Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखउत्सवाचे उत्तम वळण दीर्घजीवी ठरो !

उत्सवाचे उत्तम वळण दीर्घजीवी ठरो !

आज गणेश चतुर्थी. गणेशोस्तवाचा प्रारंभ दिवस. आज घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशाची स्थापना होईल. मात्र ढोल ताशे घुमणार नाहीत. वाजंत्री वाजणार नाही. श्री गणेशमूर्तीच्या मिरवणूका निघणार नाहीत. कारण यंदाच्या गणेशोस्तवावर कोरोनाचे सावट आहे. एरवी सार्वजनिक गणेशोत्सव समाजात उत्साह, आनंद निर्माण करतो.

दहा दिवसांसाठी माणसे आपल्या चिंता, दुःख बाजूला ठेवून या उत्सवात रममाण होतात. या उत्सवाच्या निमित्ताने हजारो लोकांच्या रोजीरोटीची तात्कालिक सोय होते. तथापि यंदा नाईलाजाने का होईना पण करोनाचे निर्बंध गणपतीबाप्पाला सुद्धा पाळावे लागणार आहेत. गणेशभक्तांना सुद्धा त्यासाठी आग्रही राहणे भाग आहे. तेवढे भान गणेशभक्तांना अनायासे आले आहे. आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे, करोनाला दूर ठेवणे काही अंशी स्वतःच्याच हातात आहे हे उमजले आहे. वाईटातून चांगले घडते असे म्हणतात. करोनाच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सवांमध्ये शिरलेल्या कुप्रथांना कदाचित आपोआपच आळा घातला जाईल. लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीच्या व लोकांना संघटित करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. तो उद्देश आज कुठे प्रत्ययास येतो का?

- Advertisement -

गणेशोत्सव भव्य दिव्य होत गेला. तसा तो व्हावा की नाही याविषयी दुमत असू शकते. तथापि उत्सवाचे स्वरूप कालानुरूप बदलताना त्यामागचे हेतू मात्र गढुळत गेले. ‘नाल’सारख्या कुप्रथांनी शिरकाव केला. मंडपाच्या पुढच्या बाजूला भक्तीचा जागर आणि मागच्या बाजूला मात्र जुगार किंवा आणखी काही हे वास्तव कोणी नाकारू शकेल का? उत्सव सार्वजनिक होता होता त्यात फक्त ‘उत्सवीपण’ शिल्लक राहिले आणि भक्तीचा जागर मागे कधी पडला हे कैफात रंगलेल्या भक्तांच्या देखील लक्षात आले नाही. भक्तीला बाजारू स्वरूप कसे आणि का आले? गणपतीचा महिमा औरच आहे पण त्या महिम्याचा फायदा घेऊन मोठमोठ्या मंडळांची दुकाने थाटली गेली. वर्षागणिक अशा गजानन – सुपरस्टोअर्समध्ये भरच पडत आहे. आमचाच गणपती नवसाला पावतो अशी जाहिरात करण्याची चढाओढ सुरु झाली. घरचा गणपती कृपा करत नाही का? काही विशिष्ट मंडळांचाच गणपती भक्तांसाठी कृपाळू का ठरावा? छोट्यामोठ्या अन्य मंडळांचा गणपती कृपेबाबत कृपण का असावा ? हे प्रश्न भक्तांना कसे पडतील? ते परिस्थितीने, प्रतिकूलतेने गांजलेले असतात. कोणत्याही रूपात देवाने आपल्यावर कृपा करावी याच इच्छेने त्यांची धडपड सुरु असते.

परिस्थितीने पिडलेल्या माणसांनी तर्कशक्तीने विचार करावा, तर-तम दाखवावे अशी अपेक्षा तरी कशी करावी? पण भाबड्या भक्तांच्या भावनेचा बाजार मांडणार्‍या तथाकथीत चलाख भक्तांनाही तो पडू नये का? अर्थात ‘दानाची जादू लई न्यारी’ याचे प्रत्यंतर वर्षागणिक चक्रवाढ पद्धतीने घेणार्‍या मंडळांच्या पदाधिकार्‍यांना असा प्रश्न पडावा ही अपेक्षा करणेच भाबडेपणाचे ठरेल. करोनाच्या निमित्ताने यंदा अशा अनेक अनिष्ट वळणांना कदाचित आपोआपच आळा बसेल. यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय बहुसंख्य मंडळांनी घेतला आहे. तो का? करोनामुळे गर्दीवर बंधने आली आहेत.

उत्सव साजरा करण्यावर नव्हे. पण भक्तच येणार नसतील तर त्यांची ‘कृपाही’ मंडळावर होणार नाही या भावनेतुनच उत्सवाचे स्वरूप आक्रसले असावे का? बाप्पा कुठेही असला तरी तो भक्तांवर कृपादृष्टी ठेवतो आणि देवाच्या नावाखाली जे उद्योग सुरु आहेत ते किती निरर्थक आहेत याचा साक्षात्कार त्याच्या भक्तांना कदाचित होईल. कारणे काहीही आणि कितीही असोत, यंदा सर्वच भक्तांना जाणीव झाली आहे. करोनामुळे सुरुवातीच्या काळात टाळेबंदी झाली. त्यामुळे अनेक गोष्टी सक्तीने लोकांना पाळाव्या लागल्या. आता सक्ती कमी होत आहे.

तथापि सार्वजनिक आणि वैयक्तीक हिताच्या दृष्टीने काही सवयी कायमस्वरूपी अंगिकाराव्या लागतील. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सर्वप्रकारची किमान शिस्त पाळली पाहिजे. त्यासाठी किमान भीती टिकली तरी हरकत नाही. करोनाच्या निमित्ताने जे इष्ट बदल या उत्सवात झाले आहेत ते दीर्घजीवी ठरोत वा ही प्रार्थना जनतेच्या वतीने बाप्पांना करू या!

- Advertisment -

ताज्या बातम्या