
करोनाचा प्रकोप ओसरला असल्याचे सांगितले जाते. तथापि जगातील काही देश अजुनही करोनाच्या विळख्यात आहेत अशा बातम्या माध्यमात झळकल्या आहेत. करोना विषाणुच्या नवनव्या अवतारांची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. नवी लाट भारत भेटीला येण्याची शक्यता देखील काही शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. असे असले तरी आपत्तीलाच संधी समजण्याची कला करोनाने माणसांना शिकवली. देशातील संशोधकांनी करोना प्रतिबंधक लस तयार करुन जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. तथापि महाकाय लोकसंख्येचे वेगाने लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान देखील देशापुढे होते. त्या त्या राज्यांच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार राज्या-राज्यांसमोरील समस्या वेगवेगळ्या होत्या. महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांमध्ये लोकांची मानसिकता, अंधश्रद्धा आणि ग्रामीण भागातील काही गावांची दुर्गमता आणि अती दुर्गमता या मुख्य समस्या होत्या. एरवी पारंपरिक चौकटीतच शासकीय कामकाज चालते असा जनतेचा अनुभव आहे. पण करोना प्रतिबंधक लसीकरणातील आव्हानांवर मात करण्यासाठी चौकटीबाहेरचा दृष्टीकोन स्वीकारला गेला. नाशिक जिल्हा प्रशासनाने एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘वॅक्सिनेशन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हाती घेतला होता. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात आणि नांदगाव व मालेगाव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये हा उपक्रम विशेषत: राबवला गेला. एक लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले गेले. नुकतीच या उपक्रमाची सांगता झाली. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या कुटुंबावर आघात झाला. जवळची माणसे गमावली. दुसर्या लाटेत तर एकेका कुटुंबातील अनेक सदस्यांवर करोनाने काळाने घाला घातला. यापैकी काही कुटुंबातील कुटुंबप्रमुखांचा काळाने घास घेतला. कमावता माणूस गेल्यामुळे अशा कुटुंबातील उरलेले सदस्य सैरभैर झाले. महाराष्ट्रातील साधारणत: 75 हजारांपेक्षा जास्त महिलांना वैधव्य आले. त्यांच्यावर व त्यांच्या मुलाबाळांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या खांद्यावर अचानक घराची जबाबदारी आली. आयुष्याचा जोडीदार गमावल्यामुळे या महिलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. त्यातील काहींच्या मुलांचे शिक्षण सुरु आहे. काहींच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आला आहे. काही महिलांचे शिक्षण जेमतेमच झाले आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे रोजगाराची समस्या आहे. करोना विधवांच्या पुनर्वसनासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पुणे परिसरातील बावधन, भोर तालुक्यातील करंदवडी आणि दौंड तालुक्यातील वरवंड गावातील महिलांनी शिवलेल्या गोधड्या-रजया आणि ग्राहक यांच्यात काही सामाजिक संस्थांनी दुवा बनण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गोधड्या शिवण्यासाठी महिलांना कच्चा माल पुरवला जातो. महिलांनी शिवलेल्या गोधड्यांची समाजमाध्यमावर जाहिरात केली जाते. या गोधड्यांना आता अनेक देशातून मागणी असल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरच्या उपायांनी असे विधायक वळण घेतले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देता देता काही मंडळींना व सामाजिक संस्थांना असे कल्पक उपाय सुचले. ते त्यांनी अंमलात आणून यशस्वी करुन दाखवले. त्यातून काही समस्यांची उत्तरे सापडत गेली. करोना आपत्तीने अशी नवनव्या संधीची दारे उघडली जात आहेत. कल्पकता आणि कष्ट करण्याच्या तयारीच्या जोरावर आपत्तीचेही संधीत रुपांतर करता येते हे
या उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. 'केल्याने होत आहे रे..आधी केलेची पाहिजे' या संतवचनाचा प्रभाव या रीतीने पुन्हा एकदा उठून दिसला आहे.