बालविवाह प्रथेचे उच्चाटन व्हायलाच हवे!

बालविवाह प्रथेचे उच्चाटन व्हायलाच हवे!

पूर्वापार चालत आलेल्या काही चांगल्या रुढी-परंपरा आज आधुनिक काळाच्या कसोटीवरसुद्धा उतरल्या आहेत. वडीलधार्‍यांचा आदर, मानसन्मान, पै-पाहुण्यांचे आगत-स्वागत, बालसंस्कार, शिक्षणाला प्राधान्य, सर्वधर्मसमभाव, निसर्गपूजा, वृक्षारोपण अशा कितीतरी प्रथा-परंपरा पूर्वीइतक्याच अनुकरणीय ठरत आहेत. याउलट काही अनिष्ट रूढी अजूनही पूर्णत: मोडीत निघालेल्या नाहीत. अशा रुढींना खतपाणी घालून जाणते-अजाणतेपणे सामाजिक पाप पुरोगामी महाराष्ट्रात आजही सुरू असल्याचे दिसून येते. बालविवाह ही फार जुनाट कूप्रथा! ती मोडीत काढण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झाले. यथावकाश कायद्याने बालविवाहांवर बंदी आणण्यात आली. सुरूवातीला त्या कायद्यात विवाहाचे वय मुलासाठी 18 व मुलींसाठी 14 वर्षे होते. कालानुरूप बदल होता-होता आता कायद्यानुसार मुला-मुलींचे विवाहाचे वय अनुक्रमे 21 आणि 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यातही काही बदल लवकरच संभवतो. यापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींच्या विवाहाला बालविवाह मानले जाते; जो कायद्याने गुन्हा आहे. दुर्दैवाने आजही बालविवाहाची अनिष्ट प्रथा तग धरून आहे. बालविवाहांना बळ देणारा समाजच त्याला कारणीभूत आहे. विशिष्ट जाती-धर्माचे त्याला बंधन नाही. बालविवाहाला बंदी असली तरी कायदा मानायला अथवा त्याला घाबरायला लोक तयार नाहीत. बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. सरकार आणि पोलीस यंत्रणाही जागरूकता दाखवत आहेत. तरीसुद्धा बालविवाह लावून देण्याची काही लोकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. गेली दोन वर्षे करोना महामारीने संपूर्ण जग हैराण होते. या संकटाचे संधीत रुपांतर करण्याचे काम काही रूढीप्रेमी लोकांनी खुबीने केले. करोनाकाळात गर्दी जमवायला प्रतिबंध होता. भेटीगाठींना मज्जाव होता. अशा कठीण काळाचा लाभ उठवला गेल्याने बालविवाह वाढल्याच्या निदर्शक घटना ठिकठिकाणी आढळल्या आहेत. बालविवाहाचा प्रश्‍न नाशिक जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणि चाईल्ड लाईन संस्था संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत. 5 महिन्यांत तब्बल 45 बालविवाह रोखण्यात या संस्थांना यश आल्याची माहिती माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. आदिवासीबहुल त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तर बालविवाह होण्याच्या बेतात असताना ते रोखले गेले, पण जिल्ह्यात सर्वात समृद्ध निफाड तालुक्यातसुद्धा तसे का व्हावे? ग्रामीण भागात ही स्थिती असल्याचे वरकरणी दिसते, पण शहरी भागात बालविवाह अजिबात होतच नसतील, असे खात्रीने संबंधित यंत्रणाही सांगू शकणार नाहीत. 45 बालविवाह रोखले गेले ही चांगली बाब आहे. सामाजिक आणि सरकारी संस्था एकजुटीने त्यासाठी प्रयत्न करीत आहेत हीदेखील कौतुकास्पद बाब आहे, पण ज्यांची माहिती मिळू शकली नाही, असे किती बालविवाह उरकले गेले असतील याची कल्पना करणे अवघड आहे. त्याबद्दल फक्त सरकार अथवा पोलीस यंत्रणेला सर्वस्वी दोष देता येणार नाही. सामाजिक जागरूकतेत सरकार आणि सामाजिक संस्था अजूनही कमी पडत आहेत, असे मानता येईल. बालविवाह रोखण्याची आवश्यकता असताना गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ व्हावी हे योग्य नाही. जनजागृती करायला सरकारी यंत्रणा आणि सामाजिक संस्थांना अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. मुला-मुलीने विवाहाचे वय गाठण्याआधीच त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवण्यामागे आर्थिक प्रश्‍न, रूढींना चिकटून राहण्याची प्रवृत्ती, कायद्याचा धाक नसणे, कायद्यानुसार मुला-मुलीच्या विवाहासाठी वयाची अट काय याची माहिती त्यांच्या माता-पित्यांना नसणे आदी काही कारणांमुळे बालविवाहाची कूप्रथा जोमाने उसळी मारत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने होऊ घातलेले बालविवाह रोखले जात असतील तर राज्यभरात त्याचे प्रमाण कितीतरी मोठे असू शकते. तथापि असे बालविवाह रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे जिल्हा परिषद प्रशासन आणि चाईल्ड लाईनसारखी सामाजिक संस्था, त्यांना माहिती पुरवणारे जागरूक लोक तसेच पोलीस यंत्रणा असे सर्वच घटक अभिनंदनास पात्र ठरतात. बालविवाह हे समाजात खोलवर मुरलेले दुखणे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रोखलेले बालविवाह त्याचेच निदर्शक आहेत. कायदा मोडण्याची प्रवृत्ती कमी होत नाही. आजकाल विवाह नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे आहे, पण त्याचे महत्त्व सुशिक्षितांच्यासुद्धा पुरेसे लक्षात येत नाही. विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करताना संबंधित अधिकारी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करतात. तरीसुद्धा घाईगडबडीत चुकून काही बालविवाह नोंदवले गेले नाहीत ना? याचीही पडताळणी व्हायला हवी. बालविवाह रोखण्यासाठी आता अधिक जोमाने सर्व यंत्रणांनी लक्ष वेधणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांपेक्षा समाजाचा घटक म्हणून प्रत्येक नागरिकाची याबाबतची जबाबदारी जास्त मोठी आहे. आपल्या आजूबाजूला, नातलगांत अथवा मित्रपरिवारात चुकूनही एखादा बालविवाह घडणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घेतली तर यंत्रणांचे काम अधिक सोपे होईल. समाजाच्या जागरूकतेवर लागलेले प्रश्‍नचिन्ह हटायला त्याची मदत होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com