सुशिक्षितांना सगळेच समजते ?

सुशिक्षितांना सगळेच समजते ?

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘साथरोग व्यवस्थापन’ या विषयाचा समावेश करण्याचा निर्णय मेडिकल कौन्सिलकडून घेतला गेला आहे.

सरकारने यासंदर्भात 9 तज्ञांची समिती नेमली होती. समितीच्या शिफारशीनुसार उपरोक्त निर्णय झाला.या विषयाच्या अभ्यासक्रमात साथीच्या रोगाचा इतिहास, आजाराचे स्वरूप, रुग्णतपासणी, सामाजिक दृष्टिकोन, कायदेशीर बाबी, आजार व्यवस्थापन, प्रशासकीय बाबी तसेच आरोग्याचे अर्थशास्त्र, साथरोग संशोधन, लस विकास आणि शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील उपचार अशा अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला असल्याचे कौन्सिलकडून माध्यमांनाही सांगण्यात आले. करोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यावर 8-9 महिने उलटले आहेत. तरीही या साथीचा सामना कसा करावा हे कोणत्याही देशाला परिणामकारकरीत्या जमलेले नाही.

सगळे देश म चुका करा पण प्रयत्न कराफ ( ट्रायल अँड एरर) या पद्धतीने उपाययोजना करत आहेत. त्याची किंमतही मोजत आहेत. भारताने देश लॉकडाऊन करायचा निर्णय घेतला. त्यामुळे करोना आटोक्यात आला का? तथापि देशाच्या विकासाचा गाडा किमान 90-100 वर्षे मागे गेल्याचे बोलले जाते. सरकार नाकारत असले तरी अन्य सरकारी संस्थांनीच ते अध्यहृतपणे मान्य करत आहेत. ज्या आरोग्यसेवकांच्या खांद्यावर या साथीच्या उपचारांची मदार आहे तेही चाचपडत आहेत. महाराष्ट्र राज्यातील 1900 पेक्षा जास्त डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. 17 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. भविष्यात साथरोगाचे आव्हान पेलण्यासाठी या विषयाचा सर्वागीण अभ्यास करणे हाच व्यावहारिक उपाय आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने त्यानुसार निर्णय घेतला आहे.

तथापि माणसे सुशिक्षित झाली म्हणजे मशहाणीफ होतात, तर्कसंगत विचार करतात असे मानले जात असले तरी ते वास्तव आहे का? करोनाचा जास्त धसका कोणी घेतला? सुशिक्षितांनी की ते ज्यांना अडाणी समजतात त्या अशिक्षितांनी? सरकारने जाहीर केलेले निर्बंध धाब्यावर कोण बसवते? ज्या नागरिकांवर निर्बंध मोडल्याचे गुन्हे दाखल होत आहेत त्यात सुशिक्षितच अधिक कसे ? करोनाला जे जास्त घाबरत आहेत त्यात सुशिक्षितच जास्त आहेत. आणि तरीही निर्बंध मोडण्यातही तेच आघाडीवर आहेत. कोरोना रुग्णांवर बहिष्कार कोण टाकत होते? हे प्रकार इथेच थांबले नाहीत. तर करोना रुग्णांवर उपचार करणार्‍या परिचारिका आणि डॉक्टरांवर बहिष्कार घालण्याचा तद्दन वेडेपणा कोणी केला? हा शिक्षणाचा विरोधाभास म्हणावा का? सुशिक्षित म्हणवला जाणारा समाज ज्या माणसांकडे अशिक्षित म्हणून हेटाळणीच्या नजरेने पाहातो त्या माणसांनी मात्र या साथीला आपल्या गावाबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे. अनेक गावांच्या सीमा दक्ष आहेत. ही साथ आली तशी जाईल. निर्बंध पाळले नाही तर त्याचा संसर्ग होईल.

कोणताही आजार होवो किंवा न होवो, मृत्यू अटळ आहे हे अशिक्षित म्हणवणार्‍या माणसांनी सहज स्वीकारले आहे. त्यांनी रोजीरोटीसाठी काम सुरु केले आहे. त्या तुलनेत सुशिक्षित माणसे मात्र करोनाच्या दहशतीखाली वावरतांना आढळतात. त्यांच्या गावगप्पानी दहशत वाढवण्याचेच काम केले. यात पुढार्‍यांनी आणि माध्यम पंडितांनी आपापल्या परीने भरच घातली. आपापल्या विभागात स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासासाठी पुढार्‍यांनी या साथीचाही वापर घेतला. स्वतःची प्रतिमा लावून औषधे वाटली.

आपापल्या हस्तिदंती चेहर्‍यासह दक्षता घेण्याचे आवाहन करणारे मोठमोठे फलक लावले. याचा इतका भडीमार झाला की करोना ही महाभयंकर व्याधी आहे आणि तिची लागण झाली की मृत्यू निश्चित आहे असाच तथाकथीत सुशिक्षितांचा समज झाला. करोनामुळे आत्तापर्यंत जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा जास्त हानी पुढार्‍यांच्या नसत्या लुडबुडीमुळे झाली आहे असे मत सामांन्य जनता हेटाळणीच्या स्वरूपात व्यक्त करत आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने ही दहशत वाढवण्यास मदत होईल का? याचाही विचार व्हावा. निर्णय अनेक घेतले जातात. योग्य अमलबजावणीअभावी ते प्रभावशून्यही ठरतात. हा अनुभव नवा नाही. ही त्रुटी संबंधित दूर करू शकतील का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com