Saturday, May 11, 2024
Homeअग्रलेखथेंबे थेंबे पाणी साचे!

थेंबे थेंबे पाणी साचे!

अवघ्या 8-9 महिन्यांपूर्वी राज्यातील जवळपास सर्व धरणे पाण्याने तुंडूंब भरली आहेत अशा दिलासादायक बातम्या झळकल्या होत्या. सप्टेंबर 2021 अखेर राज्यातील 27 धरणे शंभर टक्के तर 41 धरणे जवळपास 90 टक्के भरली होती. उर्वरित धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा असल्याचे सांगितले जात होते.

मराठवाड्याला तर अतीवृष्टीने झोपडले होते. त्यावेळी राज्याला 2022 मध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे राज्यकर्त्यांसह जनतेलाही वाटले होते. तसे वृत्त अधूनमधून माध्यमात प्रसिद्धही होत होते. पण 2022 च्या मे महिन्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावला असल्याचे माध्यमात जाहीर झाले आहे. एप्रिल अखेर राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने माध्यमांना दिली आहे. तात्पर्य, जनतेला यंदाही कदाचित पाणीटंचाईला सामारे जावे लागू शकेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील अनेक दुर्गम आणि अती दुर्गम गावांच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे हा भाग वेगळा. तथापि पाण्याचा वापर शहाणपणाने केला गेला नाही तर आगामी दोन-तीन दशकांनंतरच तीव्र पाणीटंचाईला कायमचे सामोरे जावे लागेल असाच निष्कर्ष विविध सर्वेक्षणांच्या अहवालांमध्ये शास्त्रज्ञांनी नमूद केला आहे. देशातील 30 पेक्षा जास्त शहरांमध्ये जलसंकट तीव्र असेल असे वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडने केलेल्या सर्वेक्षणात नमूद आहे. तथापि राजकारणी मात्र भोंगे आणि सोंगे यातच मग्न आहेत.

जनतेने पाणी वाचवावे, मातीचे संवर्धन करावे, निसर्गानुकूल पद्धतीने शेती करावी आणि राजकारण्यांनी मात्र कायम कुरघोडीचे राजकारण करत राहावे अशीच सध्याची परिस्थिती आहे. यातुन आपल्यालाच योग्य तो बोध घ्यायला हवा याची जाणीव बहुधा लोकांना झाली आहे. राजकीय पातळीवर जाणीवांचा दुष्काळ जनतेच्या अनुभवास येत असताना सामाजिक पातळीवर मात्र जाणीवा जागृत होत असल्याचा अनुभव सामान्य लोक घेत आहेत. 2016 साली लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. लातुरकरांनी त्यावेळी भीषण पाणीटंचाईचा सामना केला होता. पण त्या अनुभवातुनच लातुरकर शहाणे झाले असावेत. लातुरकर आणि विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने पाणीसंवर्धन क्षेत्रात जाणीवपूर्वक काम केले. पावसाचे पाणी अडवून कसे जिरवावे याचे प्रशिक्षण लोकांना देण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रांमध्ये 50टक्के पाणी आहे. भूजल पातळी 3 मीटरने वाढली आहे. मे महिन्यातही जलसाठा समाधानकारक आहे.

गुजरातमधील पालनपूर शहरातील दोनशेपेक्षा जास्त कुटुंबांनी पाणी संवर्धनाचा अनोखा आदर्श जनतेला घालून दिला आहे. ही मंडळी प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या स्वाध्याय परिवाराशी निगडित आहेत. ही कुटुंबे पावसाचे पाणी साठवतात. त्यासाठी प्रत्येक घराच्या तळघरात पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. त्यात पावसाचे पाणी साठवले जाते. ते पाणी स्वच्छ करुन पिण्यासाठी देखील वापरले जाते.

राजकोट परिसरातील रहिवाशांनी साधारणत 15 हजार विहिरी या रीतीने पुनरुज्जीवित केल्या आहेत. काही सोसायट्यांमध्ये तर प्रत्येक घरात पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आढळते. ही उदाहरणे प्रेरणादायी आहेतच पण अशा प्रयोगांची संख्या वेगाने वाढायला हवी. शासकीय इमारतींवर पावसाचे पाणी साठवणे बंधनकारक आहे. त्याची मनापासून अंमलबजावणी व्हायला हवी.

काही ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यांचे नवीन इमारतींचे आराखडे त्या सोयीविना मान्य होत नाहीत. या वेगवेगळ्या प्रयोगातून जाणवणारी जलसंवर्धनाची धडपड आता प्रत्येक नागरिकाने मनावर घेणे जरुर आहे. घरातील पाण्याच्या वापराचा अपव्यय थांबवणे आणि शक्य त्या प्रकारे घरावर पडणारे पावसाचे पाणी साचवणारे उपक्रम कृतीत आणणे जरुर आहे. विविध संस्थांनी दिलेले संभाव्य पाणीटंचाईचे इशारे सर्वांनीच मनावर घ्यायला हवेत. तसे ते घेतले जातील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या