Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखजात कोणती पुसू नका...!

जात कोणती पुसू नका…!

समाजात जातीपातीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. शतकानुशतके अनेक संतमंडळी समाजाला जात नाकारण्याचा उपदेश करत आहोत. हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे कितीही मोठेपण आग्रही भारतीय गात असतात. मात्र जातीपातीच्या शापातून हिंदूंनी मुक्त व्हावे असे मात्र कोणालाच वाटत नाही. कारण जातीपातींची विभागणी सुद्धा काही विशिष्टांना पिढ्यानपिढ्या सर्व प्रकारच्या फायद्याचे व अनुकुलतेचे झुकते माप देत आहे. साहजिकच त्या लाभार्थींना जातींची ओळख नष्ट व्हावी असे कसे वाटणार? माणसांच्या मनातील जात हद्दपार व्हावी हा प्रचार जितक्या जोमाने चालतो त्यापेक्षा कैकपटींनी प्रभावीपणे जात टिकून राहावी असे मानणारेच समाजात केवळ जातीच्या भांडवलावर वर्चस्व गाजवत आहेत. पण निदान उत्तर महाराष्ट्रातील रस्ते आणि वाड्या वस्त्यांच्या नावातून तरी जात हद्दपार करण्यात नाशिक महसूल आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील रस्ते, वाड्या आणि वस्त्या यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय राज्याच्या समाजकल्याण विभागाने घेतला. त्याची प्रभावी अंमलबजावणी नाशिक विभागात झाल्याचे महसूल आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक विभागातील साधारणत: साडेसोळाशे वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात महसूल विभाग यशस्वी झाला आहे. या वाड्या-वस्त्या आता क्रांतीनगर, समतानगर, शाहूनगर अशा नव्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. हे सामाजिक परिवर्तन घडवण्यात नाशिक जिल्हा आघाडीवर असून धुळे जिल्ह्यात मात्र अद्यापपर्यंत एकही जातीवाचक नाव बदलले गेलेले नाही असे सांगितले जाते. गल्ल्या, वाड्या आणि वस्त्यांची जातीवाचक नावे ठेवण्याचा प्रघात सगळीकडेच आढळतो. सोनार आळी, तेली गल्ली किंवा तांबट आळी अशी गल्ल्यांची नावे असतात. तर ढोर वस्ती, मांगवाडा, बौद्ध वाडा, बाह्मणवस्ती अशी वाड्या आणि वस्त्यांची नावे असतात. त्या त्या जातीचे लोक त्यात्या ठिकाणी मोठ्या संख्येने वस्तीला असावेत अशी लोकांची कल्पना होती. वर्षानुवर्ष सामाजिक जीवनात मुरलेली अशी जातीवाचक नावांची ओळख पुसून नवी ओळख बहाल करणे वाटते तितके सोपे नाही. कारण जातीपातीची मुळे माणसांच्या मनामनात खोलवर रुजवली गेली आहेत. जातीपातींचा पगडा संपुष्टात यावा अशी समाजसुधारकांची देखील इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खस्ताही खाल्ल्या. शिकलेली माणसे तर्कसंगत विचार करतील. त्यांना बर्‍यावाईटाची चांगली जाणीव झाली की ते जातीपातींचा पुरस्कार करणार नाहीत अशा समाजसुधारकांच्या अपेक्षा होत्या. इतिहास बदलण्याचा अट्टाहास करणारी मंडळी जातीपातीच्या किडीपासून समाज मुक्त होण्यासाठी मात्र आग्रही का नसावीत? समाजसुधारकांनी समाजाला अनेकार्थांनी साक्षर करण्यासाठी शैक्षणिक चळवळ उभारली. सर्वांसाठी आणि विशेषत: वंचितांच्या मुलांसाठी शाळा आणि आश्रमशाळा काढल्या. संस्था उभ्या राहिल्या. त्या सुविधांचा लाभ घेऊन ’नाही रे’ वर्गातील अनेक मुलेही उच्चशिक्षित झाली, होत आहेत. पण जात मात्र अद्यापपर्यंत हद्दपार झालेली नाही. जातीपातींचा पुरस्कार करण्याला सर्वांनी जमेल तसा हातभारच लावला. अगदी वाड्या वस्त्यांची नावे बदलण्याला देखील काहींनी आक्षेप घेतल्याचे वृत्त माध्यमात झळकले होते. राजकीय स्वार्थासाठी जातीपातींचा वापर करणारे राजकीय पक्ष आणि त्यांना जडलेला जातपात विषयक समाजविघातक रोग याविषयी काय बोलावे? यासंदर्भात सर्वांचीच परिस्थिती ‘उडदामाजि काळे गोरे, काय निवडावे निवडणारे’ अशीच अजुनही आहे. राजकीय मंचावर जातीपातींच्या विरोधात नारे द्यायचे आणि पडद्यामागे मात्र जातीपातींची उतरंड रचायची आणि त्यावरच मतपेढ्या तयार करुन आपापली पोळी भाजली जाते हेच लोक नित्य अनुभवत आहेत. जातींचा पगडाही इतका घट्ट आहे की वाड्या-वस्त्यांच्या जातीवाचक नावांमध्ये लोकांनाही कधी काही गैर वाटले नाही. आता मात्र नाशिक विभागातील साडेसोळाशे वाड्यावस्त्यांना नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या नावातून जात वगळली गेली आहे. असेच छोटे छोटे प्रयोग आणि प्रयत्न लोकांच्या मनातून जात हद्दपार करण्याचा रस्ता प्रशस्त करतील. त्यामुळे उर्वरित सर्वत्र या निर्णयाची कसोशीने अंमलबजावणी व्हावी. राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी निदान या मुद्याचे तरी राजकारण करणार नाहीत आणि तोंडदेखले का होईना ‘हे कार्य झपाट्याने झालेच पाहिजे’ असा शाब्दिक पाठिंबा निश्तितच देतील. सरकारने घेतलेल्या या प्रागतिक निर्णयाला सर्वांची मनापासून साथ मिळेल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या