Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखरुग्णालयातील कचर्‍याचा वापर कसा होतो ?

रुग्णालयातील कचर्‍याचा वापर कसा होतो ?

करोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच त्यामुळे निर्माण होणार्‍या रुग्णालयातील कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत आहे. यात पीपीई किट्स, मुसके, हातमोजे, वापरलेल्या औषधांच्या, इंजेक्शनच्या कुप्या आदींचा समावेश होतो.

करोनाचा सामूहिक संसर्ग सुरु झाल्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणात वैद्यकीय उपचारांची केंद्रे वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याबरोबरच राज्यात वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा कचर्‍याचे प्रमाण करोनापूर्व काळातील कचर्‍याच्या तुलनेत जवळपास दुप्पट असावे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनतेवर काही निर्बंध कायम आहेत. तोंडाला बांधायचे मुसके, सॅनिटायझर आणि हातमोजे यांचा वापर वाढला आहे. या वस्तूंचाही कचरा वाढत आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या कडेला आधी प्लास्टिकच्या पिशव्या आढळत. आता त्याबरोबरीने मुसके, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या आढळत आहेत. करोनामुळे निर्माण झालेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करताच कचरा डेपोत टाकला जातो यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयासमोर जनहित याचिका दाखल झाली होती.

तेव्हा ’करोनाचा संसर्ग आणि रुग्णांची संख्या वाढणार नाही यासाठी उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यादृष्टीने करोना कचर्‍याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकडे सरकारने बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे’ असा निर्वाळा उच्च न्यायालयाने त्या प्रकरणात दिला होता. हा प्रश्न गंभीर आहे.

करोनामुळे निर्माण होणार्‍या कचर्‍याचे नक्की काय होते? त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? या कचर्‍याचा पुनर्वापर शक्य आहे का? सगळाच कचरा फेकून दिला जातो का? की त्यातील काही कचर्‍याचा पुनर्वापर होत असेल? करोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही हातपाय पसरत आहे. जनतेत दहशत वाढत आहे. सामूहिक संसर्गाच्या स्थितीत आहोत का किंवा सामूहिक प्रतिकारक्षमता (हर्ड इम्युनिटी) विकसित होत आहे का हे ठरवण्यासाठी शासनाला सर्वेक्षण करावे लागते. असे सर्वेक्षण केल्याशिवाय हे कसे समजणार? तथापि आपल्याकडे लागण झालेले रुग्ण इतक्या वेगाने वाढत आहेत की आपण अजूनही उपचारांच्याच पातळीवर झगडत आहोत. सर्वेक्षणाला सध्या उसंत कशी मिळणार? असे मत काही वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले.

कचर्‍याच्या समस्येच्या बाबत मात्र तातडीने विचार करण्याची गरज आहे. या मुद्याला धरून जनतेत चर्चा सुरू आहे. कोल्हापूर परिसरातील एक घटना सध्या चर्चेत आहे. काही ट्रकमध्ये वापरलेले पीपीई किट्स आणि अन्य कचरा भरला जात होता. काही जागरूक नागरिकांनी संबंधित माणसांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. वापरलेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करता पुन्हा वापरला जाणार असावा अशी शंका मात्र निर्माण झाली.

अशी भीती नागरिकांना वाटत असेल तर ती अनाठायी कशी मानावी? असे इतरत्र घडत नसेलच कशावरून? जनतेत करोनाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावरून अविश्वास निर्माण होणे परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने यात त्वरित लक्ष घालावे.पुनर्वापरासारखे गैरप्रकार कुठे घडत आहे का याचा शोध घ्यावा.

कचर्‍याचे नेमके काय होते याचा शोध घेतला गेला तर गैरप्रकार टाळून पुनर्वापर शक्य आहे का याचाही विचार संबंधितांनी करावा. यासंदर्भात आरोग्य खात्याने सगळ्या शासकीय आरोग्य संस्थांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या