नियम-कायदेपालनातील कोणाचीही ढिलाई असमर्थनीयच!

नियम-कायदेपालनातील कोणाचीही ढिलाई असमर्थनीयच!

थंडीचा कडाका वाढला आहे. कडाक्याच्या गारगार वातावरणात तीळगुळाचा गोडवा घेऊन मकरसंक्रांतीचा सण आला आहे. तीळगूळ देऊन एकमेकांचे तोंड गोड करण्यासोबत आकाशात पतंग उडवण्याचा आनंद लहानथोर आवडीने घेतात. वर्षानुवर्षे तीळगूळ दिला जातो. आपापसातील कटूता दूर करून परस्पर स्नेह वाढवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जातो. पतंग उडवण्याची प्रथा आवडीने पाळली जाते. बदलत्या काळानुरूप पतंगांना आणि ते उडवण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्याला आता आधुनिक साज चढवला जात आहे. आकाशात पतंग उंचच-उंच उडवताना एकमेकांचे पतंग कापण्याचा आनंदही घेतला जातो. दोऱ्यावर काचेचा थर चढवून धारदार मांजा तयार केला जातो. आता तर नायलॉनचा दोरा वापरून सध्या मांजापेक्षा जास्त मजबूत असलेला मांजादेखील तयार केला जात आहे. मात्र त्या मांजामुळे मानवी जीवन आणि पशुपक्ष्यांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. तो लक्षात घेऊन सरकारने नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा चोरमार्गाने तर काही वेळा राजरोसपणे तो विकला आणि विकतही घेतला जात आहे. नाशिक महानगरात बंदी असल्याने नायलॉन मांजा ग्रामीण भागातून विकत आणला जातो. पतंग उडवण्यासाठी त्याचा वापरही केला जात आहे. पतंग उडवला जातो तो आनंद मिळवण्यासाठी; कोणाचा आनंद हिरवण्यासाठी अथवा कोणाला दुःख देण्यासाठी नव्हे! पतंग उडवताना रस्त्याने जाणारे पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याभोवती जाणते-अजाणतेपणे मांजा अडकून ती माणसे जखमी होऊ शकतात. प्रसंगी दुचाकीला अपघात होऊन चालवणाऱ्याच्या जीवावर बेतू शकते. असे प्रकार दरवर्षी कुठे ना कुठे घडतात. काही जणांना जीवही गमवावा लागतो. माणसेच नाहीत तर आकाशात स्वच्छंदीपणे उडणारे पक्षी किंवा मुके जीवही जखमी होतात. पतंग उडवण्याचा आनंद घेणाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नसते. पतंगबाजी इतरांच्या जीवावर उठत असल्याचे थोडेही गांभीर्य पतंगबाजांना असल्याचे जाणवत नाही. रस्त्यावर, घरांच्या छतावर, गल्ली-बोळात पतंग उडवणारी मुले तसेच पतंगशौकीनसुद्धा त्या नादात पडून जखमी होतात किंवा जीवाला मुकतात. विजेच्या तारांना अथवा खांबांना पतंग अडकतात. ते काढण्याच्या नादात विजेच्या धक्क्याने काहींच्या जीवावर बेतते. म्हणून मकरसंक्रांतीच्या काळात पतंगबाजांना सावधगिरीच्या आणि खबरदारीच्या सूचना 'महावितरण'कडून दरवर्षी केल्या जातात. तशा सूचना 'महावितरण'ने आताही दिल्या असून सर्वांना सावध केले आहे. नायलॉन मांजाला बंदी घालण्यात आली असतानासुद्धा तो कसा विकला जातो? सरकारी यंत्रणांपेक्षा नायलॉन मांजा तयार करणारे, त्याचा चोरमार्गाने पुरवठा करणारे आणि बंदीला न घाबरता त्याचा सर्रास वापर करणारे लोक स्वतःला 'बाहुबली' समजत असतील का? की नियम-कायद्यातील पळवाटा आणि भोके त्याला कारणीभूत असतील? एखाद्या गोष्टीला बंदी घातल्यावर ती हटकून केली जाते. त्याला खतपाणी कोण घालते? यंत्रणांच्या ढिलाईत नियम-कायदेभंग करणारे पर्यायी पळवाटा शोधतात. एकमेकां साह्य करू...' या संतोक्तीचे पालन होते. महाराष्ट्रात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतच असाव्यात यासाठी सरकार आग्रही आहे. तसा नियम-कायदाही करण्यात आला आहे. तरीसुद्धा सरकारला नव्याने तो कायदा सुधारीत करून पुन्हा का आणावा लागावा? काही सेनांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर एकेकाळी भरपूर धिंगाणा घातला होता. त्यावेळीही संबंधित यंत्रणांचा लवचिकपणा सर्वांना सोयीचा ठरत असे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन तरी किती जण काळजीपूर्वक करतात? नियम-कायदा सांगणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कुठेतरी थिट्या पडतात का? परिस्थितीचे गांभीर्य सांगण्यात तेवढे गांभीर्य बाळगले जात नसेल का? नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठीच केले जातात. म्हणून सरकारनेसुद्धा यंत्रणांची ढिलाई खपवून घेता कामा नये. तरच शिस्तपालनाबाबत सामान्यजन गंभीर होतील. तितके गांभीर्य नेते आणि उच्चपदस्थसुद्धा टिकवतात का? राजकीय पक्षांनीसुद्धा सोयीची भूमिका न घेता समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.