संकटमालिका, नैसर्गिक आणि मानवनिर्मितही!

‘करोना’ कहराने समस्त मानवजातीला वर्षभरापासून वेठीस धरले आहे. अलीकडे त्याचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याची आशा पल्लवित झाली आहे. प्रतिबंधक लसही शोधली गेली आहे. आज वापर सुरु होणार, उद्या वापर सुरु होणार, अशा घोषणांची मालिका दूरचित्रवाणीवरील मालिकांप्रमाणे सुरु आहे.

अशा वेळी अधिक वेगाने पसरणारा ‘करोना’चा नवा अवतार अनेक देशांत अवतरला आहे. त्यामुळे जग पुन्हा भयभीत झाले आहे. पृथ्वीवरील मानव संकटातून सावरण्याच्या प्रयत्त्नात असतानाच आता पक्षीजातींवर बर्ड फ्लूची संक्रांत आली आहे. डिसेंबर महिन्यात जपानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला. आता तो भारतातही पोहोचला आहे. संकटे येताना एकटी-दुकटी येत नाहीत. ती एकापाठोपाठ एक येतात, असा समज समाजात दृढ आहे. मात्र ‘करोना’ महामारीनंतर आलेली त्याची दुसरी प्रजाती आणि त्यानंतर पक्ष्यांचा बळी घेणार्‍या ‘बर्ड फ्लू’ची संक्रांत पाहता तो समज खरा ठरू पाहत आहे

. ‘करोना’ विषाणू विमानात बसून प्रवाशांसोबत भारतात पर्यटकासारखा आला आणि त्याने भारतातच मुक्काम ठोकून भारतीय समाजाला नको-नकोसे करून सोडले. त्यालाही पुरातन, सनातन संस्कृतीनिष्ठ भारत आवडला असावा. थंडीच्या दिवसांत दरवर्षी अन्ना-पाण्याच्या शोधात अगणित ‘पाहुणे’ पक्षी भारतात येतात. हिवाळा संपेपर्यंत मुक्काम करतात. हिवाळा संपल्यावर मायदेशी परततात. माणसाने आखलेल्या सीमांची त्यांना पर्वा नसते.

हे परदेशी पाहुणे भारतात विनाअडथळा येतात. त्यासाठी त्यांना ना पारपत्र लागते; ना कुठलाही व्हिजा! पण यावेळी भारतात आलेल्या पाहुण्या पक्ष्यांनी येताना सोबत ‘बर्ड फ्लू’चा वाणोळा आणला असावा. तोच आता देशात पसरत आहे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी बांधला आहे. तो किती खरा ते अजून स्पष्ट व्हायचे आहे. मात्र पक्ष्यांचा हा आजार देशातील दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आदी 9 राज्यांत पसरला आहे. आता त्याने महाराष्ट्रातही शिरकाव करून धोक्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत कावळा, बगळा, कबुतर, बदक, पोपट तसेच कोंबड्या आदी प्रकारचे हजारो पक्षी मृत्यमुखी पडले आहेत, अशा बातम्या झळकल्या आहेत.

बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्राणी संग्रहालयातील काही पक्षीही दगावले आहेत, असेही सांगितले जाते. पक्ष्यांच्या मृत्यूने लोक पुन्हा घाबरले आहेत. मकरोनाफ माणसे मारत आहे तर आता ‘बर्ड फ्लू’ पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. परिणामी व्यवसायाला आर्थिक फटका बसण्याच्या भीतीने कुक्कुटपालन व्यवसायिक चांगलेच हादरले आहेत.

‘करोना’च्या सुरुवातीच्या काळातसुद्धा अंडी आणि चिकन खाण्याचा मोह खवय्यांना आवरावा लागला होता. कुक्कुट उत्पादकांना अक्षरशः कमी पैशांत तर काही ठिकाणी फुकटात आपल्याकडील कोंबड्या लोकांना बळे-बळे वाटाव्या लागल्या होत्या. कोंबड्यांमुळे ‘करोन’बाधा होत नाही याची खात्री पटवण्यासाठी कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संघटनांनी बिर्याणी पार्ट्या आणि महोत्सवाचे आयोजन करून लोकांच्या मनातील भीती घालवण्याचे प्रयत्न तेव्हा केले होते.

आतासुद्धा लोक घाबरून अंडी, चिकनकडे पाठ फिरवतील का? याची फिकीर कुक्कुटपालन व्यवसायिकांना लागल्यास आश्चर्य वाटू नये. निसर्गातील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याबद्दल सामान्य जन फारसे गंभीर नसावेत, पण कोंबड्यांच्या अकाली मृत्यमुळे मात्र खवय्ये नक्कीच काळजीत पडले असतील. केंद्र आणि राज्य सरकारचा पशुसवंर्धन आणि डेअरी विभाग याबाबत सतर्क झाला आहे. माणसांना ‘करोना’ने ग्रासले तेव्हा काही प्राण्यांनाही माणसांपासून त्याची बाधा झाल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या. ‘करोना’ला घाबरून माणसे घरांत लपून बसली होती. पक्षी मात्र निर्भयपणे निसर्गात फिरत-बागडत होते. ‘बर्ड फ्लू’मुळे आता पक्षीही सुरक्षित राहिलेले नाहीत. हा संसर्ग वेळीच नियंत्रणात आणण्याच्या दिशेने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. पक्ष्यांमुळे स्वतःला बाधा होऊ नये म्हणून पक्षी निरीक्षणाचा मोह माणसे कदाचित काही काळ आवरतील.

विमान उड्डाणे रद्द करून ‘करोना’ संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करता आले. अंडी-चिकन विक्रीवर बंदी घालून आणि देशांतर्गत प्रतिबंधित क्षेत्र तयार करून कुक्कुट व्यवहार व वाहतूक रोखता येईल, पण परदेशातून उडत-उडत येण्यार्‍या पक्ष्यांना कोण आणि कसे रोखणार? देशात 20 लाख अपात्र शेतकर्‍यांनी ‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’चा लाभ घेतल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधक उपाययोजना करून पक्ष्यांना होणारा संसर्ग तर रोखता येईल. मात्र अपात्र लोकांना सरकारी योजनांचा लाभ देऊन होणारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशी थांबणार? असे गैरप्रकार रोखण्यासाठी एखादी नवी लस केंद्रातील प्रभावशाली शास्त्रज्ञ शोधू शकतील, अशी आशा करावी का?


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *