बोलाचीच कढी...?

बोलाचीच कढी...?

शासन-प्रशासनाची कार्यक्षमता अनेकदा जनतेच्या चर्चेत विनोदी विषय ठरवली जात असते. समाजमाध्यमांवर सुद्धा त्याबद्दलची व्यंगचित्रे (कार्टून्स व वात्रटिका) नेहमीच आढळतात. पण या सर्वावर कडी करणारा एक तिखट विनोद एका सरकारी कार्यक्रमातच घडून आला.

तो विनोद खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत सांगितला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील कार्यालयाच्या नव्या इमारतीचा उदघाटन समारंभ होता. तो गडकरींच्या शुभहस्ते पार पडला. साधारणपणे कुठलेही रचनात्मक काम पुरे झाल्याबद्दल संबंधितांवर उदघाटन कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळली जाण्याची साधारण प्रथा आहे. पण या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांकडून त्यांच्या अत्यंत शालीन विनोदी शैलीतील तिखट शालजोड्यांचा वर्षाव झेलण्याची पाळी संबंधित अधिकारी वर्गावर आली. म प्रशासनातील दीर्घसूत्री कार्यपद्धतीमुळे कोणताही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. कधी पुरा होईल याबद्दलच्या मुदतीचे वेगवेगळे अंदाज वारंवार सांगितले जातात. प्रत्यक्षात मात्र क्वचितच एखादे काम मुदतीत पुरे होते. एरवी प्रकल्प पुरा करण्यात होणार्‍या दिरंगाईमुळे मूल्यवान वेळ वाया जातो. प्रकल्पाची किंमत वाढत जाते. यापुढे असे होणे परवडणार नाही. त्यामुळे खात्यातील अकार्यक्षम अधिकार्‍यांपासून खाते मुक्त करावे लागेल. अशा बोचर्‍या पण नेहेमीच्या मिश्किल हसतमुखाने नामदार गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकार्‍यांना ऐकवले. तरी बरे समारंभ दूरस्थ पद्धतीने झाल्यामुळे ऐकणार्‍यांच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव बघण्याची संधी उपस्थितांना मिळाली नसावी. या इमारतिच्या प्रस्तावाला 2008 मध्ये शासन मंजुरी मिळाली. 2011 साली निविदा निघाल्या. 200 कोटींचा निधीही मिळाला. तथापि हे काम पूर्ण होण्यास 9 वर्षे लागली. हा विलंब कुणालाही खटकण्यासारखा आहे. त्या खात्याचे मंत्रिपद संभाळणार्‍याकडे देखील या विलंबाचे श्रेय कोणीही देणारच. ज्या ‘महान’ अधिकार्‍यांमुळे हा दीर्घ विलंब झाला त्यांची छायाचित्रे या इमारतीत लावली पाहिजेत अशी भेदक टिप्पणीही त्यांनी केली. गडकरी मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्री मानले जातात. त्यांचा कामाचा झपाटा विलक्षण आहे. त्यांचे विरोधकही त्याबाबतीत कौतुकाने बोलत असतात. त्यांचे मनमोकळे स्पष्टवक्तेपण सर्वपरीचित आहे. त्यांच्याच खात्यातील प्रशासनाधिकार्‍यांना हा घरचा आहेर त्यांनी बहाल करण्याची हिंमत दाखवली. प्रशासनाची ढिलाई कोणत्या पातळीवर गेली आहे याचा विचार सरकार करील का? 200 कोटींची इमारत पूर्ण होण्यास 9 वर्षे लागत असतील तर छोट्यामोठ्या योजना व प्रकल्प कोणत्या वेगाने पुरे होत असतील? किरकोळ कामासाठी जनतेला शासकीय कार्यालयांचे उंबरठे का झिजवावे लागतात हे देखील यावरून स्पष्ट व्हावे. कुठल्याही प्रकल्पाचे काम ठरल्या मुदतीत पूर्ण झालेच पाहिजे यावर खासगी आस्थापनांचा भर असतो. उड्डाणपूल किंवा धरणांसारख्या प्रचंड योजना सुद्धा वर्षानुवर्षे का रेंगाळतात? कोणामुळे रेंगाळतात? गडकरींच्या म्हणण्यानुसार अधिकार्‍यांच्या अकार्यक्षतेबरोबरच खाबुगिरीची साखळी हे याचे मुख्य कारण आहे. अर्थात याचा दोष फक्त प्रशासनाला देणे अधिकार्‍यांसाठी अन्यायकारक ठरेल. साखळी फक्त अधिकार्‍यांचीच असते का? दिल्लीतील इमारत वेळेत पूर्ण होण्यास दिरंगाई होणे हा जनतेच्या दृष्टीने अक्षम्य अपराध आहे. पण ही उणीव शासकांच्या लक्षात येण्यासही इतका विलंब का झाला असावा? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अकार्यक्षम अधिकार्‍यांची आपल्याला लाज वाटते असे गडकरी म्हणाले यावरून त्यांचा किती संताप झाला असावा याचा अंदाज कोणालाही यावा. याबद्दल कौतुक करण्यासाखे काहीच नाही हे गडकरी यांचे म्हणणे समजण्यासारखे आहे. पण कोणतेही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत याची लाज आणि जनतेचा पैसा वाया घालवत असल्याची खंत शासनालाही वाटायला हवीच ना! त्यांनी व्यक्त केलेली भावना लोकभावना असली तरी त्याबद्दल केवळ अधिकार्‍यांना जबाबदार धरणे कितपत योग्य ठरेल? सनदी अधिकारी ठरलेल्या मुदतीत निवृत्त होतात. त्यांची शासकीय सेवा त्यांच्याबरोबरच समाप्त होते. पण शासनात मात्र तसे घडते का? एक व्यक्ती राजकारणात आली की पुढच्या तीन पिढ्यांची सोय लावून घराणेशाही निर्माण करणे हेच मुख्य काम बनते. सत्तेचे लोणी आपल्या घराबाहेर कोणालाही मटकवायला मिळू नये यावर लक्ष केंद्रित झाल्यावर मजनतेसाठीफ म्हणून सांगितल्या जाणार्‍या कुठल्याही योजना आणि प्रकल्पांचे महत्व कागदावरच दप्तरबंद राहाणारच! जनतेच्या दुर्दैवाने या सरंजामशाहीला कोणताही पक्ष अपवाद नाही. प्रशासनातील अकार्यक्षमतेची आणि राजकारणातील सरंजामशाहीची लाज जनतेला वाटू लागली तर काय बदल होतील याचा अंदाज गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम आणि ज्येष्ठ मंत्र्यांना नक्कीच आहे. त्यामुळे गडकरी यांनी व्यक्त केलेली भावना ‘बोलाचीच कढी’ ठरू नये. परिस्थितीत बदल होऊन तो अनुभवास याचा अशीच जनतेची अपेक्षा राहील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com