजजीवन प्रदूषित होते. पाणीच उपलब्ध नसेल तर माणसासमोर स्थलांतराशिवाय कुठलाच पर्याय नसतो. याविषयी समाजात जनजागृती करणे, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर काँक्रिटीकरण केल्याने गोदावरी मृतवत झाल्याचे लक्षात आणून देणे, काँक्रिटीकरण काढून नदी पुन्हा प्रवाहित करणे, गोदावरी खोर्‍याचा कृती आराखडा तयार करणे, समाजाला एकत्र आणणे हेही यात्रेमागचे उद्देश प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी सांगितले आहेत. या यात्रेनिमित्ताने नदीचे व पाण्याचे महत्त्व समाजाच्या पुन्हा एकदा लक्षात येईल, समाजात जागरुकता वाढेल आणि समाज नदीकडे डोळसपणे पाहायला शिकेल, अशी आशा करूया!

Deshdoot
www.deshdoot.com