तीन महिने सुटी निर्हेतूक असेल ?

jalgaon-digital
5 Min Read

घटनेने नागरिकांना बहाल केलेल्या हक्क व अधिकारांत समानतेचा समावेश आहे. तथापि सध्या ते सर्वच मूलभूत हक्क व अधिकार वादाच्या भोवर्‍यात भिरभिरत आहेत. किमान एक हक्क तरी नागरिकांना मोकळेपणाने उपभोगता यावा असा विचार सरकारने केला असावा का? उद्या नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी सरकारी सेवकांना मोठी खुशखबर दिली गेली आहे. भारतीय सैन्यदलातील जवानांना दरवर्षी शंभर सुट्या देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली आहे. देशासाठी सीमेवर तैनात केलेल्या सेवकांना कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहावे लागते. त्यांना सुट्या वाढवून देण्याचा हेतू सहज लक्षात येईल. वर्षभर अन्य सरकारी सेवकांना साप्ताहिक सुटीसह तीन महिने सुट्या यापुढे उपभोगता येतील. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहलीला गेले आहेत. अनेक निमित्तांनी लोकप्रतिनिधींचे असे ‘पक्षीय’ वा कामकाजी पर्यटन सतत सुरूच असते. आमदार-खासदार आदी लोकप्रतिनिधी तर्‍हेतर्‍हेच्या सुट्या व सवलती घेतच असतात. देशात सर्वत्र त्यांचे पर्यटन जनतेच्या पैशातून चालू असते. निदान स्वखर्चाने तरी त्यांच्यासारखाच थोडाफार आनंद सरकारी सेवकांना घेता यावा हा उदात्त विचार सुट्या वाढवण्यामागे असावा. जोडून सुट्या असतील तरच पर्यटनाचा विचार सरकारी सेवकांना करता येईल. लोकप्रतिनिधींना सरकारी खर्चाने मिळणारी सवलत व पर्यटनाचा आनंद सरकारी सेवकांना स्वखर्चाने तरी मिळावा, वेतन मर्यादेत जमेल तेवढे पर्यटन तरी करता यावे व या रितीने काही प्रमाणात तरी समानता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे पाऊल सरकारला सुचले असल्यास ते स्वागतार्हच ठरावे. जनतेनेसुद्धा जमेल तितके पर्यटन करावे. जवळपासच्या पर्यटनस्थळांना तरी भेट द्यावी, अशी अपेक्षा प्रधानसेवकांनी ‘मन की बात’मध्ये नुकतीच व्यक्त केली आहे. सेवक शब्दाचाही त्यामुळे दबदबा वाढावा अशीही कदाचित सरकारची अपेक्षा यामागे असू शकते. आमजनतेची समानता अद्यापतरी कवी कल्पनेसारखीच आहे. तथापि सरकारी सेवक व सैन्यदले तरी काही प्रमाणात समानतेच्या पातळीवर येतील आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या पैशांवर उपभोगत असलेल्या सवलतींबद्दल अधूनमधून व्यक्त होणारी असुयेची भावना काहीशी बोथट होऊ शकेल, असा सूज्ञ विचार यामागे असेल का? शंभर टक्के समानता ही प्रत्यक्षात येणे अशक्यच आहे. स्वर्गलोकसारख्या काल्पनिक प्रदेशातही ते शक्य होणार नाही. तिथेही कोणाला तरी इंद्रपदी बसावेच लागते. इतरेजन तिथेही प्रजाजनच असावेत, पण भारताच्या कारभाराची जबाबदारी निभावणार्‍या काही टक्के भारतीय जनतेला तरी समानतेचा अनुभव मिळाल्यास इतरांची असुया कदाचित कमी होऊ शकेल. बायोमेट्रिक हजेरीचे बंधन हळूहळू सरकारी-निमसरकारी संस्थांत अमलात येत आहे. तेवढ्या बौद्धिक श्रमांनीसुद्धा सेवकांवर मानसिक ताण वाढत असेल. कामचुकारपणाला नव्या-नव्या सबबी शोधाव्या लागत असतील. त्यालाही तीन महिन्यांची हक्काची सुटी हा एक विधायक उतारा ठरू शकेल.

