Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखआपत्ती पर्यटनाची हौस आवरली जाईल?

आपत्ती पर्यटनाची हौस आवरली जाईल?

राज्याच्या अनेक भागात दरवर्षीच्या पावसाळ्यापेक्षा कितीतरी जास्त हानी झाली आहे. ठिकाणी दरडी कोसळल्या. त्याखाली काही वाड्या-वस्त्या गाडल्या गेल्या. जीवितहानी आणि वित्तहानीही भरपूर झाली. त्रंबकेश्वरला गंगाद्वार येथेही मोठे दगड ढासळले.

गोदावरी मंदिरासमोरील कुंडाची हानी झाली. एकूण आपत्तीत २००पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. किमान चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आणि नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि केंद्रात संधी मिळालेले आदींचे दौरे सुरु आहेत. नंतर मात्र हौशे, नवशे आणि गवशे असे सर्वच आपत्ती पर्यटक बनतात व आपत्तीग्रस्तांना भेटी दिल्याचे समाधान मिळवतात. नेते दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत आहेत. पूरपरिस्थितीचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मदत जाहीर केली जाईल असे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. तरीही नेत्यांच्या दौर्‍यांमध्ये घट झालेली नाही. रोज वेगवेगळे नेते दौर्‍यावर जातच आहेत.

- Advertisement -

आपत्ती हा पर्यटनाचा विषय होऊ नये, नेत्यांनी आपत्तीग्रस्त भागात अनाठायी दौरे काढू नयेत, यंत्रणेला काम करू द्यावे असा अनुभवी सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला आहे. राज्याच्या कोणत्याही भागात आपत्ती कोसळली की नेते लगेच त्या भागात जाऊन धडकतात हा नेहमीचा अनुभव आहे. नेत्यांच्या दौर्‍यांचे त्यांच्या दर्जानुसार यंत्रणेने पाळावयाचे शिष्टाचार ठरलेले आहेत. कोणत्या अधिकार्‍यांनी कोणत्या दौर्‍याप्रसंगी उपस्थित राहावे याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे दौरा कोणत्याही नेत्याचा असला तरी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्यांच्या दिमतीला हजर राहावे लागते.

वास्तविक कोणत्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यावर संबंधित स्थानिक यंत्रणेने आपत्तीग्रस्तांच्या भावना जाणून घेऊन त्यांना जमेल तशी तातडीचे सहकार्य करणे अपेक्षित असते. तथापि विविध नेत्यांच्या दौर्‍यांमुळे आपत्तीग्रस्तांच्या गरजा बाजूला सारून त्यांना नेत्यांच्या सरबराईकडेच लक्ष पुरवावे लागते. नेत्यांच्या अशा दौर्‍यांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, बचाव आणि मदत कार्यात अडथळे येतात असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे. अनेक जाणकार आणि निवृत्त सनदी अधिकारीही अनौपचारिक चर्चेत पवार यांचा सल्ला योग्य असल्याचे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात असे काही अनुभव घेतल्याचे मत व्यक्त करतांना आढळतात. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यम्’ असे एक संस्कृत वचन आहे.

चांगला सल्ला बालकाकडून जरी दिला तरी तो मोठ्यांनीही स्वीकारला पाहिजे असा या वचनाचा अर्थ आहे. शरद पवार तर जाणते नेते आहेत. त्यांचे बोट पकडूनच आपण राजकारण करायला शिकलो असे खुद्द पंतप्रधानांनीही एकदा जाहीरपणे सांगितले आहे. शरद पवारांचे देशाच्या राजकारणातील ज्येष्ठत्व पक्षातीत मान्यता पावलेले आहे. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना चांगला आणि व्यवहार्य सल्ला दिला आहे. हा सल्ला सरकारकडून दिला गेला तर त्यातून तर्‍हेतर्‍हेचे अर्थ किंवा अनर्थ काढले जातील. तो राजकीय विश्लेषकांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. शरद पवार यांनी दिलेला सल्ला कठोरपणे अंमलात आणला गेला तर आपत्तीच्या काळात यंत्रणेला नेमून दिलेले काम करता येईल आणि जनतेचा क्षोभ शमवण्यास मदतच होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या