‘ऑस्कर’मधील बावनकशी यश

‘ऑस्कर’मधील बावनकशी यश

मेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरातील डॉल्बी थिएटरमध्ये 95वा ऑस्कर्स पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या झगमगाटात पार पडला. भारतीय चित्रपट यंदा ऑस्कर स्पर्धेत असल्याने भारतीय चित्रपटसृष्टी आणि भारतीय चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. ज्याची सर्वांना उत्कंठा होती तो क्षण अखेर आला. किमान एका ‘ऑस्कर’ पुरस्कारावर भारतीय चित्रपटाने मोहोर उमटवण्याची भारतीयांना अपेक्षा असताना यंदा दोन पुरस्कार भारताने पटकावले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद खर्‍या अर्थाने द्विगुणीत झाला. आतापर्यंत 15 वेगवेगळे पुरस्कार मिळवणार्‍या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्याची ‘सर्वोत्कृष्ट गीत’ श्रेणीत निवड झाली. सोबतच ‘एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला ‘सर्वोत्कृष्ट माहिती लघुपट’ श्रेणीत गौरवण्यात आले. दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्माती गुनीत मोंगा यांना हा सन्मान मिळाला. हत्तींच्या कळपातून भरकटलेले ‘रघू’ नावाचे हत्तीचे पिल्लू आणि माहुताची कथा या माहितीपटात गुंफलेली आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील नात्यावर अचूक भाष्य करणार्‍या  ‘एलिफंट व्हिस्परर्स’ने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील अनेक गाजलेल्या गाण्यांसोबत भारताच्या ‘नाटू-नाटू’चे नामांकन झाल्याने ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हे गीत नक्कीच पुरस्कार पटकावणार, असा विश्‍वास अनेक चाहत्यांनी व्यक्त केला होता. झालेही तसेच! अप्लॉज, होल्ड माय हँड, लिफ्ट मी अप आणि धिस इज ए लाईफ या गाण्यांना पिछाडीवर टाकून ‘नाटू-नाटू’ने यश खेचून आणले. भारतीय चित्रपट निर्माते व कलावंतांनी ‘ऑस्कर’ सोहळ्यात केलेला यशाचा हा दुहेरी धमाका म्हटला पाहिजे. गायक कालभैरव आणि राहुल पिलीगुंज यांनी पुरस्कार विजेते ‘नाटू-नाटू’ गीत सोहळ्यात सादर केले. त्या तालावर अख्खे हॉलिवूड थिरकताना जगाने पाहिले. ते पाहून भारतीय रसिकांनासुद्धा नाचण्याचा मोह झाला असेल. ‘नाटू-नाटू’ गीताने ‘ऑस्कर’ पुरस्काराला गवसणी घातली, पण हे यश सहजासहजी मिळालेले नाही. हे गीत आकारास येण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, गायक आणि कलावंतांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. गीताचे चित्रिकरण युक्रेनमध्ये करण्यात आले. गीत लिहिण्यापासून ते आकारास येण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली. गीत नृत्यबद्ध करायला 60 दिवस लागले. 43 रिटेक झाल्यानंतर त्याचे चित्रिकरण पूर्ण झाले. यावरून या गीताच्या चित्रिकरणावर किती मेहनत घेतली गेली याची कल्पना येते. ‘नाटू-नाटू’ला पहिला पुरस्कार ‘गोल्डन ग्लोब’ जिंकल्याचा शुभशकून झाला आणि त्यानंतर थेट ‘ऑस्कर’ पुरस्काराला गवसणी घातली गेली. पुरस्कार जिंकल्याचा आनंद  संगीतकार एम. एम. किरवानी आणि गीतकार चंद्रबोस यांच्या चेहर्‍यांवर ओसंडत होता. ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळण्याचे भाग्य भारतीय चित्रपटांच्या वाट्याला तसे खूप कमी वेळा आले आहे. मात्र त्यात विदेशी निर्माते आणि निर्मिती संस्थांनी भारतात अथवा भारतावर तयार केलेल्या चित्रपटांचा सहभाग होता. 1983 मध्ये ‘गांधी’ चित्रपटासाठी भानू अथय्या यांना वेशभूषेसाठी ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला होता. 1992 सालात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर’च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दीड दशकापूर्वी म्हणजे 2008 सालात ‘स्लमडॉग मिलिनिअर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गीतासाठी संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘सर्वोत्कृष्ट गीता’चा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला होता. सर्वार्थाने स्वदेशी निर्माते आणि कलावंतांच्या परिश्रमातून साकारलेल्या भारतीय कलाकृतीला यंदा प्रथमच दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळेच या पुरस्कारांचे महत्त्व कैकपटीने मोठे आहे. पंतप्रधानांसह विविध प्रमुख नेते तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी दोन्ही पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुरस्कार विजेत्यांनी सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलेल्या भावना उत्स्फूर्त व भावस्पर्शीसुद्धा आहेत. भारतात कोणत्याही क्षेत्रात गुणवत्तेची कमतरता नाही, हा विश्‍वास ‘आरआरआर’ आणि ‘एलिफंट व्हिस्परर्स’चे निर्माते व कलावंतांनी सार्थ ठरवला आहे. प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा, असेच हे बावनकशी यश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com