Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखसामान्यांना प्रेरणा देणारी 'बात' 

सामान्यांना प्रेरणा देणारी ‘बात’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ (Man Ki Baat) उपक्रमाचे शतक नुकतेच देशभरच नव्हे तर परदेशातही साजरे झाले. या उपक्रमाच्या शंभराव्या भागाचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात देखील प्रक्षेपण झाल्याचे वृत्त माध्यमात झळकले. हा अनोखा उपक्रम होता हे कोणीही नाकारू शकणार नाही.

उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात आकाशवाणीला पुन्हा एकदा सोनेरी दिवस परत मिळवून दिले असे म्हणणे वावगे ठरू नये. नाविन्यता आणि सातत्याचा अनोखा मिलाफ याने घडवून आणला. देशातील प्रत्येक घरात दूरदर्शन असू शकेलच असे नाही. तथापि मोबाईलमुळे लोक रेडिओ खिशात घेऊन फिरतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी लोकांशी संवाद साधण्याचे रेडिओ हे प्रभावी माध्यम ठरले. देशाचे सर्वोच्च नेतृत्व आणि सामान्य जनता यात नेहमीच अंतर असते. ती दुरी सांधण्याचे काम या उपक्रमाने केले. पंतप्रधान लोकांच्या घरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याची भावना लोकांमध्ये या उपक्रमाने निर्माण केली. ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी विविध विषयांना स्पर्श केला. सामाजिक समस्यांवर चर्चा केली. या उपक्रमाच्या यशापयशाची चर्चा होतच राहील. या उपक्रमातून मोदींनी काय साध्य केले याविषयी तज्ज्ञ त्यांची मते प्रदर्शित करत आहेत. करत राहतील.

- Advertisement -

शतकपूर्तीनिमित्तही विविध संस्थांचे सर्वेक्षण अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष देखील  प्रसिद्ध झाले. तथापि सामाजिक समस्यांवर आपापल्या परीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची या उप्रक्रमातून दखल घेतली गेली. लोकांसमोर लोकांमधीलच कृतिशील आदर्श उभे करण्याचा केले गेलले प्रयत्न दखलपात्र नव्हेत का? विविध कारणांमुळे सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन समस्यांनी भरलेले आहे. अनेक नद्यांचे प्रदूषण अती गंभीर अवस्थेत आहे. प्लास्टिकचा विळखा वाढत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे गुणोत्तर कमी आहे. अशा विविध प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर लोकसहभागातून उत्तरे शोधली जाऊ शकतात हा विश्वास लोकांच्या मनात जागा करणाऱ्या लोकांशी मोदी यांनी संवाद साधला.

‘सेल्फी विथ डॉटर’ (‘Selfie with Daughter’) हा उप्रकम सुरु करणारे हरियाणातील डॉक्टर सुनील जगलान, वीस हजार महिलांनी वेल्लोरमधील नाग नदीचे केलेले पुनरुज्जीवन,  कमळाच्या तंतूपासून कपडे बनवणाऱ्या मणिपूरच्या विजयशांती, गोदावरीच्या किनारी तासनतास उभे राहून नदीपात्रातील विशेषतः प्लास्टिकचा कचरा गोळा करणारे नाशिकचे चंद्रशेखर पाटील, हीलिंग हिमालया चळवळ सुरु करणारे प्रदीप सांगवान, करोना काळात अनोखे फवारणी यंत्र तयार करून त्याने अनेक खेड्यांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे सात सटाण्याचे धनंजय जाधव आणि त्यांचे पुत्र राजेंद्र जाधव ही त्याची काही चपखल उदाहरणे. जी सामान्य माणसांसाठी प्रेरणादायी ठरली. आयआयएम-रोहतक’ने  केलेल्या सर्वेक्षणात तसा निष्कर्ष नमूद आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांना हा कार्यक्रम ऐकल्यानंतर देशउभारणीच्या कामामध्ये सहभागी झाले पाहिजे असे वाटू लागल्याचे त्यात म्हटले असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. ही या उपक्रमाची मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या