अग्रलेख

न्या. बोबडेंची चिंता अस्थानी नाही

Balvant Gaikwad

सध्या देश कठीण प्रसंगातून जात आहे. हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे’ अशी चिंता देशाच्या सरन्यायाधिशांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ‘अशा परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. तथापि कट्टरतावाद्यांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. त्यांनी देशभक्त आणि देशद्रोहाची व्याख्या बदलवली आहे. सत्तापतींच्या विरोधात बोलणार्‍यांना सर्रास देशद्रोही ठरवले जात आहे. याचे विपरित परिणाम असंख्य व्यक्ती सहन करीत आहेत. तरी बोलण्याचे धाडस मात्र क्वचितच दाखवले जात आहे. 

सरन्यायाधीश बोबडे यांनी देशातील सद्यस्थितीबद्दल परखड भाष्य केले. यावरून त्यांच्या मनातील देशाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दलची घालमेल स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राला रामशास्त्री प्रभुणे यांच्यापासून नि:स्पृह न्यायाधिशांची परंपरा लाभली आहे. बोबडे यांच्यासारख्या निर्भिड व्यक्तिमत्त्वांमुळे ती आजही लुप्त झालेली नाही हे जाणवते. आपल्या परखड भाष्याने कदाचित सत्तापती दुुखावतील याची जाण बोबडे यांना नसेल असे कसे मानावे. तरीही त्यांनी हा स्पष्टवक्तेपणा दाखवला आहे. त्यामुळे कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून मते व्यक्त करण्याची प्रवृत्ती भारतीयांत वाढीस लागेल का? ‘एखाद्याचे म्हणणे पटत नाही म्हणून हिंसाचाराच्या माध्यमातून अभिव्यक्त होणे चुकीचे आहे. समोरील व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे मत ‘शोध मराठी मनाचा 2020’ संमेलनाचे अध्यक्ष सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. ‘स्वा. सावरकरांचे निमित्त करून देशात सध्या घमासान सुरू आहे. स्वा. सावरकर देशभक्त होते. त्यांच्याविषयी बोलताना याचे भान राखले जायला हवे. तथापि सगळेच देशभक्त मुळात माणसे आहेत हे विसरून कसे चालेल? ‘माणूस हा स्खलनशील प्राणी आहे’ हे नाकारता येईल का? पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वा. रा. करंदीकर हे प्रखर सावरकरभक्त होते. त्यांचे आत्मचरित्र किती सावरकर भक्तांनी वाचले आहे? प्रसिद्ध पत्रकार निरंजन टकले यांनी थेट लंडनला जाऊन अंदमानमधून सुटण्यासाठी सावरकरांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेली पत्रे शोधून काढली. ती सावरकरभक्तांना माहीत आहेत का? ब्रिटीश सरकार त्यांना वर्षासन देत होते हे ऐतिहासिक वास्तव केवळ भक्तांच्या दुराग्रहामुळे पुसले जाईल का? ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नये यासाठी त्यांना ब्राह्मण महासंघाने धमकी दिली आहे. देशभक्त सगळ्या देशाचे असतात. त्यांचा संबंध जानव्याशी जोडणे हे समाजाचे दुर्दैव आहे. सगळ्याच महान राष्ट्रपुरुषांना महत्त्व दिले जाऊ लागले आहे त्याबद्दलची ही असुया आहे का? देशात सर्रास राष्ट्रपुरुषांची अवहेलना सुरू आहे. त्याविषयी देशात रान उठवावे असे किती देशभक्तांना वाटते? गांधीजींच्या प्रभावळीत महाराष्ट्रातील अनेक नररत्नांचा समावेश होतो. विनोबा भावे, डॉ. दादासाहेब धर्माधिकारी, आचार्य भागवत, आचार्य काका कालेलकर, अण्णासाहेब पटवर्धन आदी कितीतरी नामवंतांचा त्यात समावेश आहे. तथापि भक्तांना कौतुक करावेसे वाटते ते महात्माजींचा खून करणार्‍या नथुराम गोडसे या नराधमाचे! भारताच्या संस्कृतीचे गोडवे गाणार्‍या किती जणांनी याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे? महाराष्ट्र संस्कृतीचे मोठेपण डागाळणार्‍या अशा उदाहरणात ब्राह्मण महासंघाचीही भर पडावी हे मराठी मुलखाचे दुर्दैव नाही का?

Deshdoot
www.deshdoot.com