सामाजिक सलोख्याचे उद्बोधक दर्शन!

सामाजिक सलोख्याचे उद्बोधक दर्शन!

संतविचार आणि महापुरुषांच्या आदर्शांचा पुरस्कार व त्यांचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी महाराष्ट्राला धर्मांधतेकडे घेऊन जाण्याचे मनसुबे काही मनकवड्या पुढार्‍यांनी रचले असावेत. म्हणूनच धार्मिकतेला हवा देऊन महाराष्ट्रातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे कारखाने सध्या सुरू झाल्याचे दिसत आहे. मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मागणीपासून हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट मुख्यमंत्र्यांकडे धरण्यापर्यंत या कारखान्यांची व्याप्ती आढळते. ईडी, सीबीआय, एनआयए, एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणांना महाराष्ट्रात कामाला लावून सत्ताधारी नेत्यांमागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला आहे. त्याचा फारसा प्रभाव पडत नाही म्हणून आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचे उपद्व्याप राजरोस सुरू झाले आहेत. रामनवमीच्या दिवशी गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या. दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार उसळला. या घटनांनी देशाच्या धार्मिक सलोख्याला धक्का लागला. महाराष्ट्र सरकार खंबीर आणि मजबूत असल्याने अजून तरी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे सरकारला निर्वाणीचा इशारा देणारे ‘भोंगे’ आता घोंघावू लागले आहेत. देशातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांची दखल घेऊन 13 राजकीय पक्षांनी एका संयुक्त निवेदनात चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारचे त्याकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांनी शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवावा, असे आवाहनही केले आहे. हिंसाचार घडवणारे असंतुष्ट आत्मे नेमके कोण असावेत? ते या घटनांच्या ध्वनिचित्रफितींतून स्पष्ट झाले आहे. ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी, यह गुलिस्तां हमारा’ असे एकसुरात म्हणणार्‍या भारतीयांचा ‘विविधतेत एकते’वर दृढविश्‍वास आहे. म्हणून जातीय तेढ वाढवण्याचे प्रयत्न आणि मनसुबे देशवासीयांनी नेहमीच उधळून लावले आहेत. जात-धर्म-पंथाचे विष कालवून सामाजिक सौहार्द विखारी करून राजकीय पोळी भाजण्याचे सत्ताप्रेमींचे प्रयत्न लोकशाही आणि राज्यघटनेचा आदर करणारा भारतीय समाज कधीही यशस्वी होऊ देणार नाही. देशातील हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील रामभूमी नाशिकमध्ये हनुमान जयंतीला जातीय सलोख्याचे आदर्श दर्शन घडवले गेले. हनुमान जयंतीनिमित्त पंचवटी आणि भद्रकाली परिसरातून प्रथा-परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आली. करोना संकटमोचनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच निघालेल्या मिरवणुकीत सहभागी भाविकांचा उत्साह मोठा होता. मिरवणूक दूध बाजार परिसरात पोहोचल्यावर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे सहर्ष स्वागत केले. मिरवणुकीतील प्रमुख मान्यवरांचा यथोचित सन्मानही करण्यात आला. सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचे दर्शन घडवणार्‍या या प्रसंगात तरुण मुस्लिम कार्यकर्त्यांचा पुढाकार उल्लेखनीय होता. राजकीय पुढार्‍यांकडून मंदिर-मशिदीबाबत उच्चरवाने वाजणार्‍या भोंग्यांचा आवाज नाशकातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा कायम राखून क्षीण केला. राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना उधळून लावले. हा प्रसंग दिसायला लहान वाटत असला तरी त्यामागील भावना आणि अर्थ विशाल आहे. सामाजिक सलोख्याचे दर्शन महाराष्ट्राच्या गावोगावी नेहमीच घडते. छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे आदी महापुरुषांची जयंती, दिवाळी, रमझान, ईद, नाताळसारख्या अनेक सण-उत्सवांत त्याची प्रचिती येते. सर्वधर्मीय लोक एकमेकांच्या सण-उत्सवांत हिरिरीने आणि आपलेपणाने सहभागी होतात. दिवाळीला हिंदूंच्या घरी मुस्लिम बांधवांना फराळाला बोलावले जाते. रमझान महिन्यात इफ्तार पार्ट्यांमध्ये सर्वधर्मीय सहभागी होतात. ईदच्या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे राजकीय लढायांमध्ये पराभूत झालेल्या काही नेत्यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेच्या एकजुटीपुढे ते फोलच ठरतील. हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवेळी नाशिकमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी परस्पर सामंजस्य राखून त्याचा प्रत्यय दिला. सरकारने अमूक करावे, तमूक करावे; अन्यथा आम्ही ते करू, त्याचे बरे-वाईट परिणाम झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असे पोकळ इशारे देणार्‍यांनी आपल्या वाचाळपणामुळे सामाजिक सलोख्याला बाधा येणार नाही याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. ही त्यांचीच जबाबदारी आहे. विशिष्ट नेते सत्तेसाठी तळमळत असल्याने त्यांच्याकडून जाणून-बुजून काही प्रमाद घडवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी सामान्य माणसे सुजाण आहेत. आपल्या कृतीतून ते सूज्ञपणाचे दर्शन घडवत आहेत. नाशिकसारखा सामाजिक एकोपा सर्वत्र अनुभवास यावा म्हणून सामान्य जनतेनेच जागरूक राहिले पाहिजे. तसे झाल्यास महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला आणि सलोख्याला नख लावायला कुठल्याही सेनापतीचे प्रयत्न कसे पुरे ठरणार?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com