Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखआदर्श स्त्री-सबलीकरण !

आदर्श स्त्री-सबलीकरण !

आजकाल सर्वच क्षेत्रांत मुली आणि स्त्रियांच्या कर्तबगारीचा डंका वाजत आहे. कौटुंबिक जबाबदारीचे पारंपरिक ओझे पेलण्यातही त्या कुठेच कमी पडत नाहीत. किंबहुना पुरुषांच्या तुलनेत त्या कितीतरी सरसच ठरत आहेत.

प्रत्येक घरातील स्वयंपाकघर हे स्त्रियांचे पारंपरिक कार्यक्षेत्र! तिथे दिवसभरात त्यांना कराव्या लागणार्‍या कामांचा आढावा घेतला तर कुठल्याही व्यवस्थापनतज्ञापेक्षा गृहिणी तसूभरही कमी नसतात हे मान्यच करावे लागेल.

- Advertisement -

समानतेच्या नव्या कल्पनेप्रमाणे आजवर महिलांना वर्ज्य मानल्या गेलेल्या कामाची जबाबदारीसुद्धा महिला आता स्वत:हून अंगावर घेत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ आणि खानदेशातील दोन ताजी उदाहरणे याचीच साक्ष देतात.

जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना नागपूरचे भूमिपुत्र आणि सीआरपीएफचे अधिकारी नरेश उमराव बडोले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृणाल व प्रज्ञा या दोन्ही मुलींनीच पित्याला खांदा आणि अग्निदागही दिला. शहीद पित्याच्या शौर्याचा त्याच्या खंबीर मुलींनी केलेला हा अनोखा सन्मान पाहून उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून आला असेल.

कठीण प्रसंगातसुद्धा मुलींनी दाखवलेल्या हिंमतीने त्यांच्या मातेला आणि सर्व कुटुंबियांना त्यांचा नक्कीच अभिमान वाटत असेल. दुसरी घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याची! सध्या सर्वत्र ‘करोना’कहर सुरू आहे. त्याचा प्रसाद प्रा. गणेश पाटील यांच्या आई-वडिलांनाही ‘करोना’बाधेच्या रुपाने मिळाला.

दोघांवर नंदुरबारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिक उपचारांसाठी आईला सुरतला नेण्यात आले. सून स्वाती यांनी रुग्णालयात सासूची मनोभावे सेवा केली. मात्र सासूबाईंची तब्येत खालावली. त्यांना परत गावी आणले. शहाद्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूने खचलेल्या पतीला धीर देताना स्वातीने सासूबाईंच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी सध्याच्या सरकारी नियमांनुसार पार पाडले. रुग्णालयातून स्मशानभूमीत पार्थिव नेताना खांदाही दिला. एका सूनेने सासूचा अखेरचा प्रवास लेकीच्या मायेने सुकर केला. हल्ली ‘करोना’चे नाव काढले की कुटुंबीय हादरतात.

‘करोना’ने कोणाचा मृत्यू झाला असल्यास त्याची मुले वा आप्त त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासही टाळाटाळ करतात. त्यांनी हिम्मत केलीच तर सध्याचे ‘करोना’मृत्यूविषयीचे सरकारी नियम तसे करू देत नाहीत. अशा अवघड स्थितीत स्वातीने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच आहे. सरकारी पातळीवर स्त्री-सबलीकरणाचे कितीही ढोल बडवले जात असले तरी खरे स्त्री-सबलीकरण गावपातळीवर स्रिया स्वयंप्रेरणेने करीत आहेत.

स्त्री-सुधारणेच्या भारंभार गप्पा पुढारी मंडळी मारतात. स्त्री-सबलीकरणाला शाब्दिक पाठिंबा दिल्याची शेखी दीर्घकाळ मिरवतात. काश्मिरात हुतात्मा झालेल्या पित्याच्या मुलींनी कर्तव्याला प्राधान्य दिले.

शहाद्यात रुग्ण सासूची अखेरपर्यंत सेवा करणार्‍या सुनेच्या मनात सासूवर अंत्यसंस्कार करणे हा आपलाच हक्क असल्याची भावना निर्माण झाली असेल. सावित्रीबाई व महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी कितीतरी महान विभूतींनी स्त्री-उद्धारासाठी परिश्रम घेतले.

त्यांचे ते परिश्रम सार्थकी लागल्याचे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट होते. स्त्री-सबलीकरणाला आता खर्‍या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. ही दोन्ही उदाहरणे आजच्या काळात आदर्शच मानावी लागतील. हेच खरे स्त्री सबलीकरण होय.

आपल्या कृतीने स्त्रीवर्गासमोर आदर्श उभा करणार्‍या या मराठी कन्यकांचा महाराष्ट्राला अभिमानच वाटेल. नागपूरमधील शहीद जवानाच्या मुली मृणाल आणि प्रज्ञा तसेच शहाद्याची सून स्वाती यांचे ‘देशदूत’कडून अभिनंदन !

- Advertisment -

ताज्या बातम्या