Tuesday, April 23, 2024
Homeअग्रलेखसुवर्ण खुणा बागळत पुढे जाताना

सुवर्ण खुणा बागळत पुढे जाताना

‘देशदूत’ नाशिक आवृत्तीचे पन्नास वर्षे हा खरा तर एक कालखंड. पाच दशकांचा, अनेक स्थित्यंतरे बघितलेला हा काळ…..

‘देशदूत’कडे माध्यम म्हणून बघताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मुळातच जे चुकीचे आहे ते होऊ नये आणि योग्य ती दिशा प्रश्नांना मिळावी याच विचारातून ‘देशदूत’चा झालेला जन्म हा मुख्यत्वे पत्रकारितेच्या मूलतत्त्वांवर आधारित आहे. याच विचाराने वाटचाल करत, मातीतले दैनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘देशदूत’ने शहरी-ग्रामीण वाचकांशी नाळ जोडली.

- Advertisement -

माहिती, ज्ञान, मनोरंजन, मत, परिवर्तन, संघर्ष, चळवळ, संस्कृती, व्यापार-उद्योग, शिक्षण, प्रामुख्याने कृषी अशा सगळ्या कक्षेतून ‘देशदूत’ वाचकांपर्यंत पोहोचत राहिला. माध्यम चालवणे, ते टिकवून ठेवणे आणि तितक्याच मूल्यांच्या ताकदीने उभे राहणे ही काही सोपी गोष्ट नाही. अगदी ज्यांची नावे आपण पत्रकारितेत गुरुतुल्य म्हणून घेतो त्यांची वर्तमानपत्रेसुद्धा कालांतराने बदलली. तो काळाचाच बदल म्हणावा लगेल.

मात्र या बदलत्या वार्‍याबरोबर मार्गक्रमण करताना टिकून राहणे आव्हानात्मक असते. हे आव्हान ‘देशदूत’ने पेलले. विविध प्रकारांनी माध्यम पत्रकारिता करताना दिसतात. काळ, वेळ, लोकही बदलली आहेत असे म्हणत हे बदल घडणे साहजिकच असते. माझी भूमिका बदलाच्या विरोधात नाही. बदल आवश्यकच असतो, किंबहुना बदल हेच एक कायमस्वरुपी सत्य आहे, हे मी जाणून आहे. त्यामुळे बदलाला नजरअंदाज करून चालणार नाही.

मात्र काळाचे बदल स्वीकारताना काय धरायचे आणि काय सोडायचे, ते कसे आणि कुठे अंगीकारायचे याची परिपक्वता व सद्सद्विवेकपणा ही माध्यमांची गरज आहे. ‘देशदूत’ने ही परिपक्वता अंगीकारली व सद्सद्विवेक जोपासला आहे. अनेक वादळे या पन्नास वर्षांत झेलत ‘देशदूत’ खंबीरपणे उभे राहिला आहे आणि भविष्याकडे वाटचालही करत आहे. काळाबरोबर बदलणे हे जरी समायोजित असले तरीही मूलतत्त्वे टिकून ठेवणे मात्र आव्हानात्मक असते. ते टिकवणारी विचारधारा जोपासावी लागते. त्या माध्यमाचा तो गाभा असावा लागतो.

आज आपण सर्वत्र बघत आहोत की माध्यमांची खिल्ली उडवली जाते, चेष्टा केली जाते. दिवसागणिक माध्यमे आपली विश्वासार्हता गमावत आहेत. अर्थात हा दोष पूर्णपणे बोलणार्‍यांचा नाही. काही चुका आम्हा माध्यमांच्यादेखील आहेतच. लोकांनी माध्यमांकडे बोट दाखवावे असे काही माध्यमांकडून घडत असेल तर मात्र ते बदलण्याची आवश्यकता आली आहे. ही बोटे दाखवली जाऊ नये याबाबत ‘देशदूत’ खूप काळजी घेत आहे आणि म्हणूनच वाचकांची बांधिलकी जपू शकले आहे.

सत्यता, पारदर्शकता, वस्तुनिष्ठता, विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा या मूलभूत तत्त्वांवर बातमी वाचकांपर्यंत पोहोचवली जाते आणि ‘देशदूत’ने बातमीचे पावित्र्य मूल्यातून जपले आहे. काळाबरोबर बदलताना ‘देशदूत’ने डिजिटल माध्यमाकडे पण पाऊल टाकले आहे. हे डिजिटल माध्यम वाचकांशी संवाद साधण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि ‘देशदूत’चे डिजिटल माध्यम विश्वासार्हताही जपत आहे. माध्यमांनी आणखीन एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे आणि ती म्हणजे वापरली जाणारी भाषा. भाषेची शुद्धता आणि भाषेच्या अर्थाचा गाभा हा टिकवला पाहिजे. काळानुरूप प्रचलित असलेले काही शब्द आत्मसात करणेदेखील गरजेचे आहे. हे करताना मात्र समाजातील भाषा टिकवणे ही जबाबदारीदेखील माध्यमांची आहे. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही आणि संस्कृती टिकली नाही तर जीवनमान हे निश्चितच खालच्या स्तराला जाईल.

