Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखमनसेनेची प्रतिमा उजळणारे अनुकरणीय उदाहरण!

मनसेनेची प्रतिमा उजळणारे अनुकरणीय उदाहरण!

करोनानंतरची लग्नसराई उत्साहाने सुरु झाली आहे. एप्रिल-मे महिन्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईचे नाते वर्षानुवर्षे जुळलेलेच आहे. आप्तस्वकीयांना मोठ्या संख्येने लग्नसोहळ्यात सहभागी होता यावे आणि त्यांना आनंद लुटता यावा यासाठी याच दोन महिन्यातील लग्नमुहूर्त साधण्याकडेच बहुतेकांचा कल आढळतो. विवाह हा दोन कुटुंबांचे मनोमिलन घडवणारा सोहळा! यानिमित्ताने आप्तेष्ट, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींचा गोतावळा जमतो. गाठीभेटी होतात. गप्पाष्टके रंगतात. ज्येष्ठ मंडळी सुखद आठवणींमध्ये रमतात. तथापि विवाहसोहळ्याचे हे पारंपरिक रुप आता पालटू पाहात आहे. विवाहसोहळा दोन कुटुंबांपुरता मर्यादित न राहाता त्याला दिखाऊ आणि सार्वजनिक प्रतिष्ठेचे स्वरुप प्राप्त होत आहे. प्री वेडिंग फोटो शूट, डेस्टिनेशन वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटो शूट असे नवे रंगढंग रुजत आहेत. पुर्वी एकाच दिवसात विवाहसोहळा आटोपायचा. सकाळी लग्नघरी आलेले वर्‍हाड नवरीसहित त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या गावी रवाना व्हायचे. पण आता जनसामान्यांच्या घरचे लग्न किमान दोन-तीन दिवस चालते. लग्नासाठी ‘होऊ द्या खर्च’ असाच दृष्टीकोन बळावला आहे. मोठेपणा मिरवण्यासाठी ‘ऋण काढून सण (लग्न) साजरे’ केले जात आहे. लग्न पार पडले यापेक्षा लग्न कसे झाले ही चर्चा संबंधितांच्या घरोघरी महिनापंधरा दिवस चालू राहाते. परिणामी लग्न दणक्यात व्हावे अशीच अपेक्षा वाढीस लागली आहे. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घरी देखील लग्न दिमाखात करुन दिले जावे हाच अट्टाहास वाढत आहे. विवाहाचा सगळा खर्च मुलीच्या घरच्यांनी करायची पद्धत या समानतेच्या पोपटपंचीच्या काळात सुद्धा रुढच आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नामुळे तिच्या घरचे कर्जबाजारी होतात. शेतकरी त्यांच्याकडची जमीन देखील विकतात. यासगळ्यामागे मुलीला सासरी सुखाने नांदवले जावे एवढीच अपेक्षा असते. ती अपेक्षा किती प्रमाणात पूर्ण होते हा भाग अलाहिदा. आर्थिक परिस्थिती सधन नाही आणि मुलगा किंवा मुलीची दिमाखदार लग्नसोहळा साजरा करण्याची इच्छाही मोडवत नाही अशा कात्रीत अनेक कुटुंबे सापडतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी मनसेनेने पुढाकार घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहूल विक्रमगड येथे मनसेनेतर्फे 750 पेक्षा अधिक जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा नुकताच पार पडला. यावेळी जोडप्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. करोनाची लाट सध्या ओसरली असल्याचे राज्य सरकार सांगते. तथापि त्याच्या अजून किती लाटा येथील हे माहित नसल्याचेही तज्ञ बोलत आहेत. त्यामुळे करोना काळात विवाहसमारंभावर आणि उपस्थितांच्या संख्येवर सरकारने मर्यादा आणल्या होत्या. साहजिकच विवाहसमारंभ काहीसे आटोपशीर झाले होते. करोना काळात अनेकांची पारिवारिक आर्थिक घडीही विस्कटली आहे. परिणामी निमित्त कोणतेही असो, आर्थिक भुर्दंड सहन करण्याची ताकद अभावानेच आढळते. सामुदायिक विवाह हा या समस्येवरचा सध्याचा व्यवहार्य उपाय आहे. जो मनसेनेने अंमलात आणला आहे. यामुळे निदान साडेसातशे कुटुंबांचा विवाहावर होणारा खर्च बर्‍याच प्रमाणात नक्कीच टळला असेल. मनसेना म्हटले की ‘खळखट्याक’ अशी लोकांच्या मनातील प्रतिमा आहे. ती प्रयत्नपूर्वक उभी केली गेलेली आहे. तोडफोड आणि मारझोड मनसेनेच्या प्रतिमेशी जोडली गेली आहे. ते बरोबर की चूक हा चर्चेचा विषय ठरावा. तथापि ती प्रतिमा जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न सामुदायिक विवाहसोहळ्याच्या निमित्ताने केला गेला असावा. विवाहांवर होणारा अनावश्यक व फालतू खर्च टाळण्याकरता सामुदायिक विवाह सोहळ्याचा पर्याय मनसेनेने कृतीतून दाखवून दिला आहे. इतरेजन त्याचे अनुकरण करतील अशी अपेक्षा. यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे संबंधितांकडून नक्कीच मन:पूर्वक अभिनंदन केले जात असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या