Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखएक दिलासादायक विश्वासार्ह संशोधन !

एक दिलासादायक विश्वासार्ह संशोधन !

स्तनांचा कर्करोग यापुढे कदाचित तीन महिन्यातच बरा होण्याची आशा व शक्यता टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संशोधनामुळे निर्माण झाली आहे.

नवी उपचार पद्धती तीन महिन्यांचीच असेल. रुग्णालयाचे डॉक्टर 15 वर्षांपासून या उपचार पद्धतीवर संशोधन करत होते. संशोधनाअंती नवी उपचारपद्धती विकसित झाली. 11 हजार रुग्णांवर नव्या उपचार पद्धतीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्या यशस्वी झाल्याचे रुग्णालयाने मध्यमांना सांगितले.

- Advertisement -

या तज्ञांच्या मते भारतीय महिलांमध्ये ‘एचइआर 2’ या प्रकारातील स्तनाचा कर्करोग सर्रास आढळतो. कर्करोग या नावाने रुग्ण आणि त्याचे नातेवाईक धास्तावतात. या संधोधनामुळे त्या सर्वांना मोठाच दिलासा मिळेल. तीनच महिने उपचार घ्यावे लागतील. उपचारांचा काळ कमी झाला तर स्वाभाविकच उपचारांचा खर्चही कमी होईल. उपचारांचे दुष्परिणाम आणि यातना कमी होतील. कर्करोग दुर्धर व्याधी आहे. त्यावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. ते अत्यंत महागडे आहेत. उपचारदरम्यान रुग्णाला प्रचंड यातना होतात. उपचारांचे काही दुष्परिणाम आयुष्यभर सोबत करतात. उपचारांचा खर्च करता करता काही रुग्णाच्या कुटुंबाचे अर्थकारण बिघडून जाते. आर्थिक तरतुदीअभावी काही जण कित्येकदा उपचार घेण्याचे देखील टाळताना आढळतात.

2016 सालच्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीच्या अहवालानुसार 1990 ते 2016 या कालावधीत भारतात स्तन-कर्करोग-रुग्णांमध्ये 39 टक्के वाढ झाली. 2016 मध्ये 5 लाखांपेक्षा जास्त महिला या रोगामुळे आजारी होत्या. हे प्रमाण वाढतच आहे. अशा सर्व रुग्णांसाठी टाटा रुग्णालयाचे संशोधन दिलासादायक ठरेल. भारतात केवळ स्तनांच्याच नव्हे तर सर्वच प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय आरोग्य 2019 या वर्षाच्या अहवालानुसार 2017-18 या एका वर्षात देशातील कर्करोगाचे रुग्ण 300 पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढले.

सर्व प्रकारच्या कर्करोगावर संशोधन व्हावे आणि कमी खर्चाची आणि कमी कालावधीची उपचार पद्धती विकसित व्हावी अशीच या रुग्णांची इच्छा असेल. देशात अनेक संस्था विविध विषयांवर संशोधन करत असतात. इस्रो, टाटा मेमोरियल सारख्या संस्थांचे संशोधन समाजाच्या अनुभवास येत असते. त्या संशोधनाचे फायदे जनतेला होत असतात. तथापि बाकीच्या अनेक संस्था नेमके कशाचे संशोधन करतात? त्यांचे संशोधनाचे विषय काय असतात? ते समाजपयोगी असतात का? की काहीतरी काम केल्यासारखे दाखवायचे आणि सरकारकडून अनुदान उकळायचे एवढाच त्यांचा उद्देश असतो का? त्यांचे संशोधन कधी संपते? त्याचे निष्कर्ष काय असतात? ते जनतेसाठी जाहीर होतात का? अशा बोगस संस्था कुंकवाच्या रंगाच्या छटा किती? कुंकू उभरते का? अशासारख्या भंपक विषयांवर संशोधन केल्याचे दाखवत सरकारच्या आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नसतील कशावरुन?

असे अनेक प्रश्न जनतेला पडतात. तथापि टाटा या नावाशीच विश्वासार्हता जोडलेली आहे. टाटांच्या संस्था भरघोस सामाजिक कामासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या संस्थेने केलेले संशोधन यापुढेही यशस्वी होईल आणि त्यातून कर्करोगग्रस्तांचे जीवनमान उंचावेल अशीच जनतेची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या