Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखमार खायला कोण तयार होणार ?

मार खायला कोण तयार होणार ?

कोरोनाच्या भीतीमुळे सरकारी रुग्णालयात काम करण्यास डॉक्टर्स तयार होत नाहीत. वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी जाहिराती देण्यात येतात. तथापि

तथापि जाहिरातीला प्रतिसाद मिळत नाही. सद्यस्थितीत सरकारी रुग्णालयात जे डॉक्टर्स व कर्मचारी काम करतात ते स्थानिक तसेच राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा दावा सरकारने केला आहे.

- Advertisement -

रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. त्याच्या सुनावणीदरम्यान सरकारने उपरोक्त दावा केला आहे. फक्त रत्नागिरीमधील सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे का? राज्यात अन्यत्रही अशीच परिस्थिती असेल. सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व तज्ञ डॉक्टरांची 1770 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. विशेषज्ञांच्या 627 पदांपैकी फक्त 138 पदे भरली गेली आहेत.

सरकारी रुग्णालयावर ही वेळ कशी आली? कोणी आणली? सरकारी नोकरीचे तरुणाईला विलक्षण आकर्षण आहे. सरकारी नोकरी लागावी यासाठी लोक वाट्टेल ते मार्ग अंमलात आणताना आढळतात. केंद्र सरकारच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीच्या रिक्त पदांसाठी दरवर्षी सुमारे 3 कोटी उमेदवार विविध परीक्षा देतात असे सांगितले जाते. सरकारी नोकरीसाठी इच्छुकांची राज्याची आकडेवारी किती मोठी असेल याही यावरून कल्पना यावी.

डॉक्टरी हा नोबेल प्रोफेशन मानला जातो. तरीही सरकारी रुग्णालयातील पदे का रिक्त आहेत? डॉक्टर्स आणि इतर जागांवर सरकारला उमदेवार का मिळत नसावेत? सरकारी डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सुरक्षितपणे काम करू शकतात असा दावा तरी सरकार सुरू शकेल का? डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवर हल्ले होतात. त्यांना मारहाण होते. त्यांना कोणाचे पाठबळ असते? आपण दाखल केलेल्या रुग्णाला काय झाले आहे? त्याची अवस्था काय आहे? रोग शरीरात किती पसरला आहे? त्याला आधीपासून काही त्रास होता का? हे काहीही माहिती नसते. तथापि सरकारी रूग्णालयात होणार्‍या रुग्णांच्या मृत्यूला डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा आणि त्यांनी रुग्णांकडे केलेले दुर्लक्षच कारणीभूत असते असा जनतेचा समज कोणी करून दिला? रोज शेकडो-हजारो लोकांचा अनेक कारणांनी मृत्यू होत असतो. पण रुग्ण डॉक्टरकडे गेला की त्याने खडखडीत बरे होऊनच घरी आले पाहिजे ही खात्री बाळगणे हा स्वतःवरचा आणि परमेश्वरावरचा विश्वास म्हणावा की अविश्वास?

घरातील वृद्ध व्यक्तींना भलेही वुध्दाश्रमाची वाट दाखवतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील. पण सरकारी रुग्णालयात दाखल केलेल्या 90 वर्षाच्या म्हातार्‍याला सरकारी डॉक्टरांनी मात्र जीवदान दिलेच पाहिजे असा अट्टाहास कोणाच्या पाठबळावर केला जातो? तोडफोड आणि डॉक्टरांची कॉलर धरली म्हणजे रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष दिले जाते हा समज कोणामुळे बळावला? तोडफोड करणारे सगळेच रुग्णाचे नातेवाईक असतात? की त्यातही पुढार्‍यांचेही बगलबच्चे आपला रुबाब गाजवून घेतात? डॉक्टर आपल्याला कसे घाबरतात हेच त्यांना दाखवायचे असते का?

टूर्न डॉक्टरकीला प्रवेश मिळवण्यासाठी मान मोडून अभ्यास करतात. ढीगभर परीक्षा देतात. गुणांच्या स्पर्धेत अर्धा टक्का देखील कमी मिळू नये यासाठी मेहनत घेतात. प्रचंड ताण सहन करतात. शिक्षणासाठी त्यांचे पालक पाच-पन्नास लाख खर्च करतात. इतक्या महदप्रयासाने डॉक्टर झालेली व्यक्ती कोण ऐर्‍या गैर्‍याचा मार खायला कोण तयार होईल? हे सारे पाप पुढार्‍यांचे आहे. त्यांनीच पेरलेल्या पापाची विषारी फळे जनतेला भोगावी लागत आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्टर उपलब्ध नसतात. अशी ओरड पुढार्‍यांनी कशाला करावी?

- Advertisment -

ताज्या बातम्या