Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेख‘करोना’ काळातसुद्धा ‘कांचन-मोह’ कसा टळणार ?

‘करोना’ काळातसुद्धा ‘कांचन-मोह’ कसा टळणार ?

कोरोना’ग्रस्तांच्या संख्येचा आलेख आता झरझर वरवर झेपावत आहे. सर्वाधिक मौल्यवान मानले जाणारे सोनेसुद्धा ‘करोना’ काळात चांगलेच तेजाळले आहे. चालू वर्षांरंभी…

39 हजार रुपये तोळा असणार्‍या सोन्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. साहजिकच सोने खरेदी करू पाहणार्‍यांचे डोळेसुद्धा चकाकत आहेत. समाजातील एक सुवर्णप्रेमी गट याही काळाला पर्वणी समजत आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी साधू पाहत आहे. ‘कोरोना संकटाकडे संधी म्हणून पाहा’ असे आवाहन पंतप्रधानांनीच मध्यंतरी देशवासियांना केले होते. लोकांनी आपापल्या सोयीने त्याचा बोध घेतला.

- Advertisement -

राजकारणात त्याची प्रचिती आलीच, पण सामाजिक पातळीवरसुद्धा त्याचा प्रभाव पडल्यास आश्चर्य कसे वाटणार? ‘कोरोना’संसर्ग टाळण्यासाठी दैनंदिन व्यवहारांवर बंधने आली. तरीसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची हौस भागवण्यासाठी मर्यादित पै-पाहुण्यांच्या साक्षीने लग्नकार्ये उरकण्यास सरकारने मुभा दिली. काहींनी जास्त गर्दी जमवली. ‘शुभमंगल सावधान’ हा इशारा फक्त वधूवरांसाठी नसून आपल्यालासुद्धा आहे याचाच विसर आशीर्वाद देण्यास आलेल्या वर्‍हाडींना पडला असावा. म्हणूनच ‘कोरोना’रुपी ‘आहेर’ काहींना मिळाल्याच्या घटना घडत आहेत, पण ‘गर्दीचे दर्दी’ असणारे अशा किरकोळ संकटांना कशाला दाद देतील?

‘मंगल कार्यालय, वरात, जेवणावळी, मानपान आदी खर्चांना एवीतेवी कोरोना-कात्री लागली आहे. कमी खर्चात कार्य होत असल्याने वधूपक्ष सुखावणारच! एकाचे अन्न दुसर्‍याला सहज पचत नाही आणि दुसर्‍याच्या ताटावरचे लक्षही हटत नाही. मग वधूपक्षाचा कमी झालेला खर्च पाहून वरपक्षाला सुग्रास भोजन गोड कसे लागेल? लग्नातील खर्च टळल्याने वाचलेला पैसा सोन्याच्या रुपात ‘वरदक्षिणा’ म्हणून पदरात पडावा, अशी गळ वरपक्षांकडून वधूपक्षांना घातली जात असावी. नाईलाज म्हणून वाढत्या भावाने का असेना, पण सोने खरेदी करून घरावर परस्पर सोन्याची एखादी दोन कौले वधूपक्षाकडून मिळवण्याची हौस वराकडची मंडळी भागवून घेत असावेत. अशी ‘सुवर्णसंधी’ वरचेवर येत नाही. मग ‘कोरोना’काळाचे निमित्त करून त्यांनी तरी ती का टाळावी? हुंडाबंदी कायदा झाला त्याला बरीच वर्षे उलटली. निदान दोन पिढ्या नक्कीच उलटल्या. तरी लग्नकार्यांचा थाटमाट दिवसेंदिवस डोळे जास्तच दिपवत आहे.

‘कोरोना’ने त्याला थोडासा आळा बसला. तथापि सोने-नाणे, गाडी-बंगला आदी रुपांत घरे भरून घेण्याची हौस कमी कशी होणार? सोन्याचे भाव अर्ध्या लाखावर पोहोचल्यावर भल्या-भल्यांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. लग्न ठरले तर किती सोन्याची देवाणघेवाण व्हावी ही लग्नाच्या पूर्वापार पद्धत मराठवाड्यात आजही इमाने-इतबारे पार पाडली जाते असे अद्यापही आढळते. माध्यमांत कधीतरी त्याबद्दलची एखादी बातमीही झळकते. मात्र इतरत्र ती पद्धत नसावी असे मानण्याचे कारण नाही.

‘हुंडा घेणे अनुचित’ असे भाषणात सांगणारी मंडळीसुद्धा आपापल्या कुटुंबात संधी आली की वधूपक्षाकडून जमेल तेवढे जास्त मिळवण्याचा मोह कसा सोडणार? कायद्याने अनेक अनिष्ट रुढींना बंदी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो सर्रास मोडीत काढण्याचा मोह भलेभलेही टाळू शकत नाहीत. साधे उदाहरण गुटख्याचे! बंदीचा कायदा करून वर्षे उलटली. अद्याप रोज कुठे ना कुठे धाडी घातल्या जातात. लाखोंचा गुटखा जप्त होतो. पुढे काय होते हे सांगण्याची पद्धत सरकारी कामकाजात अजून तरी सुरू झालेली नाही. अपवाद फक्त एकच! द्विभार्या प्रतिबंधाचा कायदा! तो मात्र बर्‍यापैकी यशस्वी ठरला. कारण मुलीही शिक्षित झाल्या. त्यांना कायद्याने मिळालेले अधिकार समजू लागले. मात्र ‘कांचन-मोह’ सीतेलासुद्धा टाळता आला नाही. हे रामायण पुढेही चालूच राहणार !

- Advertisment -

ताज्या बातम्या