महाराष्ट्र राजकारणातील वेडीवाकडी वळणे?

द्रौपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू

माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून काल अधिकृत सुत्रे हाती घेतली. त्यांना भारताच्या सरन्यायाधीशांनी राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. केंद्रात त्यांची राष्ट्रपती म्हणून कारकिर्द कालपासून सुरु झाली. मुर्मू या संथाल आदिवासी समाजाच्या आहेत. बडीपोसी नावाच्या ओरिसा राज्यातील छोट्या खेड्यापासून देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय तर आहेच पण त्यांच्या लढाऊ वृत्तीचा परिचयही त्यावरुन सर्वांना झाला असेल.

केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या राजवटीचा हा निर्णय सर्वांना दिलासा देणारा आहे. त्याबद्दल देशातील जनता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना धन्यवादच देईल. मुर्मू यांच्या नियुक्तीने कोणाचे कोणते राजकारण साधले गेले किंवा जाईल हा भाग अलाहिदा. पण त्यांच्या नियुक्तीने आदिवासींच्या मनात जगण्याची नवी उमेद जागवली असेल. तळागाळात काम करणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांच्या स्वप्नांमध्ये नवे बळ भरले असेल. निष्ठेचे फळ कधी ना कधी मिळते ही आशाही त्यानिमित्ताने पल्लवित झाली असेल.

राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर मुर्मू यांनी तशाच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हे भारतातील प्रत्येक गरीबाचे यश आहे. वर्षानुवर्षे सुुविधांपासून वंचित राहिलेले दलित आणि आदिवासी नागरिक माझ्यात त्यांचे प्रतिबिंब पाहू शकतात. देशातील तरुण स्वत:च्या भविष्याबरोबरच देशाच्या भविष्याचा पायाही रचत आहेत. देशातील महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिले पाहिजे.

त्यांना माझा नेहमीच पाठिंबा राहिल’ असे त्या म्हणाल्या. देशातील महिला, आदिवासी आणि दलितांना मुर्मू यांच्या पाठिंब्याची गरज भासावी अशीच सद्यस्थिती आहे. एका बाजूला आदिवासी महिलेचे राष्ट्रपती होणे गौरवले जात असताना भारतीय जनता पक्षाचेच सरकार असलेल्या मराठी मुलखात अनुसूचित जाती आणि जमातीच्या तब्बल 1200 कोटींच्या विकास योजनांना स्थगिती दिल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. त्यापैकी अनेक योजना राबवणे सुरु झाले होते.

स्थगितीमुळे ते काम अर्धवट तर राहिलच पण भविष्यात स्थगिती उठवली गेली तरी निविदा व कंत्राटे ही प्रक्रिया पुन्हा एकदा राबवावी लागेल. त्यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची भीती यंत्रणेतील सेवकांना वाटू लागली असेल तर ती चूक ठरेल का? राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहणाच्या मुहूर्तावर योजनांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर होण्यामागे काय हेतू असावा? राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर त्याचे खापर फोडण्याचा हेतू यामागे असू शकेल का?

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी कळत-नकळत तशी जाहीर कबुलीही दिल्याचे त्यांच्या ताज्या वक्तव्यातून स्पष्ट होते. ‘राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे स्थान फक्त ‘कुंकवाच्या धन्या’प्रमाणे असेल’ हे त्यांनी माध्यमांना सूचक शब्दात सांगितले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या फक्त हाताला हात लावून कारभार करणे अपेक्षित असल्याचे प्रदेशाध्यक्षांना सुचवायचे असावे असे त्यावरुन स्पष्ट होते.

योजना स्थगितीच्या बातमीमुळे अशा अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. निसर्गासोबत समतोल साधत जगणार्‍या समाजात जन्म झाल्याबद्दल नवनिर्वाचित राष्ट्रपती आनंद व्यक्त करत असताना मराठी मुलखात मात्र मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी मुंबईच्या आरे वसाहतीत झाडांची तोड सुरु झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

यातून राज्यातील सत्ताधार्‍यांना काय साधायचे असावे? राष्ट्रपतीपदावर एका आदिवासी महिलेची नियुक्ती लोकांनी प्रतिकामत्मकच मानावी असाही हेतू यामागे असेल का? आदिवासी महिलेचे राष्ट्रपतीपदी विराजमान होणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी याची लोकांनी सांगड तरी कशी घालावी हा खरा प्रश्न आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com