Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखदेवीने सर्वांना सदबुद्धी द्यावी!

देवीने सर्वांना सदबुद्धी द्यावी!

राज्य सरकारच्या परवानगीने कालपासून राज्यातील वाचनालये सुरु झाली. याबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील (कंटेनमेंट झोन) आठवडे बाजार व दुकाने सुद्धा सुरु झाली. टप्प्याटप्याने मुंबईमधील मेट्रो सुरु होणार असेही सांगितले जात आहे.

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील शिक्षणसंस्था, व्यायामशाळा आणि धार्मिक स्थळे सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात कलाकार आणि त्यांच्या सहकार्‍यांना करोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल. तोंडाला मुसके न बांधता कोणालाही कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येऊ नये अशा काही सूचनांचा त्यात समावेश आहे. 6-7 महिन्यांपासून हा लॉक-अनलॉकचा खेळ सुरु आहे. तो अजून किती दिवस सुरु ठेवला जाणार हे अद्याप सरकारलाच माहित नाही. खरोखरी या रीतीने कोणत्या गोष्टी का बंद केल्या गेल्या आणि त्या पुन्हा सुरु करण्याचे नेमके धोरण काय याबाबत जनतेला पूर्णपणे अंधारात का ठेवले जात आहे? देशाचे भवितव्य घडवणार्‍या शाळा व शिक्षणसंस्था का बंद आहेत? शाळांच्या परीक्षा होणार का, आपण पुढच्या वर्गात जाणार का याबद्दल विद्यार्थी पूर्णपणे गोंधळलेले आहेत. या अनिश्चिततेचा परिणाम कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर काय होत असेल याची कल्पना कार्यालयातून केवळ आदेश बजावणार्‍या अधिकारी वर्गाला तरी असेल का? अवाढव्य सरकारी यंत्रणेची अशी अनभिज्ञ अवस्था असेल तर सामान्य जणांचे जीवन या अनिश्चिततेमुळे किती चिंताग्रस्त असेल याची कोण दखल घेणार? लोकांनी या अनिश्चित परिस्थितीत किती काळ काढावा अशी शासनाची कल्पना आहे? या लॉक-अनलॉक कार्यक्रमाचा काही निश्चित आराखडा सरकार जनतेला सांगू शकेल का? लोकांनी घराबाहेर पडावे की घरकोंबडे होऊन राहावे? घरात कोंडले गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मानसिक आणि शारीरिक अवस्था काय असेल? आता तर परिस्थितीतील या अनिश्चिततेमुळे आत्महत्येच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात झळकू लागल्या आहेत. आत्तापर्यंत बंद असलेल्या गोष्टी सुरु करण्याचा वेगही कासवाचा आहे. लॉक-अनलॉकचा खो खो खेळून शासनाला काय साध्य करायचे असावे? बंदमुळे करोनाची लागण कमी झाली असा दावा सरकार तरी करू शकेल का? मग बंदच्या खेळाने नेमके काय साध्य झाले? आता बंद शिथिल केल्याचा काही दृश्य परिणाम करोनाच्या लागणवर झाला आहे असेही चित्र आढळत नाही. प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत किंवा बदलत आहेत. करोनाचा संसर्ग देखील कमी झाल्याचे चित्र अद्याप नाही. जनतेत करोना साथीची दहशत कायम ठेवण्यात मात्र सरकार यशस्वी झाले असे फार तर म्हणावे का? की तोच सरकारचा या बंद-उघडमागिल उद्देश असावा? रुग्णांचे आकडे रोज जाहीर होतात व त्यासोबतच रुग्णसेवेतील उणीवांचा बातम्याही प्रसिद्ध होतात. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा तर कुठे खाटा उपलब्ध नाहीत, अनेकांना संशयित रुग्ण म्हणून घर-बंदिस्त बनून राहावे लागत आहे. ती संख्या अद्याप कमी होताना आढळत नाही. जाहीर होणारी आकडेवारी तपासण्याचे कोणतेही साधन जनतेकडे नाही. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा गजरही वाढत आहे. मृत्युमुखी पडणारांची संख्या कमी होत आहे असे सांगितले जात आहे. तथापि या कोणत्याही आकडेवारीवर किती विश्वास ठेवावा याची साशंकताही वाढत आहे ती का याचा शोध सरकार घेईल का? तथापि लॉक-अनलॉकचा खेळ आता थांबवलेला बरा! त्याबाबतचा वेळकाढूपणा जनतेच्या मानसिक आरोग्याला आमंत्रण ठरत आहे हे सरकारने लक्षात घ्यावे. कारण जनतेने अर्धे वर्ष दहशतीखाली घालवले आहे. निश्चित उत्पनाचे साधन हाती नसलेले लाखो लोक रोजंदारीच्या कामावर आपली गुजराण करतात. उदरनिर्वाह चालवतात. अशा लाखो लोकांचे रोजीरोटीसाठी घराबाहेर न पडल्यामुळे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. योग्य ती दक्षता घेऊन लोकांना नाईलाजाने घराबाहेर पडणे आवश्यक होत आहे. तेव्हा झाला तेवढा कुलूपबंदीचा खेळ पुरे. लोकलअभावी मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांचे हाल आणखी लांबवू नयेत. आज घरोघरी घटस्थापना होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. सगळे निर्बंध हटवण्याची सदबुद्धी देवी सरकारला देईल.

- Advertisement -

हीच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या