Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखमाध्यमे समाजाभिमुख होतील का ?

माध्यमे समाजाभिमुख होतील का ?

भारतीय संस्कृतीला सणांची मोठी परंपरा आहे. सण तेच असले तरी ते साजरे करण्याची पद्धत काळाबरोबर बदलते.

पर्यावरण आणि जैविविधता जपली तरच माणसाचे अस्तित्व आहे हे समाजाला पटत आहे. सहिष्णूता, धार्मिक सलोखा आणि मानवता ही भारतीय संस्कृतीची बलस्थाने आहेत.

- Advertisement -

त्यांची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे याचे भान सणांच्या निमित्ताने समाजात रुजत आहे. नुकतीच राखीपौर्णिमा साजरी झाली. या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो हे झाले सणाचे पारंपरिक रूप. वर्धा येथील सामाजिक संस्थांनी यानिंमित झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यास तरुणाईला उद्युक्त केले. निसर्ग सेवा समिती आणि काही स्वयंसेवी संस्थांनी ऑक्सिजन पार्क परिसरात स्थानिक परिस्थितीला अनुकूल अशी शेकडो झाडे लावली आहेत.

राखी पौर्णिमेचा सण या झाडांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि तरुणाईने झाडांना राख्या बांधून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. गणेशोत्सव साजरा करतांनाही अलीकडे पर्यावरणाला आणि निसर्गाला प्राधान्य दिले जात आहे. आज गणेशोत्सवाचा चौथा दिवस. सार्वजनिकरित्या हा सण साजरा करण्यावर निर्बंध आहेत. तथापि दिवसेंदिवस शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती बसवण्याकडे आणि गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. घरगुती गणपतीची आरास करतांना पर्यावरण प्रदूषणास कारण ठरतील अशा वस्तूंचा वापर कमी कमी होत आहे. अनेक घरातील शाळकरी मुलांनी पूजेसाठी गणेशमूर्ती सुद्धा स्वहस्ते केल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील नायब तहसीलदार अस्लम जमादार यांना 3 वर्षांचा मुलगा आहे. त्याने घरी गणरायाची स्थापना करण्याचा हट्ट केला आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याचा बालहट्ट पुरवला. जमादार कुटुंबीयांनी घरी गणेशाची स्थापना केली आहे.

लॉकडाऊनमुळे लोकांची रोजीरोटी बुडाली आहे. गावातील काही लोक गणेशमूर्ती विकत आणू शकत नसल्याचे याच गावातील एका मुस्लिम युवकाच्या लक्षात आहे. त्याने तीस पेक्षा जास्त कुटुंबाना गणेशमूर्ती घेऊन दिल्या. करोनाची साथ वाढत आहे. करोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोणी करायचे हा प्रश्न अनेक ठिकाणी प्रशासनाला भेडसावत आहे. काही ठिकाणी या कमी काही हिंदू तरुणांनी पुढाकार घेतला. ते कोणत्याही मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करत आहेत. तरुणाईचे वाढते सामाजिक भान कौतुकास्पद आहे.

सर्वधर्मीय तरुणांनी उस्त्फुर्तपणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या जात आहेत. ही काही उदाहरणे इतरांना नक्कीच दिशा दाखवतील. समाजात जातीभेदाच्या आधारे फूट पाडण्याचे व धार्मिक सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु आहेत. कट्टरतावादी त्यासाठी सणांचा आणि परंपरांचा सुद्धा गैरवापर करायलाही धजावतात. तथापि समाज भान जागे झालेल्या सर्वधर्मीय तरुणांच्या कल्पकतेचा आविष्कार यापुढे वाढतच राहणार यात शंका नाही.

दिशाभूल करणारांचे उपद्व्याप आता जनसामान्यांनाही त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळेच समाज भान आणि योग्य दिशेची जाणीव वाढत आहे. भारतीय संस्कृतीची बलस्थाने असलेल्या सार्वजनिक वर्तनाला आशादायक योग्य वळण लागू पाहात आहे. मोजक्या घटना जागरूक पत्रकारांमुळे समाजाला माहित होतात. मात्र प्रत्यक्षात अशाच हजारो घटना घडत असल्या तरी त्या प्रसिद्धी विन्मुख राहातात. ती जबाबदारी माध्यमांना उमजेल तो सुदिन !

- Advertisment -

ताज्या बातम्या