गणपतीबाप्पांना विनवणी!

गणपतीबाप्पांना विनवणी!

आज गणेशचतुर्थी! (Ganesh Chaturthi) वर्षानुवर्षे लोकप्रिय असणार्‍या गणेशोत्सवाचा पहिला दिवस. आज घरोघरी गणपतीबाप्पांचे (Ganpatibappa) आगमन होईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मोजक्याच गणेशमंडळांना सार्वजिनकरित्या उत्सव साजरा करण्याला सरकारकडून मुभा देण्यात आली आहे असे माध्यमातील बातम्यांवरून समजते. काही मंडळांचे गणपतीबाप्पा नवसाला पावतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. तथापि अशा सार्वजनिक गणपतींचे भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे आणि गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर गर्दी करू नये असे आवाहन सरकारने केले आहे. काळाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत आहे. सार्वजनिक सण पर्यावरणपूरक रीतीने सुद्धा साजरे करता येऊ शकतात याबद्दलची जाणीव समाजात हळूहळू वाढत आहे. पाण्यात विरघळणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. उत्सवाच्या सांगतेनंतर गणेशमूर्ती आणि निर्माल्य गंगार्पण करण्याची प्रथा आहे. तथापि गेली काही वर्षे मूर्ती दान करून निर्माल्य कलशात टाकण्यास लोक हळूहळू राजी होत आहेत.

विसर्जनाच्या दिवशी मूर्ती दान करणार्‍या भक्तांची संख्याही वाढत आहे. याच जाणिवेचे प्रतिबिंब गतवर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात उमटले होते. गतवर्षी बहुतेक सार्वजनिक गणेशमंडळांनी दहा दिवस आरोग्य उत्सव साजरा केला. करोनासंदर्भात जनजागृती करण्याला प्राधान्य दिले होते. यंदाही परिस्थिती फारशी निवळलेली नाही. लोकांनी निर्बंध पाळले नाही तर करोनाची तिसरी लाट अधिक हानिकारक ठरू शकण्याचा धोका टाळता येणार नाही असा इशारा राज्यसरकारच्या कृती दलाने (टास्क फोर्स) दिला आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राजकीय कार्यक्रम स्थगित करावेत असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

हे सल्ले गंभीरपणे घेण्यातच सर्वांचे हित आहे हे सर्वानीच लक्षात घेण्याची गरज आहे. राज्याचे भले कर, त्याची भरभराट होऊ दे असे साकडे सालाबादप्रमाणे यंदाही औपचारिकरीत्या गणपतीबाप्पाकडे घातले जाईल. तथापि आपली सुरक्षा ही आपली देखील जबाबदारी आहे याचे भान किती जण दाखवतात? बाजारात रोज प्रचंड गर्दी होते. रस्ते माणसांनी भरून वाहतात. चौकाचौकांमध्ये वाहतूक जाम होते.

राजकीय नेत्यांचे मेळावे, उद्घाटने आणि दौरे सुरूच आहेत. लोकप्रतिनिधी देखील विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे त्यांचे कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यात अग्रेसर आहेत. गणेशाला बुद्धिदेवता मानले जाते. त्याच्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा आणि गोष्टी सांगितल्या जातात. त्याचा अनुभव यंदा भक्तांना येईल का? खास करून नेते मंडळींना! देवाला घातलेले साकडे तो ऐकतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.

सगळ्या भक्तांची यंदा गणपतीला मनापासून एक प्रार्थना असणार! करोनाचे भूत गेले वर्ष-दीडवर्ष माणसाच्या मानगुटीवर बसले आहे. अजून किती काळ त्याचे सावट कायम राहील याविषयी तज्ञांमध्येही एकमत आढळत नाही. तेव्हा हे करोनाचे भूत भक्तांच्या मानगुटीवरून उतरवा देवा.

गेल्या दोन वर्षात सर्वांची खूप गैरसोय झाली आहे. देशाचे अर्थकारण ठप्प झाले आहे. दळणवळण अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. शिक्षणसंस्था बंदच आहेत. हे क्षेत्र कमालीचे अस्थिर झाले आहे. वातावरणातील ही अनिश्चितता बाप्पांनी संपवावी. आर्थिक आणि सामाजिक स्थिरता आणावी. सार्वजनिक सणसमारंभातील उत्साह द्विगुणित करावा. गणेशाने भक्तांची एवढी विनंती ऐकावी हीच त्याच्या चरणी यंदाही सर्व भक्त तळमळीने प्रार्थना करतीलच!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com