देशाभिमान जागवण्याचा प्रयत्न यशस्वी व्हावा!

देशाभिमान जागवण्याचा प्रयत्न यशस्वी व्हावा!
हे चिन्ह आता पत्रव्यवहारांवर असणार आहे.mahan

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या देशभर साजरा होत आहे. केंद्र, राज्य सरकारे, सरकारी संस्था आणि सरकारी कार्यालयांत त्यानिमित्त काही कार्यक्रम व उपक्रम राबवले जात आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारने संसदेतही कार्यक्रम आयोजित केला. काही सामाजिक संस्था सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आदी आयोजित करीत आहेत. मात्र या सगळ्या गजबजाटात चालू वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे याची किती भारतीयांना कल्पना असेल? स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी भारतीयांमध्ये देशप्रेमाचा उमाळा दाटून येतो. संसद, मंत्रालये, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये तसेच खासगी संस्थांमध्ये ध्वजवंदनाचे कार्यक्रम पार पडतात. पुढील वर्षाचा स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताक दिन येईपर्यंत देशभक्तीचा बहुतेकांना विसर पडतो. सध्या तर सच्चा देशभक्त कोण? कोणाची देशभक्ती श्रेष्ठ वा खरी? यावरून खडाजंगी सुरू आहे. अनेक राज्यांत जातीय आणि धार्मिक ताणतणाव निर्माण होत आहेत किंवा विशिष्ट गटांकडून निर्माण केले आहेत. जुनी मढी उकरून संघर्षाचा वणवा पेटवला जात आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून केंद्र सत्ताधार्‍यांकडून हे सगळे केले जात असल्याचा ठपका विरोधी पक्ष ठेवत आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जनतेचेही लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या कसरती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून येत्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. देशभक्तीची भावना जनतेच्या मनात जागृत करण्यासाठी सुमारे दहा कोटी घरांवर सरकारी पुढाकाराने आठवडाभर तिरंगा फडकावला जाणार आहे. हल्ली स्वातंत्र्यदिन अथवा प्रजासत्ताकदिन कार्यक्रमांना मंत्री, नेते, उच्चपदस्थ, सरकारी अधिकारी, सेवक, विद्यार्थी, अध्यापक आणि अध्यापकेतर सेवकच प्रामुख्याने हजर दिसतात. सामान्य नागरिकांची उपस्थिती अभावाने आढळते. रोजीरोटी कमावण्यासाठी दररोज करावयाचा संघर्ष अनेकांना अटळ असतो. देशप्रेम असले तरी इच्छा असूनही त्यांना ध्वजारोहणाला हजर राहता येत नाही. अशा स्थितीत घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून जनमानसात राष्ट्रभक्ती जागवण्याचा केंद्र सरकारचा विचार खरोखर अभिनंदनीय आहे. आपण जेथे राहतो, ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाच्या स्वातंत्र्याने पंचाहत्तरी गाठली आहे याची जाणीव घरांवर राष्ट्रध्वज फडकताना पाहून प्रत्येक नागरिकाला झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारचा इरादा चांगला असला तरी योजना अमलात आणणे सोपे नाही. राष्ट्रध्वज फडकावण्याबाबत काही नियम आहेत. ते नियम काटेकोरपणे पाळले जातील व नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावताना तशी काळजी घेणे सोपे नाही. कोणत्याही प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबाबत खबरदारी कशी बाळगली जाणार? यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला जेमतेम अडीच-तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. एवढ्या अल्पावधीत राष्ट्रध्वजाबाबत केंद्र सरकार जनजागृती कशी करणार? राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्यास तीन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या राजकीय नेतेमंडळी एकमेकांना शिव्या-शाप देण्यात मश्गूल आहेत. विशेषत: ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्या राज्यांना केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि त्याचे नेतेगण पाण्यात पाहत आहेत. तेथील सत्ताधार्‍यांवर आगपाखड करीत आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केलेल्या भाषणात राज्यातील सत्ताधार्‍यांना नको ती दूषणे दिली. केंद्रसत्तारूढ असूनसुद्धा पातळी किती खालावू शकते याचा नमुना पेश केला आहे. दिल्ली, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, केरळ, झारखंड आदी राज्यांतील सत्ताधारी पक्षांना काहीसा याच तर्‍हेचा अनुभव घ्यावा लागत आहे. एखाद्या राज्यात स्वपक्षाचे सरकार नाही म्हणून असूयेचे प्रदर्शन करण्यासाठी किती आक्रस्ताळेपणा करावा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तरी केंद्र-राज्य संबंध सुधारण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. केंद्र-राज्य संघर्षाचे हादरे बसून संघराज्य प्रणाली कमकुवत होणार नाही याची केंद्र सरकारने काळजी घेणे आवश्यक आहे. पंचाहत्तर वर्षानंतर तरी जनतेला राज्यकर्त्यांमधील पुरेसा पोक्तपणा जाणवायला हवा. करोनाकाळात पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार लोकांनी टाळ्या-थाळ्या वाजवल्या. आता राष्ट्रध्वज फडकावून देशभक्तीचाही प्रत्यय ते देतील याबद्दल खात्री बाळगायला हवी. येत्या स्वातंत्र्यदिनापासून घरोघरी राष्ट्रध्वज फडकावण्याच्या उपक्रमामुळे देशवासियांत राष्ट्रप्रेम जागे व्हावे ही अपेक्षा पुरी होण्यामध्ये सध्याची बेरोजगारी आणि महागाई हे गंभीर प्रश्‍न काही प्रमाणात अपेक्षित प्रभाव दाखवू शकतील का? ही समस्या यावेळी लक्षात असलेली बरी!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com