वैद्यकीय सेवेत एक नवा प्रयोग
अग्रलेख

वैद्यकीय सेवेत एक नवा प्रयोग

Balvant Gaikwad

मुंबई मनपाचे 15 दवाखाने सध्याच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त दररोज सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या वेळेत प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुंबई शहरात मनपाचे 175 दवाखाने आहेत. त्यातील बहुतेक ठिकाणी सकाळी 9 ते 4 या वेळेत रुग्णांची तपासणी आणि उपचार केले जातात.

तथापि त्या नियमित वेळेतसुद्धा डॉक्टर उपलब्ध असतील तरच रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था होते. मनपा दवाखान्यांत खासगी डॉक्टर्सदेखील उपचार करतात, पण त्यांच्या भेटीचे वार-वेळाही ठरलेल्या असतात. मात्र त्या डॉक्टरांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जातेच असे नाही. माणसाला वेळ ठरवून आजारी पडता येत नाही. चालता-बोलता माणूस अचानक अस्वस्थ होऊ शकतो. त्याला त्वरित रुग्णालयात न्यावे लागते, पण सायंकाळी अचानक आजारी झालेल्या व्यक्तीला दुसर्‍या दिवशी सकाळी दवाखाना सुरू होईपर्यंत तपासणी आणि उपचारांची वाट पाहावी लागते.

कष्टकरी वर्गाची यात मोठी गैरसोय होते. रोजंदारीवर काम करणारी आणि हातावर ज्यांचे पोट चालते अशी माणसे सकाळी कामावर जातात ती संध्याकाळी उशिरा परत येतात. काम केल्याशिवाय त्यांच्या पोटापाण्याची सोय कशी होणार? अशा कामगारांना आजारी पडल्यानंतर दवाखान्याची वेळ गाठण्यासाठी कामावर सुटी टाकणे परवडेल का? खासगी वैद्यकीय सेवा भयंकर महागली आहे. खासगी रुग्णालयांतील तपासणी शुल्कदेखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. सरकारी आरोग्यसेवाही तशी तुटपुंजीच आहे.

यंत्रणा आहे तर प्रशिक्षित सेवकवर्ग नाही आणि जेथे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते तेथील यंत्रणा कधी-कधी बंद पडलेली असते. वैद्यकीय अधिकारी हजर असतील व वेळेत उपचार होतील याची खात्री आजपर्यंत कोणी देऊ शकले का? डॉक्टर, सरकारी सेवक व रुग्णांत संवाद हीसुद्धा सध्या नवलाईची बाब बनली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत अनेकदा हाणामारीचे प्रसंग घडतात.

रुग्णालयातील सामानाची मोडतोड केली जाते. ही वस्तुस्थिती माहिती असूनही समाजाचा फार मोठा हिस्सा वैद्यकीय सेवेसाठी सरकारी दवाखान्यांवरच अवलंबून असतो. गरजूंकडे दुसरा पर्यायही नसतो. रात्री उशिरापर्यंत पालिकेचे दवाखाने सुरू राहिल्यास गरजूंची नक्कीच जादा सोय होईल. या निर्णयातून जनतेबद्दलची निर्णय घेणार्‍यांच्या मनातील तळमळ नक्कीच व्यक्त होते.

तथापि त्या निर्णयाच्या यथायोग्य अंमलबजावणीकडेही संबंधितांना जागरुकपणे लक्ष द्यावे लागेल. सायंकाळची जादा वैद्यकीय सेवा सार्वजनिक-खासगी तत्त्वावर चालवली जाईल, असे सांगितले गेले आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील वैद्यकीय सेवेला आणखी एक स्वागतार्ह आयाम प्राप्त होईल. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या शहरांतील शासकीय रुग्णालयांतसुद्धा त्याचे अनुकरण आणि अंमलबजावणी होऊ शकेल.

Deshdoot
www.deshdoot.com