सल्ला सोपा, पण स्वीकार कठीण !

संगीताच्या सुरांत रमणे व त्याच्या नादात गुंग होण्याने जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. दैनंदिन जीवनातील ताण कमी होतात. एकाग्रता व कार्यक्षमता आपोआप वाढते. मात्र हल्लीचे पालक ‘रिअ‍ॅलिटी शो’सारख्या कार्यक्रमांतून बालकांवर संगीताचाच ताण वाढवतात. पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नयेे. त्यांना संगीताचा आनंद घेऊ द्यावा’ असा सल्ला लोकप्रिय संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी दिला आहे. माणसाच्या जीवनात संगीताला विशेष स्थान आहे. कार्यक्षमता व एकाग्रता हे विशेष गुण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असतात. ते संगीतातही महत्त्वाचे असतात. महादेवन यांनी हेच अधोरेखित केले. महादेवन हे शिक्षणाने अभियंता आहेत. त्यानंतर ते संगीत क्षेत्राकडे वळले. अभियंता आणि डॉक्टरकीचे शिक्षण प्रचंड महागले आहे. या दोन्हींसाठी लागणारे शैक्षणिक शुल्क सामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर चालले आहे. मुलांना हे शिक्षण देण्यासाठी अनेक पालकांना कर्ज काढावे लागतच असेल. लाखो रुपये खर्च करून डॉक्टर आणि अभियंता बनवलेल्या आपल्या मुलांनी चाकोरीबद्ध वाट सोडून अन्य क्षेत्रांकडे वळावे असे किती पालकांना मनापासून पटेल? किती पालक मुलांना तशी परवानगी देतील? काही पालकांनी तशी तयारी कदाचित दर्शवली तरी सर्व तरुणांना भव्यदिव्य यश संगीत क्षेत्रात मिळू शकेल याची कोण खात्री देणार? क्षेत्र कुठलेही असो; यश कष्टसाध्यच असते. काही प्रमाणात नशिबावरही अवलंबून असते. शंकर महादेवन यांनी संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यापूर्वी अथक मेहनत घेतलीच असेल. ‘ब्रेथलेस‘ या गायन प्रकारातून महादेवन यांच्या मेहनतीचे प्रात्यक्षिक जनतेने पाहिले आहे. त्यांच्यानंतर काही गायक-गायिकांनी तसा प्रयत्नही केला, पण नाव कोरले गेले ते शंकर महादेवन यांचेच! तरुण पिढीला मात्र सर्वच झटपट (इन्स्टंट) हवे असते असे बोलले जाते. त्याला यशदेखील अपवाद नाही. मात्र मेहनत करण्याची तयारी कदाचित अपवाद ठरावी. अशा स्थितीत मळलेल्या वाटेने जाण्याचा सोपा सोपान टाळून प्रवाहाविरुद्ध पोहावे व लौकिक मिळवावा; त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी, अशी तयारी किती तरुण दाखवतील? युग स्पर्धेचे आहे. सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा तरुण पिढीवरील मानसिक व शारीरिक ताण नित्य वाढवत आहे. मळलेल्या वाटेचा राजमार्ग सोडून अनवट वाट चोखाळण्याचा निर्णय मुलांनी घेतल्यास किती पालक त्याला प्रोत्साहन देतील? शक्यतो लवकर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून त्याने जीवनात स्थिर व्हावे, पालकांच्या उत्तरायुष्यात त्यांचा सांभाळ करावा, अशीच सामान्यत: अपेक्षा असते. अनोळखी प्रांतात पदार्पण करून आर्थिक ओढाताण करून घेणे किती पालकांना झेपणार? महादेवन यांच्यासारख्या यशस्वी संगीतकाराला हे प्रश्न कदाचित पडले नसतील. तथापि कोणतेही सल्ले विचारात घेणार्‍यांना या सर्व प्रश्नांचाही विचार करावा लागणार आहे हे सत्य कसे नाकारणार?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *