शेतकर्‍यांची उमेद जागवणारा उपक्रम!

शेतकर्‍यांची उमेद जागवणारा उपक्रम!

हवामान बदलाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम शेतीवर होतो असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. शेतीच्या व्यवसायाला निश्चित उत्पन्नाची शाश्वती सध्या तरी नाही असे मत शेतकरीही व्यक्त करतांना आढळतात. शेतीसाठी शेतकर्‍यांना हवामान बदलाचा अंदाज देणे महत्वाचे आहे. लहरी मान्सून, दुष्काळ, अती पावसाने येणारे पूर यामुळे शेतकरी त्रासले आहेत.

किमान दहा ते शंभर वर्षांपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील हवामान अंदाज वर्तवण्यासाठी जगातील हवामान शास्त्रज्ञ आणि संस्था यांनी एकत्रित काम करणे आवश्यक असल्याचे मत हवामान बदलासंदर्भात गेल्या वर्षी झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. गेली अनेक वर्षे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची पाठ सोडलेली नाही. यंदा तर मोसमी पावसानेही महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.

या पावसाने अनेक शेतकर्‍यांचे शेतातील उभे पीक उध्वस्त केले आहे. खरिपाची बरीच उत्पादने धोक्यात आली आहेत. वर्षानुवर्षे अशाच विपरीत परिस्थितीचा सामना करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. तथापि अशा काळातही काही शेतकरी उमेद हारु देत नाहीत. आव्हानांचा सामना करण्याचा सतत प्रयत्न करतात. शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. नवीन तंत्रज्ञान आपलेसे करतात. प्रत्येक प्रयोगातून नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात.

पीक पद्धती आणि बदलते हवामान यांचा अभ्यास करून स्वतःचे आडाखे बांधतात. यातील कोणी माळरानावर फळबाग लागवड करतो तर दुसरा एखादा भाजीपाल्याचे प्रयोग करतो. अशा यशस्वी प्रयोगशील शेतकर्‍यांचा शासनही दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरव करते. अशा काही शेतकर्‍यांच्या यशोगाथा विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. तथापि सर्वच प्रयोगशील शेतकर्‍यांचे प्रयोग सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतातच असे नाही.

वास्तविक सामान्य शेतकर्‍यांना जे प्रश्न भेडसावतात तेच प्रयोशील शेतकर्‍यांनाही भेडसावत असतात. तथापि त्यांनी आव्हानांवर केलेली मात सामान्य शेतकर्‍यांना प्रेरणा देणारी असते. पण विविध मर्यादांमुळे सगळे शेतकरी प्रत्यक्षात प्रयोगशील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न पुण्याच्या कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाने केला आहे. या विभागाने शेतकर्‍यांसाठी ज्ञानाची पेढी ((नॉलेज बँक) सुरु केली आहे. शेकडो शेतकरी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. प्रयोगशील शेतकरी, त्यांची ओळख, त्यांचे प्रयोग, त्यांचा संपर्क क्रमांक अशी माहिती कृषी आणि संबंधित खात्यांच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.

समस्याग्रस्त किंवा ज्यांना माहिती हवी आहे अशा शेतकर्‍यांनी यादीतील शेतकर्‍यांना संपर्क करून त्यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यावे असा ही पेढी तयार करण्यामागचा हेतू आहे. या उपक्रमाला शेतकर्‍यांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे संबंधित विभागाने माध्यमांना सांगितले. अशी पेढी तयार करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली. हा उपक्रम सामान्य शेतकर्‍यांमध्ये उमेद जागवणारा आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.

एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आठशेपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. सामान्य शेतकर्‍यांना जाणवणार्‍या समस्यांवर मात करणारा, त्यांना व्यवहार्य सल्ला देणारा आणि त्यांच्या भावना समजावून घेणारा मायेचा आधार त्यांच्यासाठी मोलाचा ठरू शकतो. तोही हेतू या उपक्रमामागे असावा. जसजशी व्यवहार्य दृष्टिकोन बाळगणारी माणसे मोठमोठ्या पदांवर येतील तसतसा शासनाचा कारभार सुधारेल आणि तो अधिकाधिक लोकाभिमूख होईल अशा आशा या उपक्रमाने वाढतील. ज्ञानाची पेढी जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत अद्यावत ज्ञान पोहोचवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करीन अशी आशा करावी का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com