समुपदेशनासोबत परीक्षा घेण्याचा कल्पक प्रयोग

समुपदेशनासोबत परीक्षा घेण्याचा कल्पक प्रयोग

दुचाकी चालवताना ती चालवणार्‍या व्यक्तीची सुरक्षा महत्त्वाची असते. दुचाकीस्वाराने सर्वतोपरी काळजी घेतली तरी रस्त्यावरून जाताना पाठीमागून किंवा पुढून एखादे वेगवान वाहन अचानक धडकून अपघात होण्याची शक्यता असते. दोन दुचाकी वाहने एकाच अपघातात सापडतात. अशा घटनाही कमी नाहीत. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असेल तर अपघात झाला तरी त्याचे डोके सुरक्षित राहू शकते, पण हेल्मेटविना दुचाकी चालवली व अपघात घडल्यास चालवणार्‍याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या जीवावर बेतू शकते.

आजवर झालेल्या दुचाकींच्या अनेक अपघातांत हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. म्हणूनच दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक सुरक्षा आणि वाहतूक नियमांत हेल्मेट वापराबाबत प्राधान्य दिले गेले आहे. तरीसुद्धा हेल्मेटविना दुचाकी चालवण्याचे खूळ काही कमी होत नाही. म्हणूनच हल्ली हेल्मेटसक्तीला महत्त्व दिले जात आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत हेल्मेटला ‘बाय-बाय’ करणार्‍यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून मोहिमा राबवल्या जात आहेत.

कायदे धाब्यावर बसवण्याची सवय अंगवळणी पडलेल्या जनतेकडून त्याला विरोधही होत आहे. हेल्मेटसक्तीबाबत नाशिक पोलीस आयुक्तालयाने अभिनव मोहीम आखली आहे. ती वेगवेगळ्या टप्प्यांत राबवली जात आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासून ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ ही नवी मोहीम नाशकात राबवण्यात आली. तिला प्रतिसादही मिळाला. नियम-कायदा धाब्यावर बसवणार्यांनी मात्र पेट्रोल घेण्यापुरते कोणाचे तरी उसणे हेल्मेट घेण्याची क्लृप्ती राबवल्याचेही अनुभवास आले. मोहिमेचा फज्जा उडवणार्‍यांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मग रस्त्यांवर मोर्चा वळवला.

हेल्मेट नसलेल्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते, पण नाशिक पोलिसांनी दंडाऐवजी नियम मोडणार्‍यांचे समुपदेशन केले सुरू आहे. ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क येथे दोन तासांचे समुपदेशन करून दुचाकीस्वारांची सुटका केली जाते. समुपदेशनानंतर दुचाकीस्वार हेल्मेट न विसरता वापरेल, अशी पोलिसांची अपेक्षा आहे, पण समुपदेशनाचा फारसा परिणाम होत नसल्याचेही लक्षात येत आहे. म्हणून आता ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ असा वेगळा उपक्रम दिवाळीत सुरू झाला आहे. हेल्मेटसक्ती मोहिमेला दुचाकीस्वार कंटाळले असतील, पण नाशिकचे पोलीस आयुक्त व आयुक्तालय तरी मागे हटलेले नाही. एनकेनप्रकारेण हेल्मेट वापराचे महत्त्व दुचाकीस्वारांच्या गळी उतरवायचेच, असा जणू चंग पोलीस आयुक्तालयाने बांधलेला दिसतो.

सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि मोठ्या संस्थांमध्ये हेल्मेटधारक दुचाकीस्वारांनाच प्रवेश दिला जात आहे. हेल्मेट न घालता सरकारी कार्यालय वा अस्थापनेत शिरण्याचा प्रयत्न कोणी केल्यास आता त्याच्यावर परीक्षेचा ‘इलाज’ केला जाणार आहे. तशी कल्पना पोलीस आयुक्तालय राबवणार आहे. नियमभंग करणार्या दुचाकीस्वारांना एका वेगळ्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. हेल्मेटचा नियम मोडणार्‍या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन जवळच्या समुपदेशन केंद्रात नेले जाईल.

हेल्मेटसक्तीबाबतचे आतापर्यंतचे आदेश आणि मोटरवाहन कायद्यातील तरतुदींची माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तेथे त्यांना ती पुस्तिका वाचण्यासाठी दिली जाईल. ती वाचून झाल्यानंतर तेथेच त्यावर आधारित प्रश्नपत्रिका संबंधिताना दिली जाईल. त्यातील किमान 50 टक्के प्रश्नांची बरोबर उत्तरे देणार्यांना त्यांची दुचाकी परत केली जाईल. 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण असणार्यांना मात्र पुन्हा दोन तास अभ्यास करून परीक्षा द्यावी लागेल. दंड भरण्यापेक्षा परीक्षेची शिक्षा हेल्मेटचे वावडे असणार्‍यांना जरा कठीण वाटू शकते, पण पोलीस आयुक्तालय राबवत असलेला हा प्रयोग कल्पक आणि अभिनव आहे.

नियम मोडणार्‍या सर्वांना परीक्षेचा न्याय सारखाच लावला जाईल याबद्दल दक्षता बाळगली गेली पाहिजे. अन्यथा ओळखी-पाळखी वा अतिविशिष्ट व्यक्तींना परीक्षेच्या दिव्यातून सुटका मिळाली तर मात्र उपक्रमाचे गांभीर्य कमी होईल. हेल्मेटविना दुचाकी पळवणार्यांवर ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई केली जात नाही. कदाचित त्यामुळे ते अधिक निर्भीड बनलेले दिसतात.

हेल्मेट वापराबाबत लोकप्रबोधन आणि संभाव्य अपघातात जीव सुरक्षित राहावा याला प्राधान्य दिले गेले आहे. पोलीस आयुक्तालय आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी धडपडत आहे याची जाणीव हेल्मेट वापराच्या नियमाला तिलांजली देऊन मनमानी करणार्‍यांना कधी होणार?

Related Stories

No stories found.