माध्यमांची आणखीन एक जबाबदारी असते ती म्हणजे आपला प्रांत, गाव, शहर, प्रदेश घडवणे. त्यातील माणसे, संस्था घडवणे. आज आपण बघतो हे कार्य व्यावहारिक झाले असले तरीसुद्धा जी चांगली माणसे या जगण्याला दिशा देऊ शकतील त्यांच्या मागे उभे राहणे हे दैनिकाचे काम आहे आणि ते ‘देशदूत’ सातत्याने करत आले आहे.

‘देशदूत’ने अनेक व्यक्ती, संस्था अशा पद्धतीने घडवल्या आहेत. यांच्यामार्फत त्याचा आयाम, आकार देता आला आहे. माध्यमांनी नेहमीच मुक्तपणे आपला संचार ठेवावा आणि बांधिलकी ही वाचकांशी ठेवावी. हे सूत्र ‘देशदूत’ने संभाळले आणि म्हणूनच कुठल्याही संकुचित प्रवृत्तीस ‘देशदूत’ कधीही बळी पडला नाही. संकुचितपणा सोडण्याची ताकद माध्यमांमध्ये असते. ती वापरण्याचे धैर्य मात्र ‘देशदूत’ने दाखवले, ते करण्यासाठी निष्पक्षपातीपणे आपली मते मंडली. पुढच्या दशकातकडे वाटचाल करताना ‘देशदूत’ वर्तमानपत्र म्हणून खंबीरपणे उभा आहेत आणि डिजिटल माध्यमामध्ये पण गती घेतली आहे. अर्थातच तुमच्या स्क्रीनमध्ये रोजच्या घडणार्‍या बातम्या, घडामोडी, यावरची मत-मतांतरे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘देशदूत’ सक्षम आहे. आजच बघितले तर ‘देशदूत’ची वेबसाईट ही अनेक देशांत पोहोचली आहे.

उत्तर महाराष्ट्रातला माणूस हा मातीशी या वेबसाईटच्या रूपाने जोडला गेला आहे. समाजातील विविध घटकांना, कलांना, कलाकारांना तसेच लेखकांना, कवींना, विचारवंतांना, सामाजिक काम करणार्‍या कार्यकर्त्यांना तसेच राजकीय कार्यकर्त्यांनादेखील ‘देशदूत’चा मंच हा योग्य आणि चांगल्या कामासाठी उपलब्ध आहे. या विचारांच्या देवाणघेवाणासाठी वर्तमानपत्राबरोबरच शब्दगंध, कृषिदूत, अर्थदूत अशी अनेक सदरे तसेच संवाद कट्ट्यासारखे डिजिटल व्यासपीठ ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिले आहे. पन्नास वर्षांच्या उंबरठ्यावर उभे राहताना पुढील पंचवीस वर्षांची आमची दृष्टी स्वच्छ आहे.

यापुढील पंचवीस वर्षांत आपले गाव, जिल्हा, प्रदेश, राज्य हे कसे असेल, त्याची वाटचाल कशी व्हावी याचा आढावा घेण्यासाठी म्हणूनच नाशिक आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ‘नाशिक आवृत्तीत पुढील 25 वर्षे’मध्ये आम्ही भविष्याचा वेध घेणारे लेख घेऊन आलो आहोत. अनेक विचारवंतांनी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केलेली त्यांची मते यात समाविष्ट आहेत. या सगळ्याचा उपयोग निश्चितच नाशिक वाढायला, उत्तर महाराष्ट्र बहरायला आणि राज्य समृद्ध व्हायला होईल यात शंका नाही. ‘देशदूत’च्या पन्नासाव्या वर्धापनदिनाचे जितके समाधान आहे तितकीच पुढच्या काळाची आणि त्याच्या जबाबदारीची जाणीवदेखील आहे.

पाय जमिनीत रोवून आणि दृष्टी आभाळापर्यंत पोहोचवून काम करण्याची ताकद ‘देशदूत’ बाळगून आहे. 4 सप्टेंबर 1970 साली ज्या उमेदीने आणि उत्साहाने ‘देशदूत’चा पहिला अंक बाहेर आला त्याच उमेदीने आणि उत्साहाने येणार्‍या पुढच्या काळाचा रोजचा अंक वर्तमानपत्र आणि डिजिटलच्या स्वरुपात तुमच्यापर्यंत येईल याची आम्ही ग्वाही देतो. तुमचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ‘देशदूत’ त्याच निष्ठेने व विश्वासाने काम करत राहील. या पूर्ण प्रवासामध्ये ज्या सगळ्यांची साथ ‘देशदूत’ला मिळाली किंवा ज्यांनी ‘देशदूत’ला आणखीन ताकदवर, आणखीन सक्षम करण्यास मदत केली त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. हा सहप्रवास असाच चालू राहील हीच अपेक्षा आम्ही बाळगतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या