Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमहिलांच्या दुर्गारुपाचा नवा पैलू उजाळणारा बंगाली प्रयोग!

महिलांच्या दुर्गारुपाचा नवा पैलू उजाळणारा बंगाली प्रयोग!

महिलांसंदर्भातील अनुकूल विधायक बदलाने पुढचे पाऊल टाकले आहे. कोलकात्यामध्ये यावर्षी प्रथमच चार महिला सार्वजनिक दुर्गापूजेचे पौरोहित्य करत आहेत. त्यात मांडव (पंडाल) टाकण्याच्या पूजेपासून सगळ्या पूजांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला आत्तापर्यंत लग्न, गृहप्रवेश अशा अनेक समारंभात पुरोहित म्हणून काम करत आल्या आहेत. यावर्षीपासून सार्वजनिक दूर्गापूजेची परंपरा देखील महिला चालवणार आहेत. सुधारकी विचारांचा वारसा सांगणार्या मराठी मुलखात हा बदल काही दशकांपूर्वीच झाला. समाजानेही तो स्वीकारला.

किंबहुना त्याला प्रोत्साहनही दिले. बदलाचा हा वारसा महाराष्ट्रातील महिला पुरोहितांच्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे गेला देखील असेल. पश्चिम बंगालमध्ये दूर्गापूजेच्या काही मंडपांमध्ये मुली किंवा महिलाच देवीचे रुप घेऊन उभे राहात होत्या आणि मिरवणुकीत सादर केल्या जाणार्या देखाव्यांमध्येही त्याच उभ्या राहात असत. सार्वजनिक दुर्गापूजेचे पौरौहित्य मात्र अद्याप त्यांच्याकडे सोपवले जात नव्हते. देखाव्यापुरत्या मर्यादित त्यांच्या रुपाने आता मात्र करवट बदलून दुसरे रुप धारण केले आहे. महिलांनी दूर्गेची सार्वजनिक पूजा करायला सुरुवात केली आहे. हा लक्षणीय बदल आहे.

- Advertisement -

समाजाच्या दिखाऊपणाची, अस्वस्थ करणारी दुसरी बाजू राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाने समोर आणली आहे. एका बाजूला देवीचे रुप म्हणून पुूजल्या जाणार्या महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. याला समाजाचा दुटप्पीपणा नाहीतर अजून काय म्हणणार? गेल्या वर्षभरात देशात पोक्सो (बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. 99 टक्के गुन्हे मुलींवरील अत्याचाराबाबत होते. 12 ते 18 वयोगटातील मुली लैंगिक अत्याचाराला मोठ्या प्रमाणात बळी पडतात असेही अहवालात नोंदवण्यात आले आहे.

अल्पवयीन मुले-मुली लैंगिक अत्याचाराचे भक्ष्य बनावेत हे कोणत्याही प्रागतिक समाजावरचे मोठे लांछनच आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आला आहे. नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा उत्सव! या उत्सवाची संकल्पना आदिमाया, आदिशक्तीच्या उदातत्तेचा प्रभाव नमूद करणारी आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली वा रणचंडीची वा दुर्गामातेची वेगवेगळी रुपे पूजली जातात. महाकाली किंवा रणचंडीचे रुप आता फक्त पूजेपुरतेच मर्यादित राहू नये. स्वसरंक्षणार्थ मुली आणि महिलांनीच रणचंडी होण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ त्यांनी हातात शस्त्र धारण करावे असे नव्हे.

स्वसरंक्षणाची आधुनिक तंत्रे त्यांनी शिकून घ्यावीत. ही तंत्रे मुली आत्मसात करुन मगच मुली घराबाहेर पडतील याची जाणीवपूर्वक दक्षता पालकांनी सुद्धा घ्यायला हवी. समाजात वावरताना अनुचित परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आलीच तर स्वसंक्षणाचा आत्मविश्वास आणि साहस हेच त्यांना स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरु शकेल. स्वसंक्षणाच्या तंत्राचा वापर कसा आणि कुठे करायचा याचे भान दाखवण्याइतकी मुलींची आजची पिढी नक्कीच जागरुक आहे. स्त्रीसुरक्षा केवळ कायद्यावर विसंबून लाभणार नाही.

कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणारेच कायदे कसे मोडतात याचे अनेक नमूने सध्या समाजासमोर येत आहेत. दुर्गापूजेच्या परंपरेतील बदल पश्चिम बंगालमधील लोक आनंदाने स्वीकारतील अशी अपेक्षा हा बदल घडवणार्या कोलकाता साऊथ क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. होकारात्मक बदल ही संथगतीने चालणारी प्रकिया आहे. मुली आणि महिला स्वसंरक्षणासाठी प्रसंगी रणचंडी बनत आहेत हा बदलही स्वीकारायला काही काळ जावा लागेल. पुरुषप्रधान संस्कृतीत कदाचित याच्या नकारात्मक प्रतिक्रियाच जास्त उमटण्याचा संभव आहे. तथापि त्याकडे फारसे लक्ष न देता महिलांना आत्मभान देणारे प्रयोग वाढत राहिले पाहिजेत. त्याचे भान बदलाची सुरुवात करणारे दाखवतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या