
करोना महासाथीने रखडवलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक गट-ब परीक्षेचा निकाल अखेर नुकताच लागला. ही परीक्षा दिलेल्या हजारो उमेदवारांपैकी 494 जण पास झाले आहेत. लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि मुलाखतींनंतर सुमारे तीन वर्षांनी आनंदाचा हा क्षण परीक्षार्थींच्या वाट्यास आला. स्पर्धा परीक्षांचे निकाल तसे दरवर्षी लागतात, पण पोलीस उपनिरीक्षकपद परीक्षेचा आताचा निकाल नाशिक जिल्ह्यासाठी खास म्हणता येईल. जिल्ह्यातून 40पेक्षा जास्त उमेदवार परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यात सामान्य कुटुंबांतून पुढे आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षेतील त्यांचे यश जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावणारे आहे. शिक्षणाचा परिस्पर्श झाल्यावर अनेक चमत्कार घडतात. माणसात माणूसपण येते. अनिष्ट विचारांचा बिमोड होतो. वैचारिक प्रगल्भता येते. आत्मविश्वास वाढतो. महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटतात. सामाजिक भान येते. काही चांगले व समाजहितकारक करून दाखवण्याची ऊर्मी जागते. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’ असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहेत. शिक्षणाचे महत्त्वच त्यांच्या विचारातून अधोरेखित होते. त्या विचारांचा प्रत्यय सामान्य कुटुंबांतील शिकून-सवरून स्वसामर्थ्यावर पुढे येणारी तरुणाई आपल्या यशातून देत आहे. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झालेल्या जिल्ह्यातील यशवंतांत काही ध्येयवादी तरुणीसुद्धा आहेत. त्यातील दोन तरुणींचे यश स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद करणारे आणि अभिमान जागवणारे आहे. सिन्नर तालुक्यातील दोडी गावची रूपाली केदार ही एनटी (डी) प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना तिला कीर्तनाची गोडी लागली. अध्यात्म आणि शिक्षणातून तिने प्रगतीचा मार्ग शोधला. दुसरी तरुणी भाजीपाला विकून अर्थार्जन करणारी देवळालीगावातील ज्योती नेहे! फौजदार होऊन ‘खाकी वर्दी’ अंगावर मिरवण्याचे स्वप्न साकारण्यासाठी गेली सात वर्षे ती अभ्यास आणि प्रयत्न करीत होती. त्याचे फळ तिला अखेर मिळाले. यशाला गवसणी घालणार्यांत इतरही काही तरुण-तरूणीसुद्धा असतील, पण ती ‘झाकली माणके’ आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती माध्यमांमध्ये यथावकाश प्रसिद्ध होईलच. निवडणूक काळात राजकीय पक्ष मते मिळवण्यासाठी पूर्ण करता न येणारी आणि न पेलणारी आश्वासने देतात. बहुतेक सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यांत एक आश्वासन समान असते; ते म्हणजे नोकर्यांचे, रोजगार निर्मितीचे! प्रत्यक्षात ते आश्वासन अभावानेच पूर्ण होते. आजवर तरी हे आश्वासन आकाश कंदीलासारखे ‘दूरचे दिवे’ ठरले आहे. उच्चशिक्षितांच्या पलटणी दरवर्षी तयार होऊन रोजगाराच्या शोधात बाहेर पडतात, पण हल्ली व्यावसायिक शिक्षणातील पदवीधरांनासुद्धा नोकर्या मिळणे अवघड बनले आहे. सरकारी नोकर्या कमी आहेत. सगळ्यांनाच त्या मिळू शकत नाहीत, पण त्या मिळवायच्या असतील तर स्पर्धेत उतरावे लागते. यूपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षांची भरपूर तयारी करावी लागते. दिवसाची रात्र करून अभ्यास करावा लागतो. ते केल्यावरसुद्धा आणखीही काही अनोळखी मार्ग चोखाळावे लागतात, असेही सांगितले जाते. तेव्हा कुठे यशाचा चमत्कार घडू शकतो. सर्व अडथळे ओलांडून प्रामाणिक प्रयत्न करणारी आणि कष्टाची तयारी असणारी सामान्य कुटुंबांतील मुले-मुली आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहेत. नाशिक जिल्हा ही तर ज्ञानवंत-गुणवंतांची खाण! वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, योग आदी विविध क्षेत्रांत त्याची प्रचिती वेळोवेळी येते. जिल्ह्यातील 40 जणांनी परीक्षा पास होऊन फौजदार होण्याचे स्वत:चे स्वप्न साकारले आहे. रूपाली आणि ज्योती यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. माता-पित्यांचा अभिमान वाढवणारेही आहे. शिक्षणाची आच तळागाळापर्यंत पोहोचत आहे. त्यातून लोकजागृती होत आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून गोरगरीब आई-वडील त्यांच्या मुला-मुलींना शिकवत आहेत. त्यातून अनेक सुखद आणि विस्मयकारक धक्के समाजाला बसू लागले आहेत. पुढेही असे धक्के बसतील. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा निकालातून ते स्पष्ट झाले आहे. स्वप्नाला परिश्रमपूर्वक गवसणी घालून यशाची गुढी उभारणार्या सर्व यशवंतांचे मन:पूर्वक अभिनंदन!