Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखकल्पकतेने घडणारा कायापालट !

कल्पकतेने घडणारा कायापालट !

करोना मुळे शाळा बंद आहेत. त्या कधी सुरु होतील हे सध्या तरी अनिश्चित आहे. आत्तापर्यंत शाळा सुरु करण्याचा तारखा काही वेळा जाहीर झाल्या पण ती फक्त जाहिरातच ठरली.

शाळा अजून बंदच आहेत. करोना काळात शाळा सुरु करण्यास पालकांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. शिक्षण क्षेत्रात सर्वच स्तरावर अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती आहे. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.शहरी भागातील बहुतेक पालकांकडे स्मार्ट फोन असू शकतील.

- Advertisement -

मुलांच्या अभ्यासासाठी नवा फोन घेणेही कदाचित शक्य असेल अशा पालकांनी स्मार्ट फोन घेतले असतील. त्यामुळे शहरी भागातील अशा साधनसंपन्न विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूही असेल. तथापि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही गंभीर आहेत. यासंदर्भात विविध संस्थांनी सर्वेक्षणे केली.

राज्यातील 65 ते 70 टक्के पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असणार हे निश्चित. या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी काही सरकारी शाळांमधील उत्साही शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. ते फक्त समस्या शोधून थांबले नाहीत.

विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती कशी आहे? त्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत की नाहीत? हे समजण्यासाठी त्यांना कोणत्याही सर्वेक्षणाची वाट पाहावी लागली नाही. तो पुढाकार त्यांनीच घेतला. त्यामुळे सर्वच लॉकडाऊन झाल्यानंतरच्या काही काळातच अनेक शिक्षकांनी समाजमाध्यमांच्या मदतीने विद्यार्थी आणि पालकांच्या भेटीगाठी घेतल्या.

विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी काही शिक्षकांनी अभिनव कल्पना शोधल्या आहेत. शिक्षक अभिनव कल्पना शोधत आहेत. भगतवाडी हे इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खेडे! या गावात जायला धड रस्ता सुद्धा नाही. स्मार्ट फोन शब्दही कदाचित गावकर्‍यांना देखील माहित नसेल. शिक्षकांनी या गावात टीव्हीवरची शाळा सुरु केली आहे.

केबलच्या माध्यमातून शिक्षणाचे व्हिडिओ टीव्हीवर दाखवले जातात. वाडीतील विद्यार्थी शाळा बंद असतानाही टीव्हीवरच्या शाळेत शिकू लागले आहेत. भगतवाडीमधील शिक्षकांना ही कल्पना धामडकीवाडी गावातील शाळेवरून सुचली.

तेथील शिक्षकांनी बर्‍याच अगोदर हि पद्धत प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली होती. ती यशस्वी कल्पना भगतवाडीच्या शिक्षकांनीही कार्यवाहीत आणली. दरेवाडी हे देखील इगतपुरी तालुक्यातीलच एक गाव. या गावातील पालक धरणग्रस्त आहेत. या गावात ओट्यावरची शाळा भरते. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी लेखन साहित्य पुरवले आहे.

एक दिवसाआड शिक्षक गावात जातात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ओट्यावर बसून शिकवतात. शिक्षकांनी गावातील तरुणांचा व्हास्टअँप ग्रुप बनवला आहे. त्या माध्यमातून देखील शिकवण्याचा प्रयत्न शिक्षक करत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतील काही शिक्षकांनी शिक्षकांचा आणि पालकांचा एक समूह बनवला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क सुरु ठेवला आहे. असेच प्रयोग राज्यातही काही ठिकाणी सुरु असतील.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी, जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा आणि दिग्रस या गावांमधील शिक्षक एकत्र आले आहेत. त्यांनी ‘भविष्यवेधी कार्यशाळा’सुरु केली आहे. शिक्षक दररोज दोन तास एकत्र येतात आणि अध्यापनाचे अद्ययावत तंत्र शिकण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या शिक्षकांनाही समस्या भेडसावत असणारच! लॉकडाउनचा त्यांच्याही दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

पण त्यांची जिद्द या सर्व अडचणींना पुरून उरली आहे. सरकारी हुकूम फक्त कागदावर निघतात आणि कागदावरच संपूनही जातात. पण ज्यांना चांगले काम करायचे आहे ते कोणत्याही आदेशाची वाट पाहात नाहीत आणि कोणतीही समस्या त्यांना काम करण्यापासून थांबवू शकत नाही. त्याच्या बदल्यात त्यांची कोणतीच अपेक्षा नसते.

कर्तव्यपूर्तीचे आंतरिक समाधान मात्र या प्रयत्नवादी शिक्षकांना नक्कीच मिळत असेल. खरे तर समाजाने आणि सरकारने स्वतःहून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करायला हवा. पण ते बिचारे खेड्यातील शिक्षक! त्यांना वशील्याचे तंत्र आणि नाण्यांचा मंत्र अवगत असणे कठीणच! अर्थात असे कृतिशील शिक्षक आपले काम करतच राहातात. कारण शिक्षण सुरु ठेवण्यासाठी खरी गरज कल्पकतेची आहे हे त्यांना पटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या