‘आत्मनिर्भरते’चा साक्षात्कारी निर्धार !

‘आत्मनिर्भरते’चा साक्षात्कारी निर्धार !

विधानसभा-लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्याची स्वप्ने सारेच पक्ष आपापले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दाखवतात. यश मिळवण्याच्या निर्धाराने प्रमुख नेते सर्वांना कामालाही लावतात. निवडणूक जिंकण्यासाठी झपाटून कामाला लागतात. मतदान पार पडते. यथावकाश निकाल हाती येतात. कोणातरी एकाच पक्षाला जनमताचा कौल मिळतो. अपेक्षाभंगामुळे अन्य पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाऊमेद होतात. त्यांचे मनोबल खचते. अशावेळी त्यांना दिलासा देण्याची गरज असते. ते काम पक्षनेतृत्वाला करावेच लागते.

पक्षातील मरगळ झटकून नवे स्वप्न कार्यकर्त्यांना दाखवावे लागते. भारतासारख्या खंडप्राय देशात वर्षभर कसल्या ना कसल्या निवडणुका चालू असतात. एका राज्याची निवडणूक आटोपली की दुसर्‍या राज्यात निवडणूक जाहीर होते. राज्यांच्या निवडणुका आटोपत नाहीत तोच लोकसभा निवडणूक येते. त्यादरम्यान ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, मनपा, जिल्हा परिषदा आदी छोट्या-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची संधी असतेच. निवडणुकांचे हे चक्र वर्षानुवर्षे चालते. कार्यकर्त्यांना नवनव्या आशा दाखवून त्यांचे मनोबल उंचावत ठेवावे लागते. तरच पक्षाला भविष्यात यश मिळू शकते. कोणत्याही पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व ती गरज जाणते.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील ती गरज ओळखली असावी. मराठी मुलखातील ‘कमळ’तळ्याच्या नवनिर्वाचित राज्यस्तरीय सेनापतींची पहिली बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. नड्डा यांनी ‘दूरचित्रसंवादा’तून बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. निवडणूकपूर्व युतीला बहुमत मिळूनसुद्धा ऐनवेळी काहीतरी बिनसले. भाजपला सत्तेचा कलश परत करून सत्तेला मुकावे लागले. महाविकास आघाडी अवतरली. पळवलेला सत्ताकलश हिरावला गेला. तेव्हापासून गेले सहा-सात महिने महाराष्ट्रातील ‘कमळ’तळ्यात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रमुख नेते सतत तळमळताहेत. त्यांची रात्रीची झोपही हराम झाली असावी. नड्डा यांनी नेत्यांची ही ‘पोटदुखी’ अचूक हेरली. ‘महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावरच लढवू आणि जिंकूसुद्धा! कोणाशीही युती करणार नाही’ असा धनुर्धर निर्धार त्यांनी बैठकीत व्यक्त केला. नड्डा यांचा हा निर्धार आणि आत्मविश्वास अभिनंदनीय आहे.

स्वपक्षातील ताज्या शिलेदारांना तो नक्कीच प्रेरणा देईल. पहिल्याच बैठकीत निराशेचा सूर आळवला तर कसे होणार? ही जबाबदारी पक्षाध्यक्ष नड्डांनी उत्तमरित्या पार पाडली. राज्यातील प्रमुख पक्षांपैकी तीन पक्षांची आघाडी सध्या सत्तेत आहे. स्वपक्ष विरोधी बाकावर आहे हे वास्तव नड्डांना लक्षात ठेवणे भागच होते. म्हणून आशा जागवणारे स्फूर्तीदायक भाषण त्यांनी केले. पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणात प्रचंड आत्मविश्वास जाणवतो. कोणतीही गोष्ट वा मुद्दा ते ठणकावूनच सांगतात. तोच कित्ता नड्डा यांनी तंतोतंत गिरवला.

महाविकास आघाडी सरकारची सतत उणी-दुणी काढून सरकारवर आगपाखड करणार्‍या विरोधी पक्षनेत्यांना नड्डा यांचे भाषण नक्कीच विचार करायला लावणारे आहे. नेते बोलतात. आश्वासनांची खैरात करतात, पण लोक निमूटपणे ऐकून घेतात. त्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय तरी कोणता? मतपेट्या उघडल्यावर मात्र समोर काय येईल ते आधी सांगणे कठीण असते. पत्रकार सतत अडचणीचे प्रश्न सत्ताधार्‍यांना विचारतात. भाजपच्या सुदैवाने सध्या मात्र पत्रकारांनी तेच प्रश्न सत्ताधारी पक्षांऐवजी विरोधकांनाच विचारण्याची नवी पद्धत रुढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा ‘स्वबळा’चा नारा आत्मनिर्धारयुक्त आहे. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भरते’चा यथोचित सन्मान करणारा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com