शैक्षणिक सुधारणांची प्रशंसनीय अधिकृत नोंद!

शैक्षणिक सुधारणांची प्रशंसनीय अधिकृत नोंद!

राज्यातील पालकांचा खासगी शाळांकडे ओढा वाढत असल्याचे नेहमीच बोलले जाते. सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेविषयी व पायाभूत सुविधांविषयी नकारात्मक भावनाच व्यक्त होताना आढळतात. किंबहुना, मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ते एक प्रमुख कारण सांगितले जाते. तथापि गेल्या वर्षभरापासून हे चित्र पालटत असल्याचा निष्कर्ष ङ्गअसरफ (अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) या अहवालात नमूद करण्यात आला आहे. राज्यात सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या 10 टक्क्यांनी वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. राज्यातील साधारणपणे एक हजार गावांमधील सहा ते 16 वयोगटातील चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली. प्रथम फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी देशस्तरावर शालेय शैक्षणिक गुणवत्तेचे सर्वेक्षण करते. त्याचा लेखाजोखा प्रसिद्ध केला जातो. तोच हा असर अहवाल.

गत 15-16 वर्षे हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. वर्षानुवर्षे सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जा घसरत असल्याचे सांगितले जात होते. ही परिस्थिती वर्षभरात अचानक कशी बदलली? याची काही परिस्थितीजन्य कारणे सांगितली जातात. करोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली आहे. खासगी शाळांचे शुल्क भरता येईल की नाही याविषयी पालकांमध्ये साशंकता वाढली आहे. मोठ्या संख्येने लोक गावाकडे परतले आहेत. या परिस्थितीचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होईल अशी भीती समाजतज्ञही व्यक्त करत होते. पण याशिवाय सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवते.

शालेय पोषण आहार, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना इत्यादी. सरकारी शाळांत मुलांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश मोफत दिला जातो. वरील सर्व बदलांच्या परिणामी मुलांना सरकारी शाळेत घातले तर त्यांचे शिक्षण मोफत होईल अशी भावना पालकांमध्ये वाढीस लागली तर नवल नाही. तथापि गेले काही वर्षे सरकारी शाळांमधील अनेक प्रयोगशील शिक्षक त्यांच्यापरीने विविध अभिनव प्रयोग राबवत आहेत. त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये आधुनिक साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील आणि शाळेच्या इमारतीचे रंगरुपडे पालटेल यासाठी प्रयत्नशील आहेत.

मुलांनी शिकता शिकता त्यांच्या पालकांचीही मुलांच्या शिक्षणात गोडी वाढावी यासाठी अभिनव प्रयोग राबवत आहेत. करोनाच्या सुरुवातीच्या काळात शाळा बंद होत्या. तथापि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिकणे सुरु राहावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचण्याचे सर्व ते प्रयत्न केले. पाठ्यपुस्तके त्यांच्या घरापर्यंत नेली. यामुळे अनेक सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलत आहे. अशा प्रयत्नांची माध्यमेही दखल घेत आहेत. सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेची विश्वासार्हता वाढण्याला अशा असंख्य प्रयोगशील शिक्षकांचे महत्वाचे योगदान कारणीभूत ठरत आहे. राज्य सरकारने राज्यातील पाचशे शाळा आदर्श करायचा निर्णय नुकताच घेतला आहे.

या पाचशे शाळांमधील पटसंख्या वाढत असल्याचे सांगितले जाते. सरकार कुठे चुकत असेल तर त्याची दखल घेणे हा जनतेचा हक्क आहे. माध्यमे जनतेचे प्रतिनिधी म्हणून तो हक्क बजावून प्रसंगी सरकारला धारेवर धरतात. तद्वतच सरकारी शाळांमधील गुणवत्ता वाढीची दखलही माध्यमांनी घेतली आहे. नव्हे, ती घ्यायलाच हवी होती. राज्यात चांगले म्हणून जे जे काही घडत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे माध्यमांचे देखील कर्तव्य आहे. कारणे कोणतीही असली तरी पालकांचा सरकारी शाळांकडे ओढा वाढत आहे हा निश्तितच शिक्षणखात्याला समाधान वाटावे असा बदल आहे.

तो टिकून कसा राहिल याची काळजी घेणे ही सरकारइतकीच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. शिक्षणावर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 8 टक्के खर्च झाला पाहिजे अशी सामाजिक संस्थांची आग्रही मागणी आहे. सरकारने शिक्षणावर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6 टक्के खर्च करावा अशी सुचना कोठारी आयोगाने 1965 सालीच केली होती असे सांगितले जाते. सद्यस्थितीत राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी शिक्षणावरील खर्च 2018-19 मध्ये जेमतेम पावणेदोन टक्के झाला होता.

सरकारी शाळांमधील गुणवत्ता राखायची असेल तर त्यामधील गुंतवणुकही वाढायला हवी असे मत शिक्षणतज्ञ व्यक्त करतात. येन केन प्रकारेन सरकारी शाळांना बरे दिवस येण्याची आशा पालकांच्या मनात पल्लवित झाली आहे. सरकार शिक्षणासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधेबद्दल जागरुक झाले तर काय होऊ शकते याचे नेत्रदीपक उदाहरण दिल्ली या राजनाधीच्या शहरात केजरीवाल सरकारने जनतेपुढे ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा त्यादृष्टीने अग्रेसर राहाण्याचा प्रयत्न करील व शाळांचे वातावरण विद्यार्थ्यांचा ओढा वाढवण्याला मदत करणारे कसे राहिल याची दक्षता घेईल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com