सव्यसाची देशभक्त नेता हरपला !

सव्यसाची देशभक्त नेता हरपला !

दीर्घ काळ भारतीय राजकारणावर प्रखर बुद्धिमत्तेचा व विकासाभिमुख राजकारणाचा ठसा उमटवणार्‍या भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी...

जगाचा निरोप घेतला. प्रणवदा हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. त्यांची ओळख फक्त एक ज्येष्ठ राजकीय नेता इतकीच मर्यादित नाही. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

देशावर काँग्रेस पक्षाची प्रदीर्घ काळ सत्ता होती. संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्रिपद त्यांनी भूषवले होते. अखेरची त्यांची कारकीर्द राष्ट्रपतीपदाची होती. तेथेही त्यांच्या निष्पक्षतेचा ठसा त्यांनी उमटवला. वर्ल्ड बँकेच्या संचालक मंडळाचेही ते सदस्य होते. मभारतरत्नफ या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. देशाचे सर्वोच्च पद आणि सर्वोच्च सन्मान हा त्यांच्या आयुष्यातील दुर्मिळ योगायोग होता. प्रदीर्घ काळ राजकारण करताना अनेक प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागला.

बंगाल हे दीर्घकाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अधिपत्याखाली होते. तथापि प्रणवदांना संसद गाजवण्याची संधी त्यांच्या बंगाली मतदारसंघातून सतत मिळत राहिली. कुशाग्र राजकारणी म्हणून काँग्रेस पक्षालाही त्यांच्या कर्तृत्वाचा लाभ सतत मिळत राहिला. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या प्रत्येक खात्याच्या कारभारात विकासाच्या योजना त्यांनी समर्थपणे राबवल्या. अनेक पदे भूषवतांना मिळालेले अधिकार त्यांनी सेवेच्या भावनेने वापरले. लोकप्रतिनिधी असो की माध्यम प्रतिनिधी सर्वाना अधिकारांची आणि मर्यादांची जाणीव स्पष्टपणे करून देण्यात प्रणवदा कधीच कचरले नाहीत.

राष्ट्रपतीपदावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलावले. माध्यमांनी त्यावेळी त्याविषयाचा बराच गाजावाजा केला. मात्र प्रणवदांनी त्या कार्यक्रमाला हजर राहून राष्ट्रपतीपदाची निष्पक्षता जाणवून दिली. मात्र कार्यक्रमातील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही चार हिताच्या गोष्टी त्यांच्या मृदू भाषेत सुनावण्यासही प्रणवदा कचरले नाहीत.

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या शब्दांवर मुद्देसूद विवेचन करून संघाच्या कार्यपद्धतीतील उणिवांवर नेमकेपणाने बोट ठेवले होते. त्यांचे ते भाषण तेथे उपस्थितांच्या कायम लक्षात राहील. किंबहुना माध्यमांच्या वाहिन्यांवर भाषण ऐकणारे सुद्धा त्या भाषणाने प्रभावित झाले होते. देशाची लोकसंख्या वाढली आहे. म्हणून मतदारसंघांची फेररचना व्हावी व लोकप्रतिनिधींची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवली जावी अशी सूचनाही त्यांनी केली होती.

प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेली ड्रमॅटिक डिकेड, द टर्ब्युलनट इयर्स आणि थॉट्स अँड रिफ्लेक्शन्स आणि ‘द कोलिशन इयर्स : 1996-2012’ अशी पुस्तके अभ्यासू व जिज्ञासू वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. राजकीय सभ्यता, निखळ राजकारण करणारी आणि पक्षीय निष्ठा राखणारी फारच मोजकी व्यक्तिमत्वे सध्या देशात आढळतात. प्रणव मुखर्जी हे त्यापैकी एक प्रमुख नाव! त्यांच्या जाण्याने देशाने एक धोरणी, समंजस व्यक्ती आणि एक सव्यसाची राजकारणी नेता, गमावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com