
हंगामी पाऊस साहित्यिकांना आणि विशेेषत: कवींना नेहमीच भुरळ घालतो. पावसाळ्यात कवींच्या आणि साहित्यिकांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटतात. कोणा कवीला हा पाऊस रोमँटिक वाटतो तर कोणाला खट्याळ. ‘कोसळली सर दक्षिण उत्तर, घमघमले मातीतून अत्तर’असे वर्णन मंगेश पाडगावकर करतात. तर ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’असे पावसाचे कौतूक ना.धो.महानोर करतात. तथापि पाऊस म्हटले की सामान्य माणसांच्या नजरेसमोर उभे राहाते ते रस्त्यांचे पावसाने झालेले खड्ड्यांचे वास्तव. खड्ड्यात गेलेले रस्ते, नदी नाल्यांमधून वाहाणारे गटारीचे पाणी, पावसाचे पाणी जागोजागी तुंबलेले रस्ते आणि जाम झालेली वाहतूक. यापलीकडे सामान्य माणसांचा आणि पावसाचा संबंध कदाचित उरलेला नसावा. कवींना खुणावणार्या हिरव्या आणि गंधभारल्या पावसाशी सामान्य माणसांचे नाते कधीच तुटलेय. त्याच्या नशिबी आहेत फक्त रस्त्यातले दरवर्षी वाढत जाणारे खड्डे, जागोजागी साठलेला चिखल आणि गाळ. यंदाचा पावसाळाही त्याला अपवाद नाही. राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने रस्त्यांची दैना उडवली आहे. हमरस्त्यांसह अगदी गल्लीबोळातील रस्तेही उखडले आहेत. खड्डे आधी की रस्ते आधी? असा प्रश्न वाहनचालकांना पडावा अशीच सध्याची परिस्थिती आहे. नाशिकमध्येही सगळीकडचेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. वाहतुकीचा पार बोजवारा उडला आहे. सीबीएस ते मुंबई नाक्यापर्यंतचे अंतर जेमतेम 2 किलोमीटर असेल. ते अंतर पार करायला वाहनांना अर्धा पाऊण तास लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्तोरस्ती लागत आहेत. वाहतूक जाम निस्तरतांना पोलीसांच्या नाकी दम येत असून वाहनचालकांमध्येही वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात नाशिकमधील सराफ बाजारात, गोदेकाठच्या परिसरात आणि जागोजागी पाणी तुंबणार नाही असे सांगितले जात होते. स्मार्टसिटीकडुनही त्याचा वारंवार उच्चार केला जात होता. पण ते आश्वासन पहिल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. संततधार पावसामुळे शहराच्या सखोल भागात पाणी भरते आहेे. चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात बुडत आहेत. याच रस्त्यांच्या दुरुस्तीवर गेल्या दोन वर्षात साडेचारशे कोटी रुपये खर्च झाल्याची शेखी मिरवली जाते. राज्यात इतरत्र परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी हे माध्यमांमध्ये झळकत असलेल्या ठिकठिकाणच्या वृत्तांवरुन लक्षात येते. दरवर्षीच असे का घडते? पहिल्याच पावसात रस्ते का उखडतात? याला नेमके जबाबदार कोण? रस्ते दुरुस्तीचे निकष का पाळले जात नाहीत? निकष पाळले नाही तरी कोणीच वाकडे करु शकत नाही हा भ्रम कोणामुळे जोपासला जात आहे? यामागे कोणते अर्थकारण दडलेले असते? नागरिक हतबल असतात हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण प्रशासन आणि शहरांचे कारभारीही हतबल का ठरतात? परदेशात जाउन येणारे लोक परदेशातील रस्त्यांचे कौतूक करताना थकत नाहीत. परदेशात रस्ते कसे बांधतात याचा अभ्यास करण्यासाठी लोकप्रतिनिधींची शिष्टमंडळे अधूनमधून दौर्यावर जात असतात. आपल्या देशातही तसेच रस्ते करु अशा वल्गनाही काही जण करतात. पण ते लोकांच्या अनुभवास आजवर तरी आलेले नाही. रस्ते गुळगुळीत होतील तेव्हा होतील पण तोपर्यंत प्रशासन एक उपाय तरी करुन बघेल का? रस्त्यांना ते बांधणार्या ठेकेदारांचीच नावे द्यावीत. त्यामुळे निदान त्यांच्या नावाची लाज राखण्यासाठी का होईना दर्जेदार रस्ते बांधण्याची काळजी ठेकेदार कदाचित घेऊ लागतील. असे झाले दर पावसाळ्यात लोकांना होणारा मनस्ताप तरी टळेल. सरकारला मिळणारे शिव्याशापही कदाचित कमी होतील. प्रशासन हा उपाय अंमलात आणून पाहिल का?