मानसिकता बदलायला हवी !
अग्रलेख

मानसिकता बदलायला हवी !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. थोड्याच दिवसांत दहावीची परीक्षा सुरू होईल. गेल्या काही वर्षांपासून या परीक्षांच्या तारखा व वेळापत्रक जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण वाढतो. सर्वसाधारण बुद्धिमत्तेची मुले अस्वस्थ होतात. खरे तर अन्य शालेय इयत्तांच्याही परीक्षा वर्षानुवर्षे होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1966 सालात अस्तित्वात आले. कदाचित त्याच्याही आधीपासून दहावी-बारावीच्या परीक्षा होतच आल्या आहेत. तथापि दहावी-बारावी परीक्षांना वेगळे वलय का प्राप्त झाले? या परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला? त्याच परीक्षांचे विद्यार्थी तणावात का येतात? याचा विचार कोणी करीत आहेत का? प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीला नवे वळण देणार्‍या असतात. विद्यार्थ्यांनाही याची जाणीव असते. तथापि पालकांच्या वाढत्या अपेक्षा हल्ली विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अडसर बनत आहेत का? या दोन्ही परीक्षांमध्ये गुणांच्या टक्केवारीला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या टक्केवारीतील वाढती स्पर्धा विद्यार्थ्यांवरचा मानसिक ताण वाढवते. पालकांना मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. तथापि कुठल्याही विषयातील तीन तासांची परीक्षा व त्यात मिळणारे गुण हेच मुलांच्या हुुशारीचे गमक का ठरवले जाते? शिक्षणाचा हेतू केवळ परीक्षाकेंद्री झाला व विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा मुद्दा नजरेआड गेला. त्यांच्या अंगी किती कौशल्ये आहेत? कोणत्या विषयात त्यांना रस आहे? यापेक्षा त्याने परीक्षेत किती गुण मिळवले आहेत यालाच महत्त्व का प्राप्त झाले? आपल्या पाल्याची कुवत आहे की नाही यापेक्षा त्याने अमूक टक्के गुण मिळवलेच पाहिजेत, असे हल्ली पालकांना वाटते. ‘तसे झाले नाही तर?’ या शंकेने मुले परीक्षेआधीच अस्वस्थ होतात आणि बहुतेक विद्यार्थी त्याच मानसिकतेत परीक्षेला सामोरे जातात. परीक्षांचे निकाल लागल्यानंतर दरवर्षी काही विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलतात आणि विपरित घटना घडतात. संबंधित सर्व घटकांचा दृष्टिकोन परीक्षाकेंद्री होण्यामागे शालेय शिक्षणपद्धतीतील उणिवाही कारणीभूत आहेत. त्या दूर करायचा प्रयत्न होताना आढळत नाही. शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजनांचा साकल्याने विचार व्हायला हवा. तथापि आपल्या पाल्याच्या बाबतीत असे होऊ नये, त्याने कोणताही ताण न घेता परीक्षांना सामोरे जावे व त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चतुरस्त्र विकास व्हावा याकडे पालक हल्ली कितीसे लक्ष देतात? हाताची पाचही बोटे सारखी नसतात. करोडो लोकसंख्येत प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते हे पालकांना समजावून घ्यावे लागेल. मुले हुुशार झाली पाहिजेत ही पालकांची अपेक्षा गैर नाही, पण केवळ दहावी किंवा बारावीच्या परीक्षेतील यश हेच त्याचे एकमेव मोजमाप ठरावे का? पाल्याच्या अंगी ज्या विशेष क्षमता असतील त्यांचा विकास व्हावा यासाठी किती पालक प्रयत्न करतात? पालकांची मानसिकताच परीक्षेतील गुणावलंबी झाली आहे. ती बदलल्याशिवाय पाल्यांवरील गुण मिळवण्याचा ताण कसा हलका होणार?

धरसोडवृत्ती बाधक !

‘देशात व्यावसायिक प्रशिक्षणाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एखादी व्यक्ती शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करते तेव्हा जाणवणार्‍या अडचणी लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीत बदल घडवण्याचा प्रयत्न मात्र होत नाही. मुलांचे शिक्षण संपल्यानंतरही पालकांनी शिक्षण क्षेत्रातील घडामोडींविषयी जाणून घेतले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कल्पना आणि विद्यार्थ्यांची आवड ही भविष्यातील शिक्षणाची परिमाणे असणार आहेत. तंत्रज्ञान भविष्य व्यापून टाकणार आहे. तथापि पुढील काळात उपयुक्त ठरेल असे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठे समाजापासून तुटत आहेत‘ अशी खंत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पुरेशा कौशल्यांचा अभाव आहे, भारतातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त तरुणाईकडे रोजगारासाठीच्या कौशल्यांचा अभाव आहे, असे ‘युनिसेफ’च्या एका अहवालात म्हटले आहे. कौशल्य प्रशिक्षित करण्यासंदर्भात दर्जेदार प्रशिक्षकांचा अभाव, प्रशिक्षण कार्यक्रमांची अयोग्य वेळ, वेळखाऊ प्रमाणपत्र प्रक्रिया अशा अनेक आव्हानांचा सामना तरुणांना करावा लागतो. भारतातील बहुतेक शिक्षण संस्था कालबाह्य अभ्यासक्रम शिकवतात, असे निरीक्षण ‘युनिसेफ’ने या अहवालात नोंदवले आहे. शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्यांचा अभ्यास करण्याची जाणीवसुद्धा फारशी आढळत नाही. तथापि सरकार बदलले की शैक्षणिक निर्णय मात्र भराभर बदलले जातात. सगळ्यांनाच आपापले निर्णय बरोबर आणि कालसुसंगत वाटतात. पूर्वसुरींपेक्षा नवे काही केले, असे समाधान मिळवण्याचा तो तोकडा प्रयत्न असतो. एक समिती आठवीपर्यंत परीक्षा घ्यायच्या नाहीत असा बदल सुचवते. तो अंमलात येऊन फार काळ लोटत नाही तोच दुसरी समिती पुन्हा परीक्षा घ्यायला सांगते. शिक्षण संस्थांत शिक्षक असावेत की शिक्षण सेवक? ते पूर्णवेळ असावेत की अर्धवेळ? पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे म्हणून अनेक शिबिरे घेतली जात. त्यात सहभागी होणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असायचे. आताही शिबिरे होतात, पण मनापासून किती विद्यार्थी त्यात सहभागी होतात? त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शिक्षण संस्था करतात का? शाळांची मैदाने आक्रसली तसे खेळांचे नमूद ताससुद्धा दुरावले. परीक्षांचे आयोजन आणि निकालांमधील गोंधळ ही नेहमीची समस्या आहे. आपाल्या चष्म्यातून शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा चुकीचा पायंडा पडला आहे. व्यापक दृष्टिकोनाऐवजी संकुचित व्यक्तिगत प्रभाव वाढला आहे. त्यामुळे शिक्षणाची ओढाताण सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील पायाभूत मुद्यांबाबतही संभ्रमावस्था असेल तर बदलत्या काळाचा वेध घेऊन त्यानुसार शिक्षणपद्धतीत आणि अभ्यासक्रमात बदल कसा होणार? तो कोण करणार? कोणी बदल करायचे ठरवले तर त्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले जाते का? या सर्व समस्यांचा साकल्याने विचार करण्याची पद्धत संबंधित जाणकार स्वीकारतील का?

Deshdoot
www.deshdoot